Tuesday, November 2, 2010

माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा

प्राचीन काळी साधुसंतांना आपल्या मनःचक्षूने जगातील सर्व घटना पाहता यायच्या अशी आपली दृढ समजूत आहे. धृतराष्ट्राला संजयाने कौरव-पांडव युद्धातील प्रसंग याच शक्तीने प्रत्यक्ष बघून सांगितले असे महाभारतात म्हटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला याच शक्तीने सार्‍या विश्वाचे दर्शन घडविले होते. शंकराला तिसरा डॊळा असतो व त्याने तो उघडला की समोरचे सर्वकाही तो क्षणार्धात भस्म करू शकतो असेही आपल्या पुराणांत म्हटले आहे. या सर्व शक्तींचा प्रत्यय आता माहिती तंत्रज्ञानाने होऊ लागला आहे.

आज मोबाईलवरून आपण कोणासही व कोठेही संपर्क करू शकतो. इंटरनेटवरील स्काईपसारख्या सुविधा वापरून जगात कोठेही असणार्‍या आपल्या मित्राशी वा नातेवाईकाशी दृश्य स्वरुपात भेटू शकतो. थ्री डी तंत्रज्ञानाने आता अशा सर्व संपर्क सुविधात अधिक जिवंतपणा येऊ लागला आहे. गुगलने आपल्या वेबसाईटवरून सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो प्रदर्शित करून सार्‍या जगाचे दर्शन घरबसल्या घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पुस्तक वाचण्यासाठी आता ग्रंथालयात जाण्याची गरज नाही ते आपण नेटवरून वाचू शकतो. आता कोणत्याही ठिकाणच्या रस्त्यावरून हिंडण्याचा, दुकानात खरेदी करण्याचा वा कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेण्याचा अनुभव आपण एका जागी बसून घेऊ शकतो. जगातील सर्व घटना टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला लगेच पाहता येतात. माहिती तंत्रज्ञानात अशा अनेक सुविधा निर्माण होत आहेत.

मला याबाबतीत एका वेगळ्याच विषयाशी याचा संदर्भ जोडायचा आहे. देवादिकांना व साधुसंतांनाच शक्य असणारी ही विद्या आता सर्व सामान्य माणसाला प्राप्त करून देण्याचे महत्वाचे कार्य माहिती तंत्रज्ञानाने केले आहे. माहितीचा केवळ अधिकार असून चालत नाही. प्रत्यक्षात माहिती मिळाली पाहिजे असे आपण म्हणतो. ते काम आता माहिती तंत्रज्ञान करू लागले आहे.

पूर्वी मी एक ‘गोल्डफिश’ नावाची विज्ञानकथा वाचली होती. त्यात एक शास्त्रज अपारदर्शक वस्तूच्य़ा पलिकडचे पाहू शकणार्‍या यंत्राचा शोध लावतो. मात्र या यंत्राचा प्रसार झाला तर माणसाला आपले खासगी आयुष्य राहणार नाही. काचेच्या बाउलमध्ये ठेवलेल्या गोल्डफिशसारखी त्याची स्थिती होईल या भीतीने सरकार ते यंत्र नष्ट करते. आज अशी पारदर्शकता माहिती तंत्रज्ञान आपल्याला देऊ करीत आहे.

अंधारात, निर्मनुष्य जागेत वा गुप्तपणे कोणतीही कृती झाली तरी त्याचा छडा लावण्याची शक्ती माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केली आहे. भ्रष्टाचारात तर कमीत कमी दोन माणसांचा संबंध असतो. प्रसारमाध्यमांच्या स्टिंग ऑपरेशनमधून असे अनेक प्रकार लोकांसमोर आले आहेत. गुप्त कॅमेर्‍यामुळे चोरही पकडले जातात. गुन्हेगारही सापडतात.

आज समाजात कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार वाढला आहे असे आपण म्हणतो. माझे मत असे आहे की भ्रष्टाचार पूर्वीही कमी प्रमाणात असेल पण अस्तित्वात होता मात्र तो कोणालाच कळायचा नाही. आता कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे त्याचे भयावह रूप आता आपल्यासमोर येत आहे. ‘Atlos Shrugged’ या कादंबरीच्या सुरुवातीस लिहिलेला प्रसंग मला आठवतो. ऑफिस सुटल्यावर घरी जाताना चौकात नेहमीच्या पाहण्यातील एक भला मोठा वृक्ष कोसळलेला दिसतो. त्याच्या भव्यतेचे कौतुक करणारी जनता आश्चर्याने त्याच्या भोवती गोळा होते. प्रत्यक्ष झाडाचा तुटलेला बुंधा पाहिल्यावर मात्र आतून वाळवीने सारे झाड पोखरले गेले होते हे लोकांच्या ध्यानात येते. सध्या आपल्याला तसाच काहीसा अनुभव येत आहे. मात्र झाड पडण्याअगोदरच आपल्याला आतली पोकळी आता दिसू लागली आहे. ही चांगली गोष्ट आहे.

उच्च पदस्थ भ्रष्टाचारामुळे जनता हैराण व हताश झाली असली तरी माहिती तंत्रज्ञानाने या जनतेला हा तिसरा डोळा दिला आहे. या डॊळ्यात दुहेरी ताकत आहे. ती आता सर्व काही पाहू शकते व कोणालाही सत्तेवरून खाली खेचू शकते. कोणाचाही व कोणताही भ्रष्टाचार व गैरकृत्य आता लपून राहणार नाही. वेळीच सावध होऊन त्यापासून दूर राहिले तरच धडगत आहे. अन्यथा शंकरासारखा तिसरा डोळा उघडून सर्व नष्ट करण्याचे अचाट सामर्थ्य माहिती तंत्रज्ञानाने जनतेला बहाल केले आहे.

कदाचित हे सामर्थ्य आधी आपल्याला मिळाले असते तर आंतरराष्ट्रीय गुप्त कारस्थाने, हिटलरची हुकुमशाही, रशियातील छळवणूक छावण्या, महायुद्धे, गुलामगिरी याना वेळीच अटकाव करता आला असता. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिगत अधिकार यांचे सत्तेच्या जुलमी राजवटीपासून संरक्षण करता आले असते. माहिती तंत्रज्ञान हे कलियुगातील स्वैर व स्वार्थी सत्ताधीशांचा नाश करून पुनः सत्ययुगाची सुरुवात करण्यासाठी जनतेच्या हातात दिलेले अमोघ शस्त्र आहे. परशुरामासारखा त्याचा वापर जनतेने करायला हवा.

परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे म्हटले जाते. इतक्यावेळा त्याला हे का करावे लागले व नंतरही तो सुव्यवस्था लावण्यात अयशस्वी का झाला याचा शोध घेतला तर सत्तेची अभिलाषा व सत्ता मिळाल्यावर अहंकार ही मानसिक प्रवृत्ती आहे व त्याच्याशी सतत लढण्याची आवश्यकता आहे.हे लक्षात येते. 'To err is human' असे म्हटले जाते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत ह. वि. कामत यांनी आपल्या भाषणात ‘माणसाचे पाय मातीचे असतात. त्याला देवत्व देऊ नका.’ असा इशारा दिला होता. त्यामुळे सध्या जे व्यक्तिपूजेचे स्तोम माजविले जात आहे ते चुकीचे आहे. बहुसंख्य जनता नेहमी निष्पक्षच राहिली पाहिजे. कोणीही सत्तेवर आला की तो अहंकारी होणार व स्वार्थी कृत्ये करणार हे गृहीत धरून जनतेने त्याला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा आपल्यावर नजर ठेवून आहे हे त्याला लक्षात आले म्हणजे त्याचे वर्तन आदर्श व लोकाभिमुख राहू शकेल.

No comments:

Post a Comment