Monday, June 14, 2021

नीरी, नागपूरमधील माझे अनुभव

 

१९६६ साली सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई सिव्हील पास झाल्यानंतर लगेच मी त्या कॉलेजमध्ये सिव्हील डिपार्टमेंटमध्ये नोकरीस प्रारंभ केला. माझ्या सुदैवाने त्याच वर्षी अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीतून एमएस झालेले सुब्बाराव वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. अमेरिकेतील त्यांचे पर्यावरणविषयक नवे ज्ञान आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची मनीषा बाळगून मी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या पर्यावरण अभियांत्रिकी विषयात एम.ई. करण्याचे ठरविले.


त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ हा विषय शिकविला जात असला तरी त्याची प्रयोगशाळा नव्हती. नीरी, नागपूरमधील डायरेक्टर डॉ. जी. जे. मोहनराव हे सुब्बाराव यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ओळखीने नीरीत पर्यावरण प्रयोगशाळेत तीन महिने प्रशिक्षण घेण्याचे मी ठरविले. जागतिक संशोधकांच्या गोष्टी वाचल्या असल्याने भारतातील महत्वाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत मला काम करायला मिळणार या कल्पनेने मी हुरळून गेलो. पण मला नागपूर नवखे होते आणि इतक्या दूर परक्या शहरात कसे रहायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण माझे जेष्ठ सहकारी प्रा. श्रीधर करंदीकर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या घरी माझ्या राहण्याची सोय केली. युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून १९६७ साली मी नागपूरला गेलो. त्यांच्या तीन भाऊ व आईवडील असणा-या कुटुंबात त्यांनी आपलेपणाने मला सामावून घेतले. त्यांचे घर सीताबर्डीत होते. तेथून नीरी ३ किलोमीटर दूर होली. आमच्या घराशेजारी राहणारे देशमुख नीरीमध्ये काम करीत असल्याने त्यांचेबरोबर मी बसने नीरीत जाई.


तेथील प्रत्यक्ष पाणी, मलजल, घनकचरा, हवाप्रदूषण या वेगवेगळ्या विभागात प्रत्येकी १५ दिवस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. तेथील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली. डॉ. एस. एन. कौल, डॉ. अलगरस्वामी, डॉ. लक्ष्मीनारायण, डॉ. देशपांडे इत्यादींनी मला बहुमोल मार्गदर्शन केले.


 


त्यावेळी मी जरा धीट व स्पष्टवक्ता होतो. कोणाचीही तमा न बाळगता मी प्रश्न विचारत असे. माझे मतही मांडत असे. नीरीबद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पनांना मात्र मोठा तडा गेला. तेथे घड्याळाच्या वेळेनुसार व नियमाप्रमाणे चाललेले काम मला आवडले नाही. कर्मचारी, अधिकारी यांच्या संघटना कायदेशीर बाबींचा अतिरेक, विभागाविभागातील दुरावा यामुळे माझे मन खिन्न झाले. संशोधन वा नवनिर्मितीसाठी भूक तहान विसरून व काळवेळाची पर्वा न करता धडपडणा-या शास्त्रज्ञांऐवजी मला चाकोरीबद्ध काम करणारे व पगार आणि बढती आणि अधिकार यात मशगुल असणा-या लोकांचेच तेथे प्राबल्य असल्याचे जाणवले. संशोधनासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असूनदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन येथे का होत नाही असे मी डॉ. मोहनराव यांना विचारले. तेव्हा त्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे संशोधन प्राथमिकता बदलत राहिल्याने आणि व्यवस्थापनाला मर्यादित अधिकार असल्याचे कारण सांगितले आणि आपली हतबलता व्यक्त केली. अर्थात माझा हा अनुभव १९६८ सालातील आहे. आणि आता त्यात बरेच चांगले बदल झाले असतील असे मला वाटते.

नागपूरचा उन्हाळा, तेथील व-हाडी भाषा, लोकांची आदरातिथ्य व मदत करण्याची वृत्ती आणि करंदीकरांच्या घरातील खेळीमेळीचे प्रसंग आजही माझ्या मनात ताजे आहेत.

नागपूरला पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळेत प्रदीर्घ काळ अनुभव घेतल्याने वालचंद कॉलेजमध्ये परतल्यानंतर आम्ही पब्लिक हेल्थ लॅब उभी करायचे मनावर घेतले. कॉलेजचे प्राचार्य श्री. कानिटकर यांनी यासाठी पूर्ण सहकार्य दिले. बीईच्या क्लासरूममध्येच लाकडी पार्टिशन घालून आम्ही प्रयोगशाळा उभारली. सुब्बाराव कॉलेज कॅंम्पसमध्येच रहात असल्याने कॉलेज सुटल्यानंतर रात्रीपर्यंत आणि शनिवारी रविवारी पूर्ण दिवस आम्ही प्रयोगशाळेत काम करीत असू. प्राचार्य कानिटकरही रविवारी प्रयाोगशाळेत येऊन आम्हाला प्रोत्साहन देत.
आज वालचंद कॉलेजमधील सुसज्ज प्रयोगशाळा बघताना नागपूरच्या नीरीमधून आणलेल्या बीजाचा वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते.


या जाणिवेतूनच नागपूरला ज्ञानदीपची शाखा काढण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.


डॉ. एन. एस. रमण यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला. ज्या नीरीत मी प्रयोगशाळेचे पहिले धडे गिरविले. त्याच नीरीतील अत्युच्च पदावर असणारी व्यक्ती ज्ञानदीपची पर्यावरण शाखा तयार झाली हे मी माझे परमभाग्य समजतो.

No comments:

Post a Comment