Monday, February 13, 2017

झोपडपट्टी - समाज बहिष्कृत वसाहत

जवळ जवळ पंचाहत्तरी गाठलेल्या माझ्या आयुष्यात प्रथमच मी एका झोपडपट्टीचे जवळून दर्शन घेतले आणि दुर्लक्षित व हलाखीत जगणार्‍या लोकांना पाहून मला आपल्या समाजजीवनातील एका सर्वात मोठ्या व्यंगाची व व्यथेची जाणीव झाली.  स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही  झोपडपट्टीची ही समस्या दूर न होता मोठ्या झपाट्याने मोठ्या तसेच लहान शहरातही वाढत आहे व इतर सर्व समाजाकडून त्याकडे अक्षम्य व सोयीस्कर दुर्लक्ष्य होत आहे या कल्पनेने मन विषण्ण झाले. याच समाजाचा मी एक भाग होतो आणि आतापर्यंतच्या माझ्या जीवनप्रवासात अगदी वैचारिक पातळीवरही मी कधी या समस्येला महत्व दिले नाही याचे वाईट वाटले. या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणार्‍या व महिला नेतृत्व असणार्‍या शेल्टर असोसिएटसने  नकळत माझे लक्ष या समस्येकडे वेधले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.



झोपडपट्टी म्हणजे काय हे मला लहानपणापासूनच माहीत होते.  पूर्वीच्या काळचे संत महात्मे, आचार्य विनोबा, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, मदर तेरेसा व अशा अनेक समाजसुधारकांचे दलित उद्धाराचे कार्य अगदी भक्तीभावाने मी वाचले होते. तरीदेखील प्रत्यक्ष झोपडपट्टीत जाऊन आपण असे काही कार्य करावे असे वाटले नाही. याचे कारण मी एका सुरक्षित, एकसंध पण स्वयंकेंद्रित अशा मध्यमवर्गीय समाजव्यवस्थेचा एक भाग होतो. आमच्या जीवनातील समस्या सोडवण्यात आणि आशाआकांक्षा पुर्‍या करण्याच्या धडपडीत आम्ही इतके गुरफटून गेलो होतो की आमच्या मदतीची गरज असणार्‍या या समाजाचा आम्हाला विसर पडला होता.

वृत्तपत्रे, कथा, साहित्य व इतर प्र्सारमाध्यमे यांच्याद्वारे झोपडपट्टीतील अस्वच्छता, रोगराई, दारिद्र्य, व्यसनाधीनता, गुन्हेगारी व गुंडगिरी या विषयी खरी, खोटी तसेच बर्‍याच वेळा अतिरंजित माहिती कानावर पडत असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस शक्यतो अशा वस्तीत जायला धजावत नाही. अशा झोपडपट्टीतील लोकच आपल्या घरात व बाजारात आपल्या संपर्कात येत असले तरी त्यांच्या वस्तीबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते. म्हणजे आपणच ती माहिती घेण्याचे टाळतो.  साहजिकच आपल्याला अशा झोपडपट्टीबद्दल एक अनामिक भीती वाटत असते.

नोकरी धंद्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक लोक आपली घरे दारे सोडून शहराच्या आश्रयाला येतात. शहरात त्यांना काम मिळाले तरी राहण्यासाठी जागा नसते. जागा विकत वा भाड्याने घेण्याइतकी त्यांची ऎपतही नसते. मग असे लोक सरकारी वा मोकळ्या जागांवर झोपड्या बांधून राहू लागतात. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात बहुतेक टोलेजंग आणि आकर्षक इमारतींना अशा झोपडपट्टीचा वेढा पडलेला असतो. कारण इमारतीतील लोकांच्या निवासी सेवा पुरविणार्‍या गरीब कर्मचार्‍यांना राहण्याची काहीच सोय नसल्याने भोवतालच्या मोकळ्या जागांवरच झोपड्या बांधून ते राहतात.  जागा कमी व वस्ती अधिक असल्याने एकमेकांना चिकटून आणि अगदी कमी रुंदीचा रस्ता ठेवून या झोपड्या बांधलेल्या असतात. अशा अनाधिकृत जागांवरील झोपड्यांना महापालिकेकडून रस्ते, पाणी, ड्रेनेज या सुविधा देण्यात अडचणी येतात.  साहजिकच कचरा, सांडपाणी,अस्वच्छता वाढून  अशा झोपडपट्टीत रोगराईचा प्रसार होतो.

  झोपडपट्टीतील लोकांचे  जीवन सुधारले नाही तर त्याचा आपल्या सर्व समाजालाच  धोका निर्माण होऊ शकतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. झोपडापट्टी निर्मूलनाच्या व त्याजागी स्वत:ची घरे बाधून देण्याच्या अनेक महत्वाच्या योजना सरकारने सुरू केल्या आहेत पण त्यांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात तरी आपल्याला आहे त्या झोपडपट्ट्यांचे आपल्या नजिकचे अस्तित्व स्वीकारावे लागेल. काही ठिकाणी शहर सौंदर्याच्या कल्पनेतून झोपडपट्ट्या दिसू नयेत यासाठी भिंत बांधलेली आढळते. पण त्यामुळे दृष्टीआड सृष्टी झाली तरी तेथील प्रदूषण, रोगराई, गुन्हेगारी यांचा त्रास सार्‍या समाजाला व परिसराला भोगावा लागतो हे विसरून चालणार नाही. आपण त्यांच्यापासून फटकून वागलो तरी त्यांचा सहवास टाळणे आपल्याला अशक्य आहे. आपली मुले, महिला यांची सुरक्षितता वा आरोग्य धोक्यात येऊ शकते.    शिवाय तेथे राहणारीही आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांनाही लहान मुले, महिला, संसार आहे. त्यांना दिवसरात्र अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  याचा समाजधुरिणांनी गांभिर्याने विचार करावयास हवा. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सेवासुविधा देऊन त्यांचे जीवन सुसह्य केले तर सार्‍या समाजालाच त्याचा फायदा होईल.

स्मार्ट व इकोफ्रेंडली नव्या शहरांची उभारणी करताना वा असलेल्या शहरांत विकास प्रकल्प राबविताना सर्वप्रथम झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील दरी अधिक रुंदावेल आणि सारे समाजस्वास्थ्यच धोक्यात येईल.

No comments:

Post a Comment