Tuesday, November 30, 2021

वेबसाईट डिझाईन स्पर्धेमागची ज्ञानदीपची भूमिका

 


ज्ञानदीपने मराठीतून वेबसाईट डिझाईन स्पर्धा जाहीर केल्यानंतर अनेकांना शालेय विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती वा कुवतीबाहेरचा विषय  वाटला. प्रत्यक्षात वेबडिझाईन दहावीच्या भौतिक वा गणितापेक्षा कमी क्लिष्ट आणि समजायला अगदी सोपे आहे हे सांगण्याची गरज आहे.

अमेरिकेतील माझ्या माहितीच्या काही लोकांनी आता वेबसाईट डिझाईन आता कालबाह्य तंत्रज्ञान झाले असून फेसबुक, अॅमेझॉन, गुगलसारख्या सर्वव्यापी आणि सोप्या प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या शिक्षण, व्यवसाय वा छंद जोपासण्यासाठी करणे जास्त उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले. शिवाय वेबडिझाईनसाठी विक्ससारख्या अनेक नो-कोड किंवा ड्रॅग-ड्रॉप सुविधा नेटवर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.

मात्र या सुविधा वापरत असताना वेबसाईट म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते याची माहिती न झाल्याने एकप्रकारचे परावलंबित्व येते. तसेच या प्रसारमाध्यमांचे तंत्रज्ञान एक अवघड आणि अनाकलनीय असून आपल्याला त्यात काही काम करणे अशक्य  आहे असा ग्रह होतो. या सर्व सुविधात  क्लिष्ट कोडींग वापरून त्यात जादूमय वाटणा-या बदलांची वा माहिती शोधाची यात गुंफण केली असली तरी नेटवरून माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक असणा-या अगदी साध्या ग्रहितांवर आणि इंटरनेटच्या ज्ञानावर     वेबपेज करणे व त्यांच्या समूहाची साधी वेबसाईट बनविणे अगदी सोपे आहे.

वेबडिझाईन हे तंत्रज्ञान शालेय विद्यार्थीही सहज शिकू शकतो. त्याचा वापर करून त्याला हवी तशी वेबसाईट तयार करता येते आणि आपले विचार इंटरनेटवर आपल्या पूर्ण मालकीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करता येतात. हे सप्रमाण सिद्ध करणे हे ज्ञानदीपच्या वेबदिझाईन स्पर्धेचे उद्दीष्ट आहे.

जे विद्यार्थी यात भाग घेतील त्यांना वेबडिझाईनची प्राथमिक सर्व माहिती व्हिडिओ, मराठीतून लेख आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून  देऊन त्यांना या तंत्रज्ञानाविषयी वाटणारी भीती दूर करून एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा ज्ञानदीप प्रयत्न करणार आहे.  शिवाय मराठी भाषेचा वापर करणे आपल्या परिसर व निसर्गसंवर्धनाची माहिती  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी याचा  उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे व  एकूणच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने सोपे व शालेय विद्यार्थ्यांना सहज समजेल असे प्रशिक्षण साहित्य निर्माण करण्याचे मोठे आव्हानही ज्ञानदीप टीमच्या सर्व सहका-यांपुढे आहे. तरीदेखील अशा प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन   ज्ञानदीपने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

 या अभिनव प्रयोगाचे विद्यार्थी व ज्ञानदीपचे सहकारी स्वागत करतील व व २०२२ च्या नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा संकल्प करतील अशी मला आशा आहे.  स्पर्धेविषयी अधिक माहिती - https://tinyurl.com/yeywtped

- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
 

No comments:

Post a Comment