Monday, January 28, 2019

टर्टल ग्राफिक्स ( कासव चित्रकला)


संगणकावर ज्याप्रमाणे माऊस हलवून चित्र काढता येते. त्याप्रमाणे टर्टल ग्राफिक्स मध्ये कासव हलवून चित्र काढता येते. मात्र कासव चित्रकलेत कासव आज्ञाधारक सेवकासारके वागते व आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे डावीकडे (left) किंवा उजवीकडे (right) वळून  पुढे (forward) वा मागे (backward) जाऊन  चित्र काढते. म्हणजे आपल्याला माऊस हलवावा लागत नाही.

थोडक्यात कासव आपला संगणकावर चालणारा माऊस म्हणून काम करते. कासवाची गती (speed) बदलता येत असल्याने व रेषेची जाडी (pensize) व रंग (pencolor) चा वा आकृतीचा रंग बदलता येत असल्याने आपल्याला सहजपणे सुंदर चित्र काढता येते एवढेच नव्हे तर चित्रांच्या हालचालींची चित्रफीत (video) बनविता येते.  एखादा मनोरंजक खेळही ( video game) बनविता येतो.

कासव चित्रकलेतील आज्ञा ( program statements) आपल्या नेहमीच्या व्यवहारात वापरल्या जाणा-या शब्दांच्या बनलेल्या असतात. म्हणजे १०० पावले (पिक्सेल) सरळ पुढे जा. नंतर डावीकडे ( वा उजवीकडे) वळा. ( किती  अंश कोनातून हेही सांगता येते).

पेन्सिलची जाडी (pensize) व रंग कोणता घ्यायचा (pencolor)  व आकृतीत रंग कसा व कोणता भरायचा (fillcolor) हेही सांगता येते.

संगणक आज्ञावलीतील काही सुविधा वापरून एकसारखी कृती अनेकवेळा करण्यासाठी ( for or while loops) वा आवश्यकतेनुसार बदल ( if condition) करण्याचे कामही सहज करता येते.

शाळेत भूमिती शिकताना आपण डावीकडून उजवीकडे व खालून वर अंतर मोजतो व आकृत्या काढतो.

संगणकावर आकृती काढताना डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली अंतर मोजावे लागते.

 कासव चित्रकलेत आलेखाचा मध्यबिंदू स्क्रीनच्या मध्यावर असतो. म्हणजे चित्राच्या सुरुवातीस कासव मध्यावर डावीकडे तोंड करून उभे असते. म्हणजे आपल्याला स्क्रीन मध्यापासून सुरुवात करावी लागते. या मध्यबिंदूपासून डावीकडे आणि  मध्यबिंदूपासून वर मोजावयाचे अंतर अधिक  व उलट दिशेतील अंतर वजा मानले जाते.

येथे माऊस कासवाच्या रुपात  असला तरी आपल्याला कासवाऐवजी दुसरे कोणतेही चित्र वापरता येते.

No comments:

Post a Comment