Friday, August 23, 2019

सौ. शुभांगीचा स्मृतीदिन आणि तिचे ज्ञानदीपविषयी सुवर्ण स्वप्न


आज (दिनांक २२ ऑगस्ट २०१९) माझी पत्नी कै. सौ. शुभांगीचा तृतीय स्मृतीदिन. या दिवशी तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची, जिद्दीची आणि संवेदलशीलतेची आठवण माझ्या मनात एका अनामिक पोकळीची जाणीव करून देत आहे. तिच्याबरोबर व्यतीत केलेला कालखंड आपली विविध रूपे दाखवीत मनाला भावविवश करीत आहेत. 

संगणक क्षेत्रातील तिचा प्रवास, ज्ञानदीपची स्थापना करताना असलेला उत्साह, व्यवस्थापन कौशल्य आणि स्वतः शिकण्याची व रात्रंदिवस कष्ट करण्याची सवय आणि भविष्याबाबत कायम आशावादी राहण्याची मनोवृत्ती सारेच अद्वितीय होते. ज्ञानदीपच्या यशाची तीच खरी प्रेरणास्रोत होती.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्था तिच्या मारगदर्शनाखाली यशाच्या अत्युच्च शिखरावर गेल्या होत्या.

ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीकडे वालचंद कॉलेज, उगार शुगर, इंडियन वाटरवर्क्स, बंगलोर महाराष्ट्र मंडळ, कोल्हापूर महापालिका, कॅंन्सर ह़स्पिटल यासारख्या मान्यवर संस्थांच्या वेबसाईट  तसेच मधुरंग मेट्रिमोनियल, डॉ. किल्लेदार नेत्र रुग्णालय, नूतन बुद्धीबळ मंडळ यांचे सॉफ्टवेअर  विकसित करण्याचे काम होते.

 याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फ्रीलान्स (मुक्त स्पर्धा) तत्वावर अनेक अमेरिकन कंपन्यांची कामे ज्ञानदीप इन्फोटेकने यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉलरच्या स्वरुपात पैसे मिळविले होते. त्यावेळी ज्ञानदीप इन्फोटेककडे असणा-या कर्मचा-यांचे वेतन महिना १५ हजार रुपयांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत होते.

याचवेळी ज्ञानदीप फौंडेशनने ग्रीन बिल्डींग डिझाईन व ग्रीन टेक्नॉलॉजी या विषयावर भारतात सेमिनार, कार्यसत्रे तसेच बॅंकॉक व दुबई येथे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस घेऊन लोकमान्यता व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे संघटन करण्यात यशस्वी झाली होती.

तिच्या सुदृढ आरोग्याला अचानक ग्रहण लागले आणि तिची तब्बेत दिवसेंदिवस ढासळत गेली. याच काळात ज्ञानदीपला  इतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. हळूहळू ज्ञानदीपचे तेज मंद होत गेले. सुमारे दहा वर्षांपूर्वी ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फौंडेशन या दोन्ही संस्था यशाच्या अत्युच्च शिखरावर होत्या.

आयुष्याचा दिवस मावळत जात असला तरी  गडद होत जाणा-या अंधारातही तिला ज्ञानदीपच्या सोनेरी भविष्याची  आस होती. तिच्या आश्वासक, धैर्यशील व कार्यमग्न मनोवृत्तीमुळे माझेही मन सतत उल्हसित रहात होते. नवनव्या योजना आम्ही त्याही परिस्थितीत आखत होतो. मात्र दैवाचे फासे उलटे पडू लागले. तिची तब्बेत खालावून २२ ऑगस्ट २०१६ रोजी ती आम्हाला सोडून गेली. त्यावेळीही तिच्या चेह-यावरील निर्धार व मंद स्मित तसेच टिकून होते.

त्यानंतर मला अमेरिकेत जावे लागले. ज्ञानदीपच्याबाबतीत उषःकाल होता होता काळरात्र का झाली याचा शोध गेली दोन वर्षे त्रयस्थ वृत्तीने मी घेत होतो. दोन्ही संस्था विकल स्थितीस पोचण्यास अनेक गोष्ठी कारणीभूत झाल्या. माझ्या चुकाहा त्यास अपवाद नाहीत.

ज्ञानदीपच्या पुनरुत्थानासाठी मी इतका निग्रही, आशावादी आणि कार्यरत का झालो आहे आणि आर्थिक नुकसान का सोसत आहे याचे कोडे माझ्या जवळच्या नातेवाईकांना पडले आहे. माझे सहकारी आणि विद्यार्थीही माझ्याकडे सहानभूतीच्या दृष्टीकोनातूनच मदत करीत आहेत. परदेशात राहून ज्ञानदीपच्या या संस्था चालविण्याचा खटाटोप न करता आयुष्याच्या संध्याकाळी शांतपणे उरलेले आयुष्य व्यतीत करावे अशीच सगळ्यांची माझ्याबानतीत भावना आहे.पण माझ्या या धडपढीमागे सौ. शुभांगीचे सोनेरी स्वप्नाची पूर्तता हेच कारण आहे.

सुदैवाने आज माझ्याकडे आवश्यक तेवढा पैसा आहे. दरमहा मिळणारी पेन्शन आहे. कोणतीही आर्थिक जबाबदारी माझ्या अंगावर नाही. माझी तब्बेतही मला साथ देऊ लागली आहे. कोणी काही म्हणो आपल्या आतल्या आवाजाला मान देत यापुढील वाटचाल मी करणार आहे. माझी पत्नी कै. सौ. शुभांगीने मला शिकविलेली जिद्द आणि चाल एकला या कवितेत दिलेला संदेश मला कायम प्रेरक साथ देत राहील,

आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. एकट्या दुकट्याने प्रयत्न न करता सर्वांनी सामुहिकरीत्या एकमेकांना मदत करीत सशक्त संघटना बनवली तर ती स्थायी व परिस्थितीनुसार परिबर्तनशील होऊन आपला विकास साधू शकेल याची मला खात्री वाटत आहे. भुभांगीच्या मनातील ज्ञानदीपचा सुवर्णकाळ माझ्या दृष्टीपथात आला आहे. यामुळेच. बदललेल्या नव्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मी नव्या दमाने पुनश्च हरि ओम म्हणण्याचे ठरविले आहे. सर्वांची साथ मिळाली तर मी यात नक्की यशस्वी होईन

.( उषःकाल होता होता ... अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली )

-    आणि तीच माझी तिला योग्य श्रद्धांजली ठरेल.
-     --- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

No comments:

Post a Comment