Wednesday, May 1, 2024

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर - ज्ञानदीपच्या भावी कार्याची रूपरेषा

गेली वीसपंचवीस  वर्षे ज्ञानदीप फौंडेशन आणि ज्ञानदीप इन्फोटेक या संस्थांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण, शिक्षण, वेबसाईट व मोबाईल एप निर्मिती,रोबोटिक किट प्रशिक्षण असे विविध क्षेत्रातील कार्यक्रम सुरू केले.; एक ना धड, भाराभर चिंध्या' अशी प्रतिक्रिया अनेक तज्ज्ञ, व यशस्वी व्यक्तींकडून ऐकायला मिळाली. म्हातारपणी वेळ व पैसे घालवायचा उद्योग चालू असल्याचे पाहून अनेक नातेवाईक व हितचिंतकांनी  मला अधिक हिशोबी व जागरूक रहायचा सल्ला दिला. बहुतेकांच्या दृष्टीकोनातून  हा अव्यापारेषु व्यापार होता. कधी भेट झाली तर  आज काय नवे असे विचारणा होते.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेची अयी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. त्यात त्यांचा काहीच  दोष नाही. कारण सध्या समाजात सार्वजनिक कामाबदद्ल कमालीची उदासिनता, स्वयंउद्योगाबदद्ल भीती आणि सद्य परिस्थितीचा दोष शासनावर टाकून फक्त आपल्यापुरते पाहण्याची वृत्ती बळावली आहे. करमणूक, राजकारण आणि अध्यात्म यांच्याकडे सुखवस्तू समाज ओढला जात आहे. पर्यावरण, शिक्षण वा रोजगार यासाठी आपण काही योगदान देऊ शकतो, नव्हे ते आपले सध्याच्या काळातले महत्वाचे उद्दीष्ट असले पाहिजे.  आपले ज्ञान व अनुभव यांचा भोवतालच्या समाजात नवरोजगार, संशोधक वृत्ती, प्रगतीच्या नव्या दिशा दाखविण्यासाठी उपयोग झाला तर समाजाला त्याचा फायदा होईलच पण आपलाही मर्यादित स्वार्थ साधला जाईल.'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' असे सुवचन आहे आणि त्याच भावनेने ज्ञानदीप आपले कार्य करणार आहे.

वालचंद कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक भालबा केळकर हे आपले मोठेपण आणि प्राध्यापक दर्जा विसरून आजही लहान मुले आणि विद्यार्थ्यांत संशोधक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून दिवसरात्र झटत आहेत. नेहमी मुलांच्या सहवासात राहिल्याने त्यांचे मन ताजेतवाने आणि तब्बेत उत्तम राहिली आहे. मराठीत आणि साध्यासुध्या वल्तूंचा वापर करून ते विज्ञान शिकवितात. याचाच पुढे मोठा व्यवसाय बनू शकेल असा त्यांना विश्वास  आहे.

अशा आदर्श व्यक्तींच्या कार्यास गती देणे, निवृत्त वृद्ध व्यक्तींच्या संचित ज्ञान व अनुभवाचा फायदा न्वया पिढीस कसा होईल आणि त्यातून या ज्येष्ठ व्यक्तींना आर्थिक लाभ किंवा नवउद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञानदीप आपल्या उपलब्धींचा वापर करणार आहे. सुदैवाने आज ज्ञानदीपकडे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानातील कुशल व्यक्ती, अनेक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींशी व्यक्तिगत संबंध आणि अमेरिकेतील परिचित यांचे पाठबळ आहे. या सर्वांनी एकत्र व निस्वार्थ भावनेने कार्य करायचे ठरविल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे शिवधनुष्य आपण पेलू शकू. निदान सध्याची समाजातील मरगळ जावून एक नवी चेतना निर्माण व्हावी अशी ज्ञानदीपची इच्छा आहे. त्याच भूमिकेतून सध्या बंद स्थितीत असणा-या अनेक सामाजिक संस्थांचे पालक्त्व ज्ञानदीपने स्वीकारले आहे. मराठी विज्ञान प्रबोधिनी, वालचंद कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना, निसर्ग प्रतिष्ठान, एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फौंडेशन, इंटरनॅशनल स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट स्टडीज, बाल मित्र संघटना अशा सांगलीतील अनेक संस्थांचे कार्य आता ज्ञानदीप फौंडेशनच्या एकछत्राखाली सुरू ठेवण्यात येणार आहे.

ज्ञानदीपचे सध्याचे कार्य समजून घेण्यासाठी कृपया ज्ञानदीपच्या  https://dnyandeep.com आणि https://dnyandeep.net या वेबसाईट पहाव्यात.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्ञानदीपची शाखा काढून मराठी वेबसाईटच्या माध्यमातून संगणक साक्षरता, प्रशिक्षण व लोकसहभाग हे ज्ञानदीपच्या भावी कार्याचे उद्दिष्ट आहे.
सर्वांच्या सक्रीय सहभागातून हे सहज शक्य होईल अशी माझी खात्री आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
अधिक माहितीसाछी संपर्क - इमेल - drsvranade@gmail.com / फोन - +91 88305 95822 /+01(408)338 7672

No comments:

Post a Comment