Saturday, August 8, 2020

मोबाईलटीव्हीच्या मोहजालात गुरफटले जनमानस

 कोरोनामुळे घरात बसावे लागल्याने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आज काय नवी बातमी आज काय मेसेज पहात, मालिका, संगीत आणि व्हिडीओ यांचा आस्वाद घेत दिवस कसा जातो हे लक्षातही येत नाही.
आज नक्की कोणता वार हेही विसरले जाते कारण सर्वच दिवस सुट्ठीचे झाले असल्याने कॅलेंडरवर खुणा करूनच दिवसांची मोजदाद करावी लागते.

फेसबुक, व्हॉट्सएप आणि टीव्हीने निदान आपला वेळ आनंदात घालवण्याची सोय केली आहे. मित्रांच्या मेसेज उत्तरे देणे हेही एक महत्वाचे काम बनले आहे. अभिनंदन,  इमोजीवरून हात जोडणे असे सोपे मार्ग मग चोखाळावे लागतात.

काही जणांनी आपल्या मेसेजचा एक सुंदर परिच्छेदच तयार केलेला असतो. त्यातच थोडा बदल करून उत्तर देता येते.

वर्तमानपत्र, मासिक, पुस्तक वाचणे आता कंटाळवाणे आणि नकोसे झाले आहे. सचित्र मासिक चाळायला बरे वाटते पण त्यातील लेखांकडे दुर्लक्षच केले जाते.

वैचारिक साहित्य तर केव्हाच अडगळीत पडले आहे. अभ्यासाची पुस्तके वाचणे देखील विद्यार्थ्यांना नाइलाजाने वाचावी लागत आहेत. त्यांचे क्रीडांगण व व्यायामशाळा बंद असल्याने मोबाईल टीव्ही पाहण्यातच त्यांचाही वेळ जात आहे.

मोबाईल टीव्हीच्या भाऊगर्दीत, सभासमारंभाला वा वाचनालयात जाणे,  कागदावर वा वहीवर लिहिणे वा चित्र काढणे तर केव्हाच बंद झाले आहे.

हे असेच चालू राहिले तर जनमानसाची मती, बुद्धी व कार्यशक्तीच नाहिशी होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.
 आता शासनानेच रोज दहा पाने मजकूर लिहिण्याची व पुस्तकाची किमान १०० पाने वाचण्याची सक्ती केली पाहिजे. तसेच स्वहस्ताक्षरात एक पत्र दर आठवड्याला  शासनाकडे पाठवण्याची सूचना दिली पाहिजे.

असे केले तरच आपली मनन, चिंतन करण्याची व लेखनवाचनाची सवय अबाधित राहील.

निदान कोरोनाची स्थानबद्धता संपल्यावर तरी जनता पूर्वीप्रमाणे साहित्यसंस्कृतीत आपल्या कुवतीनुसार भर घालेल.
-- सु. वि. रानडे






No comments:

Post a Comment