नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात
कुपवाड एमआयडीसी : सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानदीप फाउंडेशनचे चेअरमन डॉ. एस. व्ही. रानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत, ध्वजगीत व विद्यार्थ्यांचे समूहगीत सादर करण्यात आले.
मार्गदर्शन करताना डॉ. रानडे यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. भारताच्या मोठ्या लोकसंख्येचा फायदा घेत डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून परदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेवर प्रभाव निर्माण करत आहेत. त्यामुळे भारतीयांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
न्यूटनच्या नियमाशी जोडलेल्या सफरचंदाच्या झाडाची आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहावी, यासाठी प्रत्येक शाळेने एक सफरचंदाचे झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सफरचंदाचे एक झाड नव कृष्णा व्हॅली स्कूलला भेट देण्यात आले.
Ref: https://youtu.be/kEqljDVTl_Y?si=oZuBadr0pSDXfS6E
आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना त्यांनी रोबोटिक्स, विज्ञान, पर्यावरण, माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे सांगितले. तसेच शाळांना जोडणाऱ्या डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठीत ब्लॉग लिहून आपले विचार जगभर पोहोचविण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Ref: https://youtu.be/M8PpsItzcoU?si=Vi23ZU6ohzi6JT8y
यावेळी क्रीडा व कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. श्री. आकाश जाधव यांचा ‘बेस्ट कला शिक्षक’ तर नव कृष्णा व्हॅली स्कूलचा ‘बेस्ट स्कूल’ म्हणून गौरव करण्यात आला.
सौ. संगीता पागनीस यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लुंकड यांनी दूरध्वनीवरून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास श्रीशैल मोटगी सचिव सुरज फाउंडेशन, सौ. संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन, अधिकराव पवार मुख्याध्यापक लव कृष्ण व्हॅली स्कूल मराठी स्कूल मराठी , प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल, राजेंद्र पाचोरे, आनंद कामत विभाग प्रमुख कृष्णावले ऍडव्हान्स अग्रिकल्चर फाउंडेशन, विनायक जोशी , रघुनाथ सातपुते, आसिफ मकानदार, तसेच शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment