Wednesday, March 1, 2017

दुहीपेक्षा समन्वयानेच विकास शक्य

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत राजकीय नेतृत्वात आघाडीवर असणार्‍या दिग्गज नेत्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या सांगली जिल्ह्याचा विकास मात्र अंतर्गत दुहीमुळे खुंटला आहे. सांगलीचा तो इतिहासच आहे असे सखेद नमूद करावेसे वाटते.

पक्षापक्षात दुही असू शकते हे मान्य केले तरी एकाच पक्षात एवढी टोकाची दुही फक्त सांगलीतच पहायला मिळते. आणि सर्व पक्षात त्याचेच लोण पसरले आहे. मी मुद्दाम नामोल्लेख करीत नाही कारण ही दुही प्रसारमाध्यमांना हाताशी धरून या नेत्यांनीच जगजाहीर केली आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर याचा फार हानीकारक परिणाम झाला आहे.

दुर्दैवाने याची झळ सांगलीतील अनेक सामाजिक, सहकारी आणि शैक्षणिक संस्थांना बसली असून त्यांच्या प्रगतीत अनेक अडथळे येत आहेत.



वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज याला अपवाद नाही. जागेची कागदोपत्री मालकी असणारी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि वालचंद कॉलेजचे विद्यमान व्यवस्थापक मंडळ यात सुरू झालेला वाद कायदेशीर, राजकीय व झुंडशाहीच्या स्थित्यंतरातून पुढे सरकत आहे व त्याचे नेतृत्व एकाच सत्ताधारी पक्षाचे आमदार व खासदार करीत आहेत. यावर  सर्वमान्य तोडगा काढणे त्यांना सहज शक्य आहे आणि ते त्यांच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचे आहे.

वालचंद कॉलेज माझे श्रद्धास्थान आहे.  १९६६मध्ये याच कॉलेजमधून बी.ई. सिव्हील झाल्यानंतर २००३ पर्यंतचा माझा कार्यकाळ याच कॉलेजमध्ये व्यतीत झाला आहे. कॉलेजच्या प्रगतीत प्रशासन प्राध्यापक आणि विद्यार्थी यात एक अतूट स्नेहबंध होता, संस्थापक स्व. धोंडुमामा साठेंच्या स्वार्थत्यागातून आणि जिद्दीतून सुरू झालेल्या कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीत वालचंद ट्रस्ट, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्थांनी एकोप्याने काम केले. कॉलेज स्वायत्तता मिळवण्याचा अर्ज करतानादेखील त्यांच्यात एकवाक्यता होती.

स्वायत्ततेचा अर्थ स्वातंत्र्य असा धरून वालचंद कॉलेज प्रशासनाने आपल्या सर्व कागदोपत्री व्यवहारातून महाराष्ट्र  टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे नाव कमी केले आणि मालकी व व्यवस्थापन या विषयावर वाद सुरू झाला.
मी आणि माझी संस्था ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. आम्ही दोघेही या वादात काही कारणामुळे ओढले गेलो. सुरुवातीच्या काळात एचसीसीच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पासाठी विद्यार्थी प्रशिक्षण देण्याचे तसेच एचसीसी इन्फोटेकबरोबर सहकार्य करण्याचे मी प्रयत्न केले.

माझी कंपनी स्थापन केल्यानंतर लगेचच मी वालचंद कॉलेज तसेच वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेतले. वालचंद कॉलेजशी परस्पर सहकार्य करून २००३ मध्ये एक महिन्याचा वेबडिझाईन कोर्सही आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेतला. स्व. धोंडुमामा साठेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचा सदस्य व्हायचे माझे पहिल्यापासूनचे स्वप्न होते.  २००६ मध्ये  मला संस्थेचे सदस्यत्व मिळाले. मात्र त्यावेळीच दोन्ही संस्थांची फाटाफूट सुरू झाली होती.

वालचंद कॉलेजच्या वेबसाईटवर स्व, धोंडुमामा साठे यांचा फोटो, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची माहिती तसेच वालचंद कॉलेज व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष या नात्याने श्री. अजित गुलाबचंद यांचे फोटो व माहिती होती. त्याबाबत कोणत्याही गटाचा आक्षेप नव्हता.

२००८ मध्ये कॉलेजकडे वेबसाईटचे संचालन त्यांचे विनंतीवरून दिले. तेव्हापासून कॉलेजमार्फत सर्व माहिती वेबसाईटवर घालण्यात येत होती. २०१० मध्ये एकदा सहज कॉलेजची वेबसाईट पहात असताना मला महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची माहिती असलेल्या पानावरील स्व, धोंडुमामा साठे यांचा फोटो नसल्याचे दिसले. सोसायटीचा सदस्य या नात्याने मी एक इमेल महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीस पाठवून योग्य ती दुरुस्ती कॉलेजकडून करून घेण्यास सांगितली. मात्र  महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि कॉलेज प्रशासन यातील सुसंवाद संपला असल्याने योग्य ती दुरुस्ती न होता या इमेलचा व वेबसाईटवरील माहितीचा वापर कायदेशीर लढाईत हत्यार म्हणून वापर करण्यात आला.

असे झाले तरी माझे आणि कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांचे संबंध सलोख्याचे होते. मात्र एका शिक्षकाने माझ्यावर खोटी बदनामी करणारी इमेल पाठविल्याचा आरोप करून मोबाईलद्वारे सर्वांना कळविले. जसा माझ्या संस्थेचा परस्पर सहकार्याचा करार वालचंद कॉलेजशी होता तसाच तो महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीशीही होता. माझ्या संस्थेचे ऑफिसही मी त्यांच्या जागेत उघडले होते. कॉलेजच्या व्यवस्थापनाबाबतच्या कायदेशीर लढाईत मला स्वारस्य नव्हते. कॉलेजशी संबंध पूर्ववत रहावेत यासाठी मी माझ्या संस्थेचे ऑफिस दुसरीकडे हलविले.

कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे काम मी पूर्वीपासून करीत होतो. मोठ्या प्रयत्नाने कॉलेजमधील एक खोली आम्ही त्यासाठी मिळविली होती. त्या माजी विद्यार्थी संघटनेची स्वायत्तताही धोक्यात आली आहे. कॉलेजच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहतो तसेच विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधतो.

कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेचे काम मी पूर्वीपासून करीत होतो. मोठ्या प्रयत्नाने कॉलेजमधील एक खोली आम्ही त्यासाठी मिळविली होती. त्या माजी विद्यार्थी संघटनेची स्वायत्तताही धोक्यात आली आहे. कॉलेजच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थित राहतो तसेच विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधतो.

मला स्वत:ला तसेच सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना तसेच सध्याच्या शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांना  कॉलेजच्या भवितव्याची काळजी आहे.

कोर्टाने ’आई किंवा वडील यांच्यात एकाची निवड कर’ असे सांगितल्यावर बालकाची जी स्थिती होईल तशीच थोडी फार स्थिती सर्वांची झाली आहे. स्थानिक प्रशासन, कॉलेजमधील सर्व शिक्षक तसेच मा. डायरेक्टरपासून  सर्व पदाधिकार्‍यांचे कॉलेजच्या प्रगतीसाठी होत असलेले योगदान याबद्दल आम्हाला आदर आहे.

या संभ्रम, संशय आणि संघर्षाच्या अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी परस्पर सद्‍भाव आणि समन्वय हाच एकमेव उपाय आहे. कॉलेजच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार व खासदार यांनी आपले संघटनात्मक कौशल्य पणाला लावून समन्वय साधावा अशी अपेक्षा आहे.

समन्वय म्हटले की थोडी फार तडजोड आलीच. प्रत्येक संस्थेच्या आपल्या आशा आकांक्षांना मर्यादा पडतील. परंतु समन्वयातून होणारा विकास हा चिरस्थायी असतो आणि सहकार्यातून विकासाची गती कित्येक पटीने वाढते हे विसरून चालणार नाही.

समन्वयाचा हा सुदिन पाहण्याचा योग सर्व वालचंद प्रेमी सांगलीकर जनतेला लाभो हीच सदिच्छा !


No comments:

Post a Comment