Sunday, September 7, 2014

क्लाउड (Cloud Services) म्हणजे काय ?



 सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, कॉम्प्युटरने जीवनाच्या सर्व क्षेत्रात एक मानाचे स्थान मिळविले आहे. माहितीचे संकलन, वर्गीकरण, त्यावर आवश्यक त्या गणिती प्रक्रिया करून उपयुक्त निष्कर्ष अहवाल करण्याचे जटील काम कॉम्प्युटरच्या साहाय्याने अगदी कमी वेळात बिनचूक होत असल्याने शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, व्यवस्थापन, संशोधन एवढेच नव्हे तर शेती तसेच आर्थिक, सामाजिक क्षेत्रातही  कॉम्प्युटरचा वापर ही एक आवश्यक गोष्ट बनली आहे.

व्यक्तीगत कामासाठी एक कॉम्प्युटर पुरेसा असला तरी इतर मोठ्या शैक्षणिक, औद्योगिक व्यापारी संस्थांमध्ये अनेक कॉम्प्युटर लागतात त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगळा कुशल कर्मचारी वर्ग यांची योजना करावी लागते. कॉम्प्युटरचे कार्य  व्यवस्थित चालावे यासाठी एअर कंडिशनर, इन्व्हर्टर तसेच मोडेम   इतर नेटवर्कींगची साधने यांची व्यवस्था करावी लागते. कॉम्प्युटर्समध्येही  सर्व्हर थिन क्लायंट किंवा एकत्र जोडलेले स्टँड अलोन  डेस्कटॉप असे विविध प्रकारचे क्षमतेचे कॉम्प्युटर्स वापरले जातात

केवळ कॉम्प्युटर विकत घेतले तरी तेवढ्यावर भागत नाही. ते कार्यान्वित करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम त्यावर स्थापित करावी लागते. लिनक्स या मुक्त प्रणाली एवजी विंडोज सारखी सिस्टीम वापरावयाची असेल तर तिचे सर्व लायसेन्स कॉम्प्युटर्ससाठी विकत घ्यावे लागते. कॉम्प्युटरचा वापर करण्यासाठी एमएस ऑफिस सारखे सॉफ्टवेअरही विकत घेणे आवश्यक असते. तसेच व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी वेगळे सॉफ्टवेअर लागते. कॉम्प्युटर हार्डवेअरचे सॉफ्टवेअरचे ज्ञान असणारा कुशल कर्मचारी वर्ग नेमला तरी तंत्रज्ञानात होणार्‍या बदलांची माहिती होण्यासाठी त्यांच्या  प्रशिक्षणाची व बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे कॉम्प्युटर साधनसामुग्रीत बदल करावे लागतात. शिवाय कॉम्प्युटर कार्यक्षम रहावेत यासाठी त्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठीही दरवर्षी बराच खर्च करावा लागतो.

एवढे केले तरी माहिती तंत्रज्ञानात होणार्‍या प्रगतीमुळे उद्योग वा संस्थेकडे असणारी कॉम्प्युटर व्यवस्था विकत घेतल्यानंतर थोड्याच दिवसात कालबाह्य ठरते व त्याचे पुन्हा नूतनीकरण करावे लागते. शिवाय ज्या संस्था वा उद्योगाच्या शाखा अनेक ठिकाणी कार्यरत असतात त्यांच्याबाबतीत  प्रत्येक ठिकाणी अशा कॉम्प्युटर विभागाची व्यवस्था करावी लागते. तरीही ऑफिसपासून दूर गेलेल्या व्यावसायिकास वा विक्रेत्यास अशा कॉम्प्युटर व्यवस्थेचा लाभ घेता येत नाही.

 या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याच्या प्रयत्नातून क्लाउड संकल्पनेचा उदय झाला.  कॉम्प्युटर यंत्रणा, ऑपरेटिंग सिस्टीम व सॉफ्टवेअर यांची इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देण्याची योजना म्हणजेच क्लाउड प्रणाली. क्लाउड म्हणजे ढग. मेघदूत या कालिदासाच्या काव्यरचनेत यक्ष आपल्या प्रेयसीला मेघावाटे संदेश पाठवतो. त्यासारखेच पण संदेशाबरोबर माहितीतंत्रज्ञानाच्या सर्व सुविधा पुरविणारी ही विश्वव्यापी व्यवस्था आता प्रचलित कॉम्प्युटरव्यवस्थेस सक्षम पर्याय ठरणार आहे.

माहितीचा साठा व गणिती प्रक्रिया करणारी कॉम्प्युटर मशिन्स व तत्संबंधित हार्डवेअर यांचे व्यवस्थापन, ऑपरेटिंग सिस्टीम व सॉफ्ट्वेअर प्लॅटफॉर्म  यांची सुविधा व प्रत्यक्ष व्यवसायासाठी लागणार्‍या  सॉफ्टवेअरची सेवा या तीनही वेगवेगळ्या कार्यांसाठी अनेक उद्योगसंस्था प्रगत देशात स्थापन झाल्या असून इंटरनेटच्या माध्यमातून भाडेतत्वावर या सेवा कोठेही व कोणासही वापरता येणे आता शक्य झाले आहे.

वरील तीन प्रकारच्या सेवांना IAAS – Infrastructure as a Service, PaaS – Platform as a Service आणि SaaS – Software as a Service असे म्हणतात.माहिती साठविण्यासाठी क्लाउड स्टोअरेज, क्लाउड प्लॅटफॉर्म व माहितीचे विश्लेषण करण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग या नावानीही या सेवा ओळखल्या जातात.
 

माहितीतंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रातील हार्डवेअर, सॉफ्टवेअर व त्याचे नियंत्रण करणारा तज्ज्ञ कर्मचारी यात बदल करणे संस्थांना सहज शक्य होते. माहिती सुरक्षित रहावी यासाठी त्याच्या प्रती विविध कॉम्प्युटर्सच्या हार्डडिस्कवर ठेवणे माहितीच्या आकारमानाप्रमाणे वा संकलनाच्या गतीप्रमाणे अशा कॉम्प्युटर्सच्या संख्येत कमीजास्त बदल करणे व विनाविलंब ग्राहकास आवश्यक निष्कर्ष अहवाल उपलब्ध करून देणे यासाठी हडूप (Hadoop)  वा तत्सम प्रणालीचा वापर केला जात असल्याने ग्राहकाच्या गरजेनुसार व तेवढाच वेळ साधनसामुग्रीचा वापर होत असल्याने ग्राहकास वाजवी खर्चात आपले सर्व काम करता येते. शिवाय स्वतंत्र कॉम्प्युटर यंत्रणा व त्याचे कायमस्वरुपी व्यवस्थापन  करावे लागत नसल्याने खर्चात बचत होते.

No comments:

Post a Comment