Monday, June 14, 2021

पुण्यातील एचसीसी प्रोजेक्टचे माझे अनुभव

 १९६८ मध्ये पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू केल्यानंतर लगेचच मी एमईसाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी माझ्याबरोबर प्रा. दिवाण, पोतदार, घारपुरे होते. शिकविण्यासाठी प्रा. केतकर, एमवायजोशी, कुंटे, छापखाने होते. दुस-या वर्षी मी सेप्टीक टॅंकच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विषय निवडला.

त्यावेळी कॉलेजच्या वॉटर सप्लायचे काम मेकॅनिकलचे प्रा. दिवाण यांचेकडे होते तर कॉलेज, होस्टेल व स्टाफ क्वार्टर्सच्या नव्या ड्रेनेज पाईप घालण्याचे काम आमच्याकडे आले. त्याआधी होस्टेलसाठी प्रा बर्वे यांनी सेप्टीक टॅंक बांधले होते मात्र मेसचे पाणी तसेच बाहेर सोडले जाई. हे सर्व पाणी एकत्र करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी परकोलेटिंग फिल्टरचा विषय मी एमईच्या प्रोजेक्टसाठी निवडला. सर्व्हे, ड्रेनेज पाईप, मॅनहोलसहीत सर्व ड्रेनेज व्यवस्था डिझाईनपासून बोँधकामापर्यंतचे काम मला करायला मिळाले.

त्यावेळी मी नवीन व पुस्तकी विद्वान होतो. प्रा. बर्वे, सखदेव, सर्व्हेचे सत्तू, कॉन्ट्रॅक्टर यशवंत कोलप, करंदीकर हे आमचे खरे गुरू होते.  फिल्टर आणि सेटलिंग टॅंक बांधून मला त्या विषयावर एमई करता आली. प्रा. सुब्बाराव हे सांडपाण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ असल्याने मी जलशुद्धीकरणावर लक्ष केंद्रीत करावे असे सुब्बाराव यांनी मला सांगितले. जलशुद्धीकरण यंत्रणेचे डिझाईन आणि बांधणीचा अनुभव घेण्यासाठी १९७२च्या उन्हाळी सुट्टीत पुण्यातील पर्वती वाटरवर्क्सच्या एचसीसी प्रोजेक्टवर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅमखाली तीन महिने अनुभव घेण्याची संधी मला मिळाली.


माझे सासर पुण्यातच होते पण त्यांच्या एका खोलीतील संसारात पाच जण रहात असल्याने मला तेथे राहणे शक्य नव्हते. पुण्यात अलका टॉकिजजवळील एका हॉटेलमध्ये  व नंतर हत्ती गणपती जवळच्या होस्टेलमध्ये या काळात मी रहात होतो.

पर्वतीच्या पायथ्याशी शेल रूफ असणारे चार रॅपिड सॅंड फिल्टर आणि दोन सेटलिंग टॅंक बांधण्याचे काम एचसीसी ला मिळाले होते. त्यांचे इंजिनिअर आणि कर्मचारी तेथेच तट्ट्याच्या कॉलनीत रहात असत. फक्त मुख्य इंजिनिअर कुलकर्णी याना पक्के घर होते.

सकाळी ९ पासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत काम चाले. मी  डिझाईन ऑफिस व कन्स्ट्रक्शन साईट दोन्ही कडे जाऊन काम पहात असे. मी फिटींग कामातील प्रगती, सळई, सिमेंट बॅग, सिमेंट वाळूचे प्रमाण यांच्या नोंदी ठेवी.नोट्स काढून त्या कुलकर्णी इंजिनिअरना दाखवे. जर्मन फर्मच्या ड्राईंग्जवरून नवी ड्राईंग बनविली जात. मुंबईहून मदन नावाचे चीफ इंजिनिअर येऊन मार्गदर्शन करीत. डिझाईन आणि प्रत्यक्ष काम य़ात ब-याच वेळा अनेक बदल करावे लागत. तेथील अनुभवी मेकॅनिक व गवंडी यांना असे बदल करायला मुभा असे. त्यांचा काम करण्याचा झपाटा वाखाणण्यासारखा होता. अनेक वेळा त्यांनी डिझाईनमध्ये सुचविलेले बदल सुपरवायजरलाही मान्य करावे लागत.

म्युनिसिपालिटीचे इंजिनिअर येऊन कामाची पाहणी करून जात. कुलकर्णीसर अगत्याने माझी ओळख करून देत.   ते मला ब-याच गोष्टी कोदून खोदून विचारत. मीही माझ्या नोट्सवरून सर्वकाही त्यांना सांगत असे. यामुळे नियमावर बोट ठेवून एचसीसीच्या कामात चुका काढायला त्यांना संधी मिळे. एचसीसीच्या अधिका-यांनी मग मला मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे मला अशावेळी काय सांगायचे आणि काय नाही हे समजले.

त्यावेळी शेलरूफचे डिझाईन व उभारणी  अवघड आणि नाविन्यपूर्ण होती. अनेक लोक ते काम पहायला येत.  फिल्टरखालील पाईप जोडणी, वाळू चाळून थर करणे, सेटलिंग टॅंकमध्ये ग्राऊंडवाटर अपफ्लो प्रेशर कमी करण्यासाठी रिलीफ व्हाल्व, फ्लॉक्युलेटर व स्क्रॅपरची जोडणी, ओव्हरफ्लो वीअरसाठी व्ही नॉच पट्ट्या बसविणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने मला या ट्रेनिंगचा फार फायदा झाला. शिवाय कर्मचा-यांबरोबर दिवस घालविल्याने त्यांचे जीवन, अडचणी, आकांक्षा याचीही कल्पना आली. म्युनिसिपातलिटीचे फिल्टर ऑपरेटर आणि इंजिनिअर मला फार मान देत. त्यांच्याकडून मला इतर अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.फिल्टर प्लॅंट प्रत्यक्ष बांधणीचा एक समृद्ध अनुभव मला एचसीसीच्या या प्रोजेक्टमधून मिळाला. १९७३ ता १९७६ या काळात  आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी साठी   कानपूर वाटरवर्क्समध्ये काम करताना  मला या अनुभवाचा फार फायदा झाला.

No comments:

Post a Comment