Sunday, September 7, 2014

क्लाऊड वापरातील अडचणी



क्लाउड सेवेचा भाडेतत्वावर वापर करणे कमी खर्चाचे व स्थानिक कॉम्प्युटर व्यवस्थेपेक्षा अधिक विश्वसनीय असले तरी  हे तंत्रज्ञान नवे व अपरिचित असल्याने याचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यात बर्‍याच मानसिक व तांत्रिक अडचणी आहेत.

यातली सर्वात महत्वाची अडचण ही कॉम्प्युटर व्यवस्थापनातर्फेच निर्माण केली जाते. तेथील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आपले सर्व काम दुसर्‍या बाहेरच्या संस्थेकडे सुपूर्त करायला तयार होत नाही कारण क्लाउड सेवेमुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट येऊ शकते. त्यामुळे क्लाउडच्या वापरामुळे आपल्या उद्योगाची संवेदनक्षम माहिती स्पर्धक व्यावसायिकांच्या हातात पडण्याचा वा बाहेर फुटण्याचा धोका आहे. आपल्या माहितीवर आपले नियंत्रण राहणार नाही वा आपण परावलंबी होऊ अशी कारणे पुढे करून आहे ती व्यवस्थाच पुढे चालू रहावी याचा ते प्रयत्न करतात. उद्योग व्यवस्थापनाने याबाबतीत स्वतंत्रपणे त्रयस्थ तज्ज्ञ सल्लागारांकडून क्लाउड सेवेच्या फायद्यातोट्यांविषयी माहिती घेऊन  उद्योगाच्या प्रगतीसाठी व आर्थिक बचतीसाठी योग्य तो निर्णय  घेण्याची  आवश्यकता आहे.

पूर्वी कोणत्याही कारखान्यामध्ये यंत्रे चालविण्यासाठी बाष्पशक्तीचा उपयोग केला जाई. त्यावेळी कोळसा वाहक पट्टॆ,  बॉयलर, सॉफनर, चिमणी, प्रदूषण नियंत्रक व्यवस्था यांची उभारणी करावी लागायची. ही यंत्रणा चालविणार्‍या कर्मचार्‍यांचा या व्यवस्थेत बदल करायला विरोध असायचा. पण तरीही विजेवर चालणार्‍या नव्या यंत्रांचा विकास झाल्यावर उद्योगानी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून विजेचा वापर करण्यास सुरुवात केली. अगदी तसाच बदल कॉम्प्युटरच्या बाबतीत क्लाउड सेवेमुळे होऊ शकेल.

अर्थात यासाठी क्लाउड सेवेविषयी उपस्थित केल्या जाणार्‍या सर्व आक्षेपांना व शंकांना समाधानकारक स्पष्टीकरण मिळून या नव्या व्यवस्थेविषयी ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. क्लाउड सेवेचे कार्य कसे चालते. त्यात माहिती सुरक्षा, अचुकता तसेच कार्यक्षमतेतील सातत्य ठेवण्यासाठी कोणकोणत्या स्वयंचलित साधनसुविधांची व सॉफ्टवेअर प्रणालीची सोय केलेली असते याची तपशीलवार माहिती व्यवस्थापकांना सहज समजेल अशा भाषेत प्रसिद्ध करण्याची खबरदारी अशा सेवा पुरविणार्‍या संस्थांनी घेतली पाहिजे. तसेच अशा सेवेसाठी घेतले जाणारे शुल्क उद्योगास कसे किफायतशीर होईल याचीही तुलनात्मक माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 

तसेच याविषयी चर्चासत्रे, परिसंवाद, उद्योजक मेळावे आयोजित करून प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या संस्थांच्या मदतीने प्रबोधन करणे उपयुक्त ठरू शकेल. 

सध्या कार्यरत असणार्‍या उद्योग वा संस्था अशा बदलास तयार होणे अवघड असले तरी नव्या उद्योगांना हा पर्याय त्यातील अंगभूत फायद्यांमुळे अधिक आकृष्ट करू शकेल. या नव्या उद्योगांच्या अनुभवांवरून जुन्या व्यवस्थांमधील बदलास सुरुवात होईल.

No comments:

Post a Comment