Saturday, March 30, 2024

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ज्ञानदीपचे आंदोलन


ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या वेबडिझाईन कंपनीने इ.स. २००० पासून मराठी माध्यमास आपल्या वेबसाईट, सॉफ्टवेअर व मोबाईल सुविधांमध्ये महत्वाचे स्थान दिले आहे.
 

 
महाराष्ट्रात आज बहुतेक शहरांच्या वेबसाईट इंग्रजीत असून सर्वसामान्य जनतेला त्याचा काही फायदा होत नाही. प्रसिद्ध मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर गुगलसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या जाहिराती देत असल्याने स्थानिक उद्योग व व्यावसायिकांना आपल्या वस्तू वा सेवा यांची जाहिरात या माध्यमातून करता येत नाही.महाराष्ट्र हे उद्योग
, तंत्रज्ञान तसेच विज्ञान संशोधनात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यात अपयशी ठरलेले आहे. सध्या विज्ञान व उच्च तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी झाल्याने मराठीत याविषयी काही लिहिणेही कमीपणाचे वाटू लागले आहे.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची आणि शिक्षणसंस्थेची मराठी माध्यमातील वेबसाईट  तसेच मोबाईल एप 
 बनवून त्यावर स्थानिक उद्योग व व्यावसायिकांच्या जाहिराती अगदी कमी खर्चात प्रसिद्ध करण्यासाठी मोठे कृतिशील आंदोलन उभारण्याची गरज आहे.
 
ज्ञानदीप महत्वाच्या शहरांमध्ये असे कार्यगट स्थापन करून अशा वेबसाईट बनविण्यास  व त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यास लागणारे त्यांना सर्व ते तंत्रज्ञानविषयक साहाय्य मोफत देणार आहे.
 
 एकटे ज्ञानदीप फौंडेशन हे सर्व काम करू शकणार नाही. मात्र मराठीवर प्रेम असणा-या सर्वांनी एक कर्तव्य म्हणून असे कार्य आरंभले तर हेही सहज होऊ शकेल. मग आंतरराष्ट्रीय मोठ्या आयटी कंपन्यांचे जाहिरातींवरील आणि शिक्षणावरील वर्चस्व संपुष्टात येईल. सर्वांन काम मिळेल आणि आपल्या स्वदेशी उद्योग आणि व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल.
 
परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
 
---
कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी ) 


मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मरा्ठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत. या उपक्र्मात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. तरीही हे काम शालेय विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले. याचे कारण मराठीतील पर्यायी शब्द व प्रचलित इंग्रजी शब्द यांची सांगड घालून अर्थ समजावून घेण्याचा खटाटॊप करण्याएवढा वेळ देण्याची लोकांची तयारी नसते. साहजिकच अशा मराठी साहित्याकडे केवळ अभ्यासण्याजोगी मराठी कलाकृती या दृष्टीकोनातून पाहिले गेले.

मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
 
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे

शुद्ध मराठी पर्यायी शब्दांचा आग्रह धरल्याने मराठीतील असे बरेच साहित्य सर्वसामान्यांना दुर्बोध झाले आहे. कालांतराने हे मराठी शब्द रूढ होतीलही पण प्रगत विज्ञान व मराठीतील भाषांतरित ज्ञान यातील अंतर वाढतच राहील. भाषेचा मुख्य उद्देश ज्ञान संक्रमित करणे हा असल्याने नेहमीच्या वापरातील इग्रजी शब्दही मराठीत निःसंकोचपणे वापरून हे ज्ञान लवकरात लवकर विशेष प्रयास न करता सर्व सामान्य जनतेला कसे समजू शकेल याचा विचार दुर्दैवाने झाला नाही.

नको पप्पा - मम्मी, आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
 
---कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

माझ्याही बाबतीत असेच घडले. १९६८ मध्ये पर्यावरण विषयात एम. ई. करतानाच मराठीत हे ज्ञान यावे असे मला वाटले. मराठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे जलशुद्धीकरणया विषयावरील जागतिक आरोग्य संघटनेचे चार्लस कॉक्स या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचे काम मी अंगावर घेतले. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे श्री. बा. रं. सुंठणकर यांनी सांगलीत माझ्या घरी येऊन या माझ्या कामास प्रोत्साहन दिले. माझ्या या कामास मार्गदर्शक म्हणून निवृत्त सचिव व मुख्य अभियंता असणारे श्री. वि. ह. केळकर हे काम पहात होते. त्यांनी धरण व जलसिंचन विषयावरील पुस्तके भाषांतरित केली होती. जलशुद्धीकरणातील सेटलिंग व फिल्ट्रेशन या प्रक्रियांसाठी त्यानी अवसादन व निस्यंदन हे मराठी शब्द सुचविले. अशा पद्धतीच्या अनेक संस्कृतोद्भव नव्या शब्दांचा उपयोग करून जिद्दीने मी ते ३०० पानांचे पुस्तक भाषांतरित केले खरे. जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याविषयी अतिशय बहुमोल अशी माहिती यात असल्याने मी ते जलशुद्धीकरण केंद्रातील लोकांना वाचायला दिल्यावर पूर्ण वाचायचे कष्ट न घेता वरवर चाळून छान भाषांतर आहेएवढ्या अभिप्रायाने त्यांनी ते परत केले. या पुस्तकाचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही उपयोग होणार नाही हे कळून चुकल्याने जवळजवळ ६०० पानांचे ते हस्तलिखित प्रकाशित न करता मी तसेच ठेवून दिले.

गेल्या पन्नास वर्षात मराठीत अनेक नवे पर्यायी शब्द आता रुढ झाले आहेत मात्र त्यासाठी बराच काळ जावा लागला आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने होत आहे त्याच्याशी तुलना करता भाषांतरित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबणे परवडणारे नाही. इंग्रजी शब्दांचा बिनदिक्कतपणे वापर करून म्रराठीचा केवळ संपर्क भाषा म्हणून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने ठरविले असते तर विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या मराठी शब्दांच्या वापराला निश्चितच बळ मिळाले असते. रशियाने सर्व इंग्रजी पुस्तकांचे व संशोधनपर लेखांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याचे काम सक्तीने तेथील साहित्यिक व शास्त्रज्ञांकडून करवून घेतले होते. राष्ट्रीय अस्मिता जपण्याचा व वाढवण्याचा तो मार्ग त्यांनी अवलंबिला होता.

आजही शासकीय व्यवहार, कायदा, शेती, सहकार या क्षेत्रात शासनाच्या पुढाकारामुळे मराठीने चांगले पाय रोवले आहेत. मात्र विज्ञान तंत्रज्ञानाकडे शासन याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट यासाठी इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुलांनी इंग्रजी शिकून मगच विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटेला जावे असे शासनाला वाटत असावे. त्यांचे हे मत विद्यार्थ्यांसा्ठी योग्य आहे असे मानले तरी शाळेबाहेर पडलेल्या वा शाळेतच न गेलेल्या बहुसंख्य मराठी लोकांचे काय? त्यांना हे ज्ञान मिळविण्याचा कोणता मार्ग उपलब्ध आहे.

मराठी ही फक्त साहित्यिकांची भाषा आहे अशा थाटात शासन त्याकडे पहात आहे. केवळ साहित्य संमेलनाला देणगी दिली की आपले मराठीविषयी दायित्व संपले अशी भावना शासनाची झाली आहे. मराठी शिकणे म्हणजे व्याकरण शिकणे व साहित्य वाचणे एवढाच अर्थ शिक्षण क्षेत्रातही रूढ आहे. त्यामुळे मराठी शिकविणारे प्राध्यापकही मराठी वाचतात पण लिहीत नाहीत. मराठी घेऊन बीए एमए होणार्‍यांना काही मान नाही व शिक्षण क्षेत्राशिवाय कोठे संधी नाही. भाषांतर हा मुख्य उद्देश मराठी शिकण्यासाठी ठेवला तर हा विषय व्यवसायाभिमुख होईल. मात्र त्यासाठी मराठीचा दुराग्रह न ठेवता किमान दोन भाषांचा अभ्यास करण्याची व भाषांतराची कृती सत्रे अत्यावश्यक थरविण्याची गरज आहे.

आज मराठी लिहिण्याबद्दल कमीपणाची भावना व विलक्षण उदासीनता शिक्षित वर्गात निर्माण झाली आहे. इंग्रजी वाचलेले कळत नाही व मराठीत साहित्य उपलब्ध नाही जे आहे ते प्रत्यक्ष वापरातील शब्द नसल्याने दुर्बोध आहे आजचा जिज्ञासू मराठी वाचक व विद्यार्थी अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे.

प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करून मराठीत असे साहित्य निर्माण करणेच या परिस्थितीत योग्य ठरेल. मराठीवर प्रभुत्व असणार्‍या लोकांनी नवे शब्द जरूर तयार करावेत पण त्याविना अडायचे कारण नाही. रशियासारखे महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक संशोधनाचा गोषवारा मराठीत प्रसिद्ध करण्याचे बंधन शासन व शिक्षणसंस्था घालू शकतात. सर्वांनी या बाबतीत कर्तव्याच्या भावनेतून मराठीत लिहिण्याचे ठरविले तर मराठी ज्ञानभाषेचे स्थान पुन्हा मिळवू शकेल.

साय मी खातो । मराठीच्या दुधाची ।
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? ।।
 
- कवि सुरेश भट
 
मराठीला खरी ज्ञानभाषा बनविण्याविषयी साहित्यिक व राजकीय नेते काही खास उपाययोजना सुचवतील व त्या अमलात आणतील अशी आशा करूया. -  डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment