Thursday, May 9, 2024

प्रा. भालबा केळकर - मराठी मुलांसाठी विज्ञान संशोधनाचा ज्ञानदीप

वालचंद कॉलेजचे ज्येष्ठ निवृ्त्त प्राध्यापक आणि विज्ञान संशोधन ही जीवननिष्ठा पाळणारे प्रा. भालबा केळकर आज वयाच्या ८६व्या वर्षीही  दिवसरात्र मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी करण्यात मग्न आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  उच्च पदे भूषवीत असून अनेक विद्यार्थी  यशस्वी उद्योजक म्हणून यशस्वी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय संशोधन व उद्योग क्षेत्रात आणि भारताच्या प्रगतीत या विद्यार्थ्यानी मोलाची भर घातली आहे.
काल त्यांच्या घरी म्हणजेच ज्ञानदीप फौंडेशनच्या नव्या शाखेत त्यांचेबरोबर चर्चा करताना मी स्पष्टपणे  त्यांच्यबद्दल लोकांत असणा-या काही गैरसमजुतींची त्यांना कल्पना दिली.

जग किती पुढे गेले आहे आणि भालबा केळकर हे अजून मुलांसाठी साधी खेळणी करण्यातच  निरर्थक वेळ घालवीत आहेत.

असे मत ऐकल्यानंतर ते हसले. म्हणाले 

"मला उद्याचे नवसंशोधक करायचे आहेत त्यासाठी लहान वयातच मुलांना संशोधनाची गोडी लावणे आवश्यक आहे. दुर्दैवाने याकडे कोणाचेच लक्ष नाही. इंग्रजी शाळेत परदेशी छानछोकी व स्मार्टनेस याला महत्व दिले जाते परंतु  मातृभाषेकडे दुर्लक्ष झाल्याने मुलांची ज्ञानग्रहणाची इच्छा णि कुवत कमी होते. मराठी शाळांतील मुलांना शिकण्याची हौस आणि इच्छा असली तरी महागडी उपकरणे व तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्यात एक प्रकारची निराशा व असूया निर्माण होते. यावर उपाय म्हणजे साध्या घरगुती वस्तूंचा वापर करून त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आवश्यक आहे. उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ प्रत्यक्ष संशोधन व विकास यात मग्न असल्याने त्यांना यासाठी वेळ नाही. शिवाय मराठीत काही लिहिणे वा शिकविणे आपल्या समाजात कमी दर्जाचे मानले जाते. त्यामुळे मराठीतून आणि लहान मुलांसाठी खेळणी करणे हे असा लोकांकडून पोरकटपणाचे लक्षण मानले जाणे स्वाभाविक आहे."

प्रा. भालबा केळकर हे जुन्या काळातले बीई मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल असे द्विपदवीधर आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील विविध शाखांत त्यानी उच्छ संशोधन आणि जवळजवळ तीस वर्षे प्रत्याक्ष उत्पादन व विक्री करण्याचा अनुभव घेतला आहे. असे असून ते मराठी मुलासाठी कमी खर्चाची  साधी वैज्ञानिक खेळणी करत आहेत. त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून महाराष्ट्रभर ती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

ज्ञानदीप इन्फोटेकचा आधुनिक तंत्रज्ञानावर भर असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने वितरित करण्याची योजना असल्याने मी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असलेल्या एखाद्या उपकरणावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. थ्री डी प्रिंटर, लेसर कटींग मशिन इत्यादी सोयींसाठी भांडवल उभे करण्याची ज्ञानदीपची इच्छा असून भालबा केळकरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक नवी उपकरणे निर्माण करण्यात ज्ञानदीप यशस्वी होईल असा मला विश्वास वाटतो.
त्यांच्या एआरईच्या अस्तानंतर ज्ञानदीप आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी करण्यासाठी पंखांत नवी शक्ती देऊ शकेल असे मला वाटते. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली संपर्क - drsvranade@gmail.com / +919422410520 /01(408) 338 7672

No comments:

Post a Comment