आपल्याला असे वाटते की संपत्ती, अधिकार व सत्ता काय खरे व काय खोटे हे ठरवू शकतात. कारण माणसांची बुद्धीच काय पण मनेही सहज विकत घेता येतात व सत्ताधीशाचीही अशी समजूत असते की तो जे सांगतो ते सत्य म्हणून सर्वांनी स्वीकारावे. मात्र प्रत्यक्षात अनुभव असा येतो की सुरुवातीच्या काळात सत्ताधीशाला यश आल्याचे दिसत असले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो व सत्यच सत्ताधीश ठरविते.म्हणूनच आपण म्हणतो. ‘सत्यमेव जयते।’.
आज इजिप्तमध्ये जे घडत आहे हे त्याचेच निदर्शक आहे. सर्व सत्ताधीश होस्नी मुबारकांच्याविरुद्ध सामान्य जनतेने अत्याचार व पोलिसी दडपशाहीला न जुमानता उठाव केला व सत्ताधीशावर पाय उतार होण्याची वेळ येऊन ठेपली. महात्मा गांधी यांनीही आपल्या शांततामय सत्याग्रहाच्या जोरावर ब्रिटीश राज्यसत्तेला भारतातून हाकलून लावले.
महापराक्रमी रावणाने सीतेला पळवून नेले. आपल्या सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर सीतेला वश करण्याचे स्वप्न तो पाहू लागला. मात्र सीतेने त्याला झिडकारले एवढेच नव्हे तर रामाने माकडांच्या सेनेची मदत घेऊन रावणाचे सोन्याच्या लंकेतील राज्य नेस्तनाबूत केले. श्रीकृष्णाकडून मागून घेतलेल्या अवाढव्य सेनेच्या मदतीने पांडवांचा सहज पराभव करता येईल असे कौरवांना वाटले होते. मात्र पांडवाम्ची बाजू सत्याची असल्याने श्रीकृष्ण स्वतः त्यांच्याबाजूने उभा राहिला व या युद्धात कौरवांचा पराभव झाला.
जगातील सर्व अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये योग्य कारणासाठी सत्ताधीश व प्रबळ शत्रूशी संघर्ष करणार्या गरीब व दुबळ्या लोकांचाच विजय होतो हे दर्शविलेले असते. डेव्हीड आणी गोलियाथ ही प्रसिद्ध गोष्ट सर्वांना माहीत आहेच. एवढेच काय उंदीर-मांजर वा मांजर-कुत्रा या जोड्यांवर आधारित कॉमिक चित्रकथातूनही हाच संदेश दिला जातो.
हे सर्वांना ठाऊक असले तरी सत्ताधीश इतरांवर आपली मते लादण्याचा, जमिनी व संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करीतच असतात हे खेदाने नमूद करावेसे वाटते. अर्थात यात त्यांनाही दोष देता येणार नाही. कारण त्यांचे म्हणणे खरे आहे व कृती योग्य आहे अशी भ्रामक समजूत त्यांच्या भोवतालचे स्वार्थी स्तुतीपाठक व पगारी सेवक त्याना करून देत असतात.
याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केल्यास बळाच्या वा आमिषाच्या जोरावर अधिक सत्ता मिळविण्याचा हव्यास करणे ही सत्ताधीशाची मानसिकताच बनलेली असते असे लक्षात येते. या हव्यासाच्या धुंदीत पैसा, अधिकार व सत्ता यांचे एकत्रीकरण चिरस्थायी कधीच होऊ शकत नाही व त्याचा र्हास अटळ आहे हे सत्ताधीशास समजत नाही.
यावर उपाय म्हणजे स्वार्थी विचारांपासून फारकत घेऊन सत्य परिस्थितीची जाणीव करून घेणे व त्याचा उदार अंतःकरणाने स्वीकार करणे. असे झाले तर निष्कारण होणारे संघर्ष, अत्याचार, दडपशाही, अन्याय यांना आळा बसेल व हट्टाग्रहापोटी होणारे प्रचंड आर्थिक नुकसान वा पूर्ण विनाश टाळता येईल.
म्हणून सर्वांनी हे लक्षात ठेवावे की सत्ता सत्य ठरवू शकत नाही तर सत्य हे स्वयंभू असते व तेच सत्ता ठरविते.
No comments:
Post a Comment