Tuesday, November 23, 2010

छंदातून अर्थप्राप्ती करून देणारी वेबसाईट

सांगलीचे श्री. शरद आपटे यांचा पक्षी निरिक्षणाचा छंद गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू आहे. सांगली बॅंकेतील आपली नोकरी सांभाळून शनिवार, रविवार वा सुट्ट्यांच्या काळात ते रानोमाळी भटकून पक्षी निरीक्षणाचा व पक्षांचे आवाज ध्वनीमुद्रीत करण्याचा आपला छंद जपत असतात. बलभीम व्यायाम मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी व इतर हौशी पर्यटकांसाठी ते पक्षी निरीक्षण सहलीही आयोजित करतात.

पक्षांच्या आवाजाच्या ध्वनिमुद्रिका च सीडी त्यांनी तयार केल्या आहेत. मात्र त्यांच्या विक्रीबाबत त्याना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. दुकानात सीडी ठेवून त्याची माहिती न कळल्याने विक्रीही फारशी झाली नाही. त्यांचे कार्यही त्यांच्या ओळखीच्या व या क्षेत्रातील लोकांनाच माहीत होते. वेबसाईटचा याकामी काही उपयोग होईल याविषयी ते प्रथम साशंक होते. ज्ञानदीपने त्यांची वेबसाईट केल्यावर त्यांचे नाव तर सर्वांना माहीत झालेच जगभरातील पक्षीप्रेमींना त्यांच्या कार्याची ओळख झाली. ठिकठिकाणी त्यांना भेटीचे निमंत्रण येऊ लागले.

या वेबसाईटवर सुमारे ३०० पक्ष्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऎकायला मिळतात शास्त्रीय पद्धतीने त्याचे वर्गीकरण करून डाटाबेसवर आधारित वेब अप्लीकेशन केलेले असल्याने पक्षी अभ्यासकांना याचा चांगला उपयोग होतो. वेबसाईटच्या या यशामुळे सूक्ष्म आवाज ध्वनीमुद्रीत करणार्‍या यंत्राच्या कंपनीतर्फे जाहिरातीच्या स्वरुपात त्यांना आर्थिक मदत मिळाली.

वेबसाईटचा त्यांना खरा फायदा झाला तो सीडी विकण्यासाठी. केवळ बॅंकेच्या खात्याचे नाव देऊन सीडी विकण्याची सोय केल्याने त्यांच्या २००० वर सीडी विकल्या गेल्या. आता क्रेडीट कार्डच्या माध्यमातून अशा विक्रीसाठी विशेष वेब अप्लिकेशन करून घेण्याचा त्यांचा विचार आहे. यामुळे परदेशातील ग्राहकाम्ना या सिडी विकत घेणे सोपे होईल. वेबसाईटमुळे छंदाला अर्थप्राप्ती होते ती अशी.

बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाची वेबसाईट पाहिल्यावर कवी व संगीतकार यांना एकत्र आणून काव्याचे संगीतात रूपांतर करण्याची वेबसाईट करण्याचे काम श्री गिरीश मुकुल यांनी ज्ञानदीपवर सोपविले. तीन महिन्यांच्या अथक्‌ प्रयत्नांनी व अत्याधुनिक कोहाना फ्रेमवर्कचा उपयोग करून काव्य झाले गाणॆ या वेबसाईटची निर्मिती ज्ञानदीपने नुकतीच पूर्ण केली आहे. आता हौशी कवी व संगीतकारांच्या छंदांना अर्थप्राप्तीचे नवे साधन या वेबसाईटमुळे उपलब्ध झाले आहे.

सेवाभावी संस्थांना वरदान ठरणार्‍या वेबसाईट

समाजात दीनदलितांची सेवा करणार्‍या अनेक धर्मादाय संस्था काम करीत असतात. सधन व्यक्ती, व्यापारी व उद्योगांच्या देणग्यांवर वा शासकीय मदतीवर या संस्थांचे कार्य चालते. समाजातील अपंग, मूक बधिर, मतिमंद, अनाथ, वृद्ध अशा अनेक घटकांसाठी निःस्वार्थ बुद्धीने या संस्था चालविल्या जातात. या संस्थांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते. मात्र देणगी देऊ इच्छिणार्‍या व्यक्ती वा संस्थांपर्यंत त्यांचे कार्य पोचत नाही. याचे कारण प्रसिद्धी व संपर्कासाठी त्यांचेकडे पुरेसे पैसे नसतात. अशा संस्थांना वेबसाईट हे वरदान ठरू शकते.

सांगलीतील अपंग सेवा केंद्राची वेबसाईट ज्ञानदीपने पाच वर्षांपूर्वी तयार केली होती व त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी इंटरनेटचा फारसा प्रसार झाला नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही व दोन तीन वर्षातच तिचे कार्य थांबविण्यात आले.

जायंट्स ग्रुप व महापालिका यांच्या मदतीवर चालणार्‍या मूकबधिर मराठी मुलांची शाळा वेबसाईटचा आपली माहिती लोकांपर्यंत वेबसाईटद्वारे पोहोचविते व आता या शाळेने चांगला नाव लौकीक मिळविला आहे. वर्तमानपत्रांच्या रद्दीचा उपयोग करून पर्यावरण पूरक इकोबॅग करण्याचा व्यवसाय त्यांनी हाती घेतला असून त्याच्या प्रसारासाठी वेगळी वेबसाईट बनविण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. यासाठी सांगलीचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारे मा. दिलीप नेर्लीकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

कुपवाडच्या गौंडाजे पतीपत्नींनी आपल्या मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्यावर त्यास इतर पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व या शाळेचे रुपांतर अजिक्य फौंडेशन ह्या संस्थेत करण्यात आले. ज्ञानदीपमध्ये आर्थिक मदतीविषयी विचारणा करण्यास आलेल्या गौंडाजे यांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्ञानदीप करीत असलेल्या कार्याची माहिती झाली व लोकांपर्यंत आपल्या संस्थेचे कार्य पोहोचविण्यासाठी वेबसाईट हे प्रभावी माध्यम आहे हे लक्षात आले. ज्ञानदीपने त्यांची वेबसाईट तयार केली.
श्री. गौंडाजे यांना मोठ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने वेबसाईटसाठीही मार्केटींग लागते याची त्यांना जाणीव होती. राजकीय नेते,व्यापारी व मोठ्या कंपन्यांशी संपर्क करून व आपल्या संस्थेचे कार्य वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना दाखवून अजिक्य फौंडेशनला भरीव आर्थिक साहाय्य मिळविले. आता या संस्थेचा विस्तार करून वृद्धाश्रम व इतर सुविधा निर्मान करण्यासाथी एक कोटीचा प्रकल्प त्यांनी आखला आहे. या त्यांच्या कार्यात ज्ञानदीपच्या वेबसाईटचा खारीचा वाटा आहे.

सांगलीतील भगिनी निवेदिता या महिलांसाठी कार्य करणार्‍या सस्थेच्या व मा. शरद पाटील यांच्या पुढाकारातून चाललेल्या वृद्ध सेवाश्रमाच्या वेबसाईटचे काम सध्या चालू आहे.


इतर सेवाभावी संस्थांना वेबसाईटच्या उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Monday, November 22, 2010

सामाजिक संस्थांसाठी प्रभावी संपर्क माध्यम - वेबसाईट

शिक्षण, समाजसेवा, सांस्कृतिक कार्य, राजकारण, कला व क्रीडा अशा क्षेत्रात अनेक सामाजिक संस्था कार्य करीत असतात. अशा संस्थांकडून आपल्या सभासदांशी संपर्क ठेवण्यासाठी व कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी फोन करणे, पत्रे पाठविणे, छापील पत्रके वाटणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे वा बॅनर लावणे या पद्धतींचा वापर केला जातो. त्यासाठी पुष्कळदा स्वतंत्र ऑफिस स्टाफ नेमलेला असतो त्यांच्या पगारासाठी, पोस्टेजसाठी, फोन, छपाई व जाहिरात यासाठी खर्चही बराच येतो. सभासदांच्या वर्गणीचा बराचसा हिस्सा या बाबींवरच खर्च होतो. त्यामुळे संस्थेच्या मुख्य कार्यासाठी पैसा अपुरा पडतो व वेळही बराच जातो. आता या सर्व कामांसाठी वेबसाईट हे अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचे माध्यम उपलब्ध झाले आहे. वेबसाईटमुळे केवळ संपर्काचेच काम होत नाही तर संस्थेविषयी सर्व माहिती, कार्यक्रमांचे फोटो सर्वांना उपलब्ध होतात. नवे सभासद मिळण्यास याची मदत होते.

ज्ञानदीपने खालील संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या आहेत त्यांचे अनुभव याबाबतीत पुरेसे बोलके आहेत.

  • मधुरंग वधुवर सूचक मंडळाची मराठी माध्यमातील वेबसाईट स्थानिक व इंटररनेटवर कार्य करू शकेल अशा सॉफ्टवेअरवर आधारित असून त्याचे डिझाईन पाच वर्षांपूर्वीच ज्ञानदीपने केले आहे. या वेबसाईटद्वारे सर्व जातीधर्माच्या लोकांना वधुवर निवडीविषयी माहिती पुरविते. आजही त्या वेबसाईटचा उपयोग करुन नावे नोंदविणारांची संख्या मोठी आहे.
  • सांगलीतील नूतन बुद्धीबळ मंडळ दरवर्षी बुद्धीबळाच्या अनेक स्पर्धा भरविते. भारतातील सर्व ठिकाणचे हौशी बुद्धीबळपटु यात भाग घेतात. या स्पर्धांची माहिती देण्यासाठी त्याना वेबसाईटचा फार उपयोग होतो.
  • मुंबईच्या इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनचे भारतातील सर्व राज्यात ५००० पेक्षा जास्त सभासद आहेत. त्यांच्यातर्फे दर तिमाहीला एक टेक्निकल जर्नल प्रसिद्ध केले जाते. तरी दरवर्षी होणार्‍या राष्ट्रीय संमेलनाची माहिती व विविध विभागात होणार्‍या कार्यक्रमांचे वृत्त देण्यासाठी वेबसाईटचा वापर केला जातो.
  • बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळास आपली वेबसाईट मराठीत हवी होती. ज्ञानदीपने तशी वेबसाईट त्यांना करून दिली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या व बहुतेक सदस्य या क्षेत्रातील तज्ज्ञ इंजिनिअर असणार्‍या संस्थेची वेबसाईट करणे तसे धाडसाचेच काम होते. सुदैवाने माझा मुलगा व सून त्यावेळी बंगलोरमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी तयार केलेली वेबसाईट त्यांना आवडली. प्रसिद्ध साहित्यिक अरूण साधू यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी श्री लिपी फॉंट वापरून केलेल्या त्या वेबसाईटचे रुपांतर आता युनिकोड फॉंट व आधुनिक सीएमएस टेक्नॉलॉजी वापरून केले आहे. यात नवी माहिती भरण्याचे काम संस्थेस स्वतः करता येते.
  • सांगलीचे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज १९४७ साली स्थापन झाले. या कॉलेजचे माजी विद्यार्थी आज भारतात व जगातील अनेक देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या सद्यस्थितीची माहिती पोहोचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची वेबसाईट ज्ञानदीपने गेली अनेक वर्षे चालविली आहे. यात माजी विद्यार्थ्यांना आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांची माहिती मिळू शकते. नवा सभासद म्हणून नोंदणी करता येते. माजी विद्यार्थ्यांचा डाटाबेस व आधुनिक सीएमएस यांचा वापर येथे केला असून फोटोगॅलरीसाठी फ्लॅश टेक्नॉलॉजी वापरली आहे.या वेबसाईटचे चित्र पूर्वीच्या लेखात दाखविले आहे.
मिरज एज्युकेशन समिती, वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी, लट्ठे एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या वेबसाईट ज्ञानदीपने डिझाईन केल्या आहेत. या संस्थांच्या कार्याची माहिती व कार्यक्रमांच्या सूचना सर्व घटक संस्था व कार्यकारी मंडळास पाठविण्याचे कार्य या वेबसाईटमुळे कमी खर्चात होतेच. शिवाय जनतेला संस्थेच्या कार्याची माहिती कळते.

Sunday, November 21, 2010

उद्योगवृद्धी व मार्केटींगसाठी वेबसाईट

महाराष्ट्र राज्य उद्योगधंद्यात आघाडीवर असणारे राज्य आहे. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर ही शहरे औद्योगिक शहरे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. मात्र येथील बरेचसे उद्योग मोठ्या उद्योगांना पूरक अशा वस्तूंचे उत्पादन करीत आहेत. त्यामुळे या उद्योगांचा विकास मोठ्या उद्योगांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहतो. एखाद्‌दुसर्‍या मॊठ्या उद्योगावर विसंबून न राहता त्यांच्या उत्पादनास जागतिक बाजारपेठ मिळू शकली तर येथील उद्योगांना स्थैर्य मिळेल त्यांचा विकास झपाट्याने होईल. यासाठी गुणवत्ता वाढीबरोबर मार्केटिंगसाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा उद्योगांनी आवर्जून करावयास हवा.

वेबसाईटद्वारा मार्केटींग करण्याचे फायदे आता बर्‍याच प्रगतिशील उद्योगांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे चांगली डायनॅमिक वेबसाईट डिझाईन करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. उद्योगातील व्यवस्थापन इतर संस्थांच्या मानाने अधिक कार्यक्षम असते. वेबसाईट तयार करताना त्याच्या अपेक्षित उपयोगाबाबत ते जागरूक व आग्रही असतात. जागतिक बाजारपेठेत त्यांच्या उद्योगाचे मुल्यमापन वेबसाइतवरूनच होत असते हे ते जाणतात. यामुळे वेबसाईट डिझाईन करताना उद्योगातील प्रमुख जबाबदार व्यक्ती त्यात विशेष लक्ष घालतात. वेबसाईट अद्ययावत कशी राहील याची ते काळजी घेतात नवनव्या डिझाईनचा ते स्वीकार करतात. साहजिकच वेबसाईट डिझाईन करणार्‍या संस्थेवर चांगली व उद्योगास उपयुक्त वेबसाईट करण्याची जबाबदारी येऊन पडते. याचा उद्योग व वेबडिझाईन करणारी संस्था दोघांनाही फायदा होतो.

उद्योगवृद्धीसाठी वेबसाईट तयार करताना त्याचे मुख्य उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असते. शेअर होल्डर्ससाठी करावयाच्या वेबसाईटमध्ये आर्थिक स्थैर्यावर भर असावा. तर उत्पादन मार्केटिंगसाठी करावयाच्या वेबसाईटवर उत्पादनाची गुणवत्ता, प्रकार, शॉपिंग कार्ट सुविधा असणे जरूर आहे. उद्योग संस्थापक, प्रगतीचा आढावा, इमारती व यंत्रसामग्रीचे फोटो, गुणवत्ता नियंत्रणासाठी वापरली जाणारी पद्धत, कामगार कल्याण, पर्यावरण व सामाजिक कार्याची माहिती यांचा समावेश असल्यास उद्योगाविषयी जनमानसात चांगली प्रतिमा तयार होते. स्थानदर्शक नकाशा, संपर्क फोन व ग्राहक अभिप्रायाची सोय अशा वेबसाईटवर करणे आवश्यक असते.

सुदैवाने ज्ञानदीपला उगार शुगर वर्क्स व पीसीई इलेक्ट्रोकंट्रोल्स या दोन मोठ्या उद्योगांच्या वेबसाईट डिझाईन करण्याची संधी मिळाली. उद्योग व्यवस्थापनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे व अभ्यासपूर्ण सूचनांमुळे वेबसाईट डिझाईन क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणण्यास प्रोत्साहन मिळाले व त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वेबसाईट तयार केल्यावर त्यांच्याकडून वेबसाईटची नवी कामे मिळाली. खाली उगार शुगर वर्क्सच्या वेबसाईटचे चित्र दाखविले आहे.

तीन वर्षांपूर्वी ही वेबसाईट तयार करताना कोणती रंगसंगती, को्णता फॉंट व कोनते फोटो वापरायचे याविषयी उगार शुगरच्या अधिकार्‍यांबरोबर अनेक बैठका झाल्या. फ्लॅश एनिमेशन ठरविण्यातही त्यानी महत्वाचे योगदान दिले. ही वेबसाईट झाल्यावर शिपच्या आकाराच्या शुगरक्यूबच्या जागतिक मार्केटिंगसाठी त्यांनी सुचविलेल्या फिल्मीशक्कर या कल्पक नावाची वेबसाईट आम्ही तशाच अभिनव पद्धतीने तयार केली. त्याचे चित्र खाली दिले आहे.

आता त्यांच्यासाठी एका अशाच मार्केटिंग रिसर्चच्या वेबसाईटचे काम आम्ही करीत आहोत.

पीसीई ईलेक्ट्रोकंट्रोल्स या वेबसाईटच्या कामातही आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. त्यानंतर त्यांच्या आणखी तीन वेबसाईटचे काम आम्ही पूर्ण केले. व्हिडिओक्लिप्सचा वापर करून व टेबललेस डीआयव्ही लेआउट करून आम्ही डिझाईन केलेली डेबोनायर इक्विपमेंट्स या उद्योगाच्या वेबसाईटमुळे ज्ञानदीपचे नाव उद्योगजगतात मान्यता पावले. अशाच उद्योगांच्या नाविन्यपूर्ण वेबसाईट करण्याचे काम आमच्याकडे चालून आले.

मात्र अजूनही वरील काही अपवाद वगळता उद्योजक वेबसाईट या प्रभावी माध्यमाचा आपल्या उद्योगवाढीसाठी उपयोग करताना दिसत नाहीत. याचे कारण त्यांना वेबसाईटचे फायदे अजून नीट समजलेले नाहीत असे वाटते. अशा उद्योजकांसाठी एखादी कार्यशाळा आयोजित करण्याचा ज्ञानदीपचा मनोदय आहे.

बांधकाम व्यवसायात वेबसाईटचे महत्व

वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले आहेत. पुण्यामुंबईसारख्या मोठ्या शहरांपासून नगर बारामतीसारख्या छोट्या शहरांपर्यंत, सर्वत्र नवी गृहसंकुले (रेसिडेन्शियल अपार्टमेंटस) उभी रहात आहेत. नोकरदारांचे पगार वाढल्याने व बॅंकांकड्न कर्ज मिळणे सुलभ झाल्याने अनेक लोक गरज म्हणून वा गुंतवणूक म्हणून नव्या फ्लॅटसाठी पैसे गुंतवीत आहेत. सुयोग्य फ्लॅटचा शोध घेण्याचे काम मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे. अपार्टमेंटच्या जागा गावापासून दूर व एकमेकांपासून फार अंतरावर असल्याने एजंटच्या मदतीने प्रत्यक्ष भेट देऊन फ्लॅटची निवड करण्यात फार वेळ जातो.

परगावच्या लोकांना तर ते अतिशय त्रासाचे काम असते. अशावेळी कोणाच्या ओळखीतून वा बिल्डरच्या कॅटलॉगमधील वा जाहिरातीतील फोटो पाहून फ्लॅटची निवड केली जाते. यात फसगत होण्याची वा दुसरा अधिक चांगला व किफायतशीर पर्याय उपलब्ध असूनही केवळ माहिती न कळल्याने योग्य निवड करण्याची संधी गमावली जाते. बिल्डर वा अपार्टमेंट मालकांना देखील संभाव्य ग्राहका्पर्यंत आपल्या अपार्टमेटविषयी सविस्तर माहिती व फोटो पोहोचविणे अवघड जाते व कॅटलॉग छापणे पार खर्चाचे काम असते. अशा कॅटलॉगद्वारे माहिती देण्यासही मर्यादा पडतात व ग्राहकाला प्रत्यक्ष अपार्टमेंट पाहण्याची संधी मिळत नाही.

सुदैवाने वेबसाईटद्वारे अशी सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देता येते. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून नकाशे, फोटो, व्हीडिओ गॅलरी यांचा समावेश अशा वेबसाईटमध्ये करता येतो. 3D walkthrough व एनिमेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीचा अनुभव ग्राहकास देता येतो. व्हिडीओ गॅलरी वा 3D एनिमेशनमध्ये तयार केलेली चित्रफीत दिसते. मात्र ग्राहकाला आपल्या मर्जीनुसार विविध भागांचे निरीक्षण करता येत नाही. यावर उपाय म्हणून अडोब कंपनीने वेबसाईटवर वापरता येण्याजोग्या फ्लॅश/फ्लेक्स तंत्र ज्ञानावर आधारित नव्या सुविधेचा विकास केला आहे. यासाठी FMS सर्व्हर वापरावा लागतो. या सुविधेत आपल्याला आपल्या इच्छेनुसार अपार्टमेंट वा बिल्डींगचे निरनिराळ्या दिशानी व कमीजास्त अंतरावरून निरीक्षण करता येते. यामुळे बांधकाम क्षेत्राला एक नवे प्रभावी प्रसारमाध्यम उपलब्ध झाले आहे. अर्थात या नव्या सुविधेनुसार बिल्डींग वा अपार्टमेंटचा फ़्लेक्स प्रोग्रॅम करण्याचे तंत्र फारच थोड्या लोकांना माहीत आहे. सुदैवाने ज्ञानदीपमधील वेब डिझाईनर्सनी हे कौशल्य प्राप्त करून घेतले आहे.

ज्ञानदीपने फ्लॅश तंत्रज्ञानाचा वापर सर्वप्रथम सांगलीतील खरे ग्रुप हौसिंग या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या वेबसाईटमध्ये केला होता. ग्राहकाच्या इच्छेनुसार अपार्टमेंट निवडून पाहण्याजोगे नकाशे व फोटोगॅलरी यांचा त्यात समावेश होता. दुर्दैवाने वेबसाईट कोणी पहात नाही व त्याचा काही उपयोग नाही या कल्पनेने ती वेबसाईट नवी माहिती घालून अद्ययावत ठेवण्याचे वा प्रत्येक जाहिरातीत त्याचा उल्लेख करण्याचे काम अपार्टमेंट मालकांकडून केले गेले नाही व ती वेबसाईट बंद करण्यात आली. अर्थात त्यावेळी म्हणजे चार वर्षांपूर्वी इंटरनेटची कनेक्शन फार थोड्या लोकांकडे होती. वेबसाईटविषयी तर फारशी माहिती कोणालाच नव्हती. त्यामुळे आमचे प्रयत्न वाया गेले. मात्र त्या निमित्ताने फ्लॅशच्या नवनव्या संशोधनाचा अभ्यास ज्ञानदीपमध्ये सुरू झाला. परदेशातून व चेन्नईहून अशा कामाची मागणी आली व त्या अनुभवाचे चीज झाले.

खाली खरे ग्रुप वेबसाईटची चित्रे दाखविली आहेत. त्यातील फ्लॅश एनिमेशन या ब्लॉग मध्ये दाखविता येत नाहीत.


यानंतर पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची वेबसाईट करण्याचे काम मिळाले. त्याचे चित्र खाली दिले आहे.

मात्र या वेबसाईटविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. आपल्या व्हिजिटींग कार्ड, लेटरहेड व इतर प्रसिद्धीपत्रकात त्याचा ठळकपणे उल्लेख करावयास हवा. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने वेबसाईटचा अपेक्षित फायदा व्यावसायिकास मिळाला नाही व वेबसाईटही बंद करण्यात आली.
यावरून आमच्या हे लक्षात आले की वेबसाईट करू इच्छिणार्‍या व्यक्तीला वेबसाईट मार्केटींगचे ज्ञान देणे आवश्यक आहे.
बांधकाम क्षेत्रातील सांगलीच्या इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स या संस्थेची वेबसाईट डिझाईन केली.(खाली चित्र पहा)
या वेबसाईटमुळे सांगलीतील आर्किटेक्ट्सना वेबसाईटच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येईल, कार्यक्रमांची सूचना देता येईल व बांधकाम वस्तू विक्रेत्यांच्या जाहिरातींद्वारे या वेबसाईटच्या खर्चाचा बोजा संस्थेवर पडणार नाही असे वाटले होते. तरी मोबाईलद्वारे संपर्क करण्याची सवय झाल्याने या वेबसाईटचा वापर करण्यात कोणी फारसा रस दाखविला नाही.

परदेशात रीअल इस्टेटच्या व्यवसायासाठी वेबसाईट हेच माध्यम मुख्यत्वे वापरले जाते त्याचा उपयोग ग्राहकांना घर निवडीपासून कर्जपुरवठा, सामान वाहतूक, अंतर्गत सजावट व इतर सर्व सेवा देण्यासाठी करण्यात येतो. या माध्यमाचा भारतात मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी वेबसाईटचे ज्ञान इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्सनी आत्मसात करण्याची गरज आहे.

Saturday, November 20, 2010

हॉस्पिटलसाठी वेबसाईट

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक हॉस्पिटलची स्वतःची वेबसाईट असणे आवश्यक बनले आहे. नोकरी व्यवसायामुळे लोकांना फार वेळ नसतो. पेशंटला तातडीने उपचार मिळण्याची ही आवश्यकता असू शकते अशा वेळी लोकांना नजिकच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली तर त्यांची चांगली सोय होऊ शकेल. हॉस्पिटललाही नवे पेशंट मिळू शकतील. हॉस्पिटल कोणत्या शरीरव्याधीविषयी आहे? त्यामध्ये पूर्णवेळ व भेट देणारे तज्ज्ञ डॉक्टर कोण आहेत? हॉस्पिटलमध्ये इतर काय सुविधा आहेत? अतिदक्षता विभाग, तातडीची रुग्णसेवा, रुग्णवाहिका, संपर्क फोन व माहिती कक्ष याविषयी माहिती नेटवरून मिळत असेल तर लोकांचा प्रवास खर्च व वेळ वाचेल. दुरचे रुग्णही आधी भेटीची वेळ निश्चित करून येऊ शकतील व हॉस्पिटलचा नावलौकीक वाढेल.

डॉक्टरच्या वेळेइतकेच महत्व पेशंटच्या वेळेलाही महत्व असते हे बहुधा कोणाच्याच लक्षात येत नाही. परिणामी आपला नंबर केव्हा येतो याची वाट पहात अनेक पेशंट व त्यांचे इतर नातेवाईक आपली सर्व कामे सोडून तासन्‌तास ताटकळत बसलेले असतात. हे दृश्य जवळजवळ प्रत्येक चांगल्या हॉस्पिटलमध्ये दिसते. खेडेगातून आलेल्या लोकांचे तर फारच हाल होतात. मात्र याकडे हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होते. त्यामुळे दूरवरच्या चांगल्या हॉस्पिटलपेक्षा जवळच्या कमी दर्जाच्या व पुरेशा सुविधा नसणार्‍या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणेच बहुधा लोक पसंत करतात. वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा असेल तर पेशंटना फार वेळ थांबायला न लागता वेळेत योग्य उपचार मिळू शकतील.

आजकाल विविध व्याधींवर एकाच ठिकाणी उपचार मिळणे शक्य व्हावे यासाठी अनेक डॉक्टरांच्या सहभागाने पॉलिक्लिनिक चालविली जातात. यात बरेच तज्ज्ञ डॉक्टर गावातील आपली प्रॅक्टिस सांभाळून थोड्या वेळापुरते अशा हॉस्पिटलमध्ये सल्ला देण्यासाठी येत असतात. त्यांच्या नावामुळेही अनेक पेशंट या हॉस्पिटलकडे आकर्षित होतात. पुष्कळ वेळेला हॉस्पिटलच्या बाहेर अशा डॉक्टरांच्या पाट्या वाचायला मिळतात. पण हॉस्पिटलपाशी आल्यावरच हे समजते. हॉस्पिटलपासून दूर वा परगावी राहणार्‍या लोकांना याची माहिती कळू शकत नाही. वेबसाईटच्या माध्यमातून अशी माहिती कोणालाही व कोठेही घरबसल्या कळू शकते. शिवाय अशा डॉक्टरांच्या भेटीची वेळ आधी समजू शकते.

हॉस्पिटलसाठी सॉफ्टवेअर
अशा पॉलिक्लिनिकमध्ये काही डॉक्टर पूर्ण वेळ काम करतात व त्यांच्यावर येणार्‍य़ा सर्व पेशंटवर उपचार करावे लागतात. पेशंटचा फॉलोअप घ्यावा लागतो. पेशंटच्या व्याधीविषयी व औषधोपचारासंबंधी सर्व माहिती पेशंटच्या केसपेपरमध्ये असते. ही माहिती विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने नेटवरून उपलब्ध करून देता आली तर अशा कामात अधिक सुलभता येईलच शिवाय फक्त सल्ला देण्यासाठी येणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांना आपल्या घरातून अशा पेशंटच्या प्रगतीवर नजर ठेवता येईल प्रसंगी औषधोपचारात बदल करता येईल. पूर्ण वेळ डॉक्टर व पेशंटही आपल्य़ा व्याधीविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसाईटच्या माध्यमातून चर्चा करू शकतील.

अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांनी रोगाचे केलेले निदान, सुचविलेली औषधे व पेशंटवर त्याचा झालेला परिणाम यांची नोंद हॉस्पिटलने ठेवण्याची व्यवस्था केली तर कालांतराने हॉस्पिटलकडे वैद्यकीय ज्ञानाचा एक अमूल्य ठेवा तयार होईल. त्याचा उपयोग नव्या डॉक्टरना तर होईलच शिवाय विशिष्ट रोगासाठी कोणती उपाययोजना प्रभावी ठरते याची माहिती नव्या पेशंटवर उपचार करताना उपयोगी पडेल.

हॉस्पिटलच्य़ा सुविधांविषयी व डॉक्टरांविषयी सर्व माहिती वेबसाईटवर असल्यास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल व लोकांचा हॉस्पिटल सेवेबद्दलचा विश्वास वृद्धींगत होईल.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात आरोग्यसेवा हा सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. आरोग्यविम्याच्या स्वरुपात हॉस्पिटल व वैद्यकीय सेवा यांना भरपूर अर्थ साहाय्य मिळते. तरीही औषधोपचाराचा खर्च कोणालाही परवडण्यासारखा नसतो. भारतात वैद्यकीय सेवेचा दर्जा उत्कृष्ट आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. मात्र हॉस्पिटलमधील सुविधा व व्यवस्थापन यात आपण फार मागे आहो. आपल्याकडेही आता सर्व आधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटल उभारली जाऊ लागली आहेत. आरोग्य सेवेशी आरोग्यविम्याची सांगड घालणार्‍या संस्थाही उदयास आल्या आहेत. अशावेळी व्यवस्थापनात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सूज्ञपणा प्रत्येक हॉस्पिटलने दाखविला पाहिजे. वेबसाईटद्वारे हॉस्पिटलची माहिती जनतेला उपलब्ध करून देणे व त्याद्वारे पेशंट व डॉक्टर यांच्यात प्रभावी संपर्क यंत्रणा करणे त्यासाठी आवश्यक आहे.

हॉस्पिटलच्या वेबसाईटवर खालील माहितीचा समावेश करता येईल.
१. हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीचा फोटो व स्थानदर्शक नकाशा
२. हॉस्पिटलच्या स्थापनेचा थोडक्यात परिचय
३. हॉस्पिटलमधील विविध विभाग, तेथील अत्याधुनिक सोयी व प्रयोग शाळा यांची माहिती व फोटो.
४. पेशंट दाखल करून घेण्याची पद्धत
५. आउटडोअर विभाग, डॉक्टरांचा परिचय व भेटीच्या वेळा व पेशंटसाठी इतर सूचना
६. तातडीची रुग्ण सेवा, रुग्ण्वाहिका, ब्लडबॅंक याविषयी माहिती.
७. संपर्क - महत्वाच्या विभागांचे फोन व इमेल
८. महत्वाच्या रोगांविषयी सर्वसाधारण माहिती व घ्यावयाची काळजी
९. डॉक्टरांचे लेख व सल्ला
१०. हॉस्पिटल - डॉक्टर - पेशंट संवादासाठी विशेष ऑन लाईन सुविधा

ज्ञानदीपने मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटल, सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल व सांगली येथील डॉ. लेंडवे यांच्या ओंकार होमिओ हॉस्पिटलच्या वेबसाईट बनविल्या आहेत. त्यांची चित्रे खाली दिली आहेत.
१. मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटल

२. सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज

वरील दोन्ही वेबसाईटमध्ये हॉस्पिटलविषयी माहिती आहे मात्र त्यात वरील लेखात व्यक्त केलेल्या ऑनलाईन संपर्क सुविधांचा अजून समावेश केलेला नाही.

सर्व मोठ्या हॉस्पिटल्सनी अशाप्रकारे आपली सर्व माहिती वेबसाइटद्वारे जनतेपर्यंत पोहोचविली तर त्या हॉस्पिटलना त्याचा फायदा होईलच पण लोकांची ही फार सोय होईल व वेळेचा अपव्यय टळून अधिक सुलभतेने रुग्णसेवेचा लाभ घेता येईल.

ग्रामविकासासाठी वेबसाईट

महाराष्ट्रातील अनेक गावात ग्रामविकासाची चांगली कामे झाली आहेत. रोजगार हमी योजना, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम योजना, सर्व शिक्षा अभियान अशा अनेक राज्य वा केंद्रशासनाच्या योजनांचा फायदा घेऊन आपल्या गावाची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न प्रत्येक गावातील पंचायत समिती करीत आहे. तरीही अशी प्रगती न झालेल्या गावांची संख्याही खूप आहे. याची कारणे पुष्कळदा योजनांची माहिती नीट न कळणे, गावकर्‍यांकडून आवश्यक तेवढा निधी गोळा न होणे व ग्रामविकासात अग्रेसर असणार्‍या गावांचा अनुभव सर्वांपर्यंत न पोहोचणे ही असू शकतात.
माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वेबसाईटचे नवे प्रसारमाध्यम वापरून वरील सर्व अडचणींवर मात करणे आता शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव जागतिक नकाशावर आणून तेथील योजनांसाठी व ग्रामविकासासाठी सर्वतोप्रकारची मदत मिळविण्यासाठी वेबसाईट हे प्रभावी व अत्यंत कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.

आज गावोगाव पुढार्‍यांच्या वाढदिवसांसाठी शुभेच्छाचे मॊठमोठे बॅनर झळकत असतात. या बॅनरला येणारा खर्च गावातील उत्साही कार्यकर्ते करीत असतात. या बॅनरच्या खर्चापेक्षाही कमी खर्चात गावाची सर्व माहिती वेबसाईटच्या माध्यमातून आपण जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवू शकतो. त्या गावात जन्मलेले पण सध्या परगावी वा परदेशात मोठ्या हुद्द्यांवर काम करीत असणारे वा उद्योग /व्यापारात यशस्वी झालेले लोक आपल्या जन्मगावासाठी मदत करण्यास इच्छुक असतात. त्यांच्यापर्यंत गावाची माहिती पोहोचविण्याचे कार्य वेबसाईटमुळे घडते व स्थानिक पुढार्‍यांवर विकासासाठी न अवलंबून राहता गावाला अशा लोकांकडून अर्थ साहाय्य मिळविता येते. स्थानिक भागाचा विचार केला तरी गावातील दुकानदार व व्यापारी यांच्या जाहिराती घेऊन गावाची वेबसाईट सुरू करणे सहज शक्य आहे.

गावाच्या वेबसाईटवर खालील माहितीचा समावेश करता येईल.
१. गावाचा नकाशा,
२. जिल्हा व तालुक्यातील स्थानदर्शक नकाशा
३. गावाची भौगोलिक व पर्यावरणविषयक माहिती
४. एस.टी. व रेल्वे वेळापत्रक
५. पंचायत समिती सदस्यांची नावे व फोटो
५. गावाचा इतिहास व प्रसिद्ध व्यक्तींची ओळख
६. महत्वाचे फोन नंबर
७. ग्रामपंचायत, देऊळ, समाजमंदिर, शाळा व इतर प्रेक्षणीय स्थळांचे फोटो
८. गावाचा विविध योजनांतील सहभाग
९. भविष्यकालीन विकास योजना व खर्चाचा अंदाज
१०. संपर्क
११. बातम्या व माहितीकक्ष
१२. जाहिराती - जाहिरातींच्या माध्यमातून गावाच्या वेबसाईटचा खर्च सहज भागू शकेल.

अशी वेबसाईट युनिकोड मराठी वापरून केली तर गुगलसारख्या शोध यंत्रावर केवळ गावाच्या नावावरून कोणासही शोधता येईल. गावाने केलेल्या विकासकामांची माहिती सर्व जगभर जाउ शकेल. परगावचे लोक गावाशी संपर्क साधू शकतील गावातील मुलांना नोकरी लागण्यासाठीही याचा उपयोग होईल. शाळेत वा ग्रामपंचायतीत असनार्या कॉम्प्युटरचा चांगला उपयोग होईल.याशिवाय ग्रामस्थांना या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होईल व सर्व माहिती कळू शकेल.

ज्ञानदीप फौंडेशनने अशीच एक वेबसाईट सांगली शहरासाठी केली आहे त्याची काही चित्रे खाली दिली आहेत.



आपणास आपल्या गावासाठी अशी वेबसाईट करावयाची असल्यास ज्ञानदीपशी संपर्क साधावा.

फीडबॅक फॉर्मचा उपयोग करून मेल पाठविणे

पीएचपी अथवा व्हीबीस्क्रिप्ट (एएसपी) वापरुन डायनॅमिक पेज केल्यास अभिप्राय कसा पाठविता येतो हे आपण पाहिले. मात्र युजरच्या कॉम्प्युटरवर outlook express सारख्या मेल पाठविण्याच्या सुविधेचा वापर करून फीडबॅक फॉर्ममधून मेल पाठविण्याची सोय करता येते. यासाठी फॉर्म टॅगमध्ये mailto: व post या शब्दांचा वापर करावा लागतो.
अशा एका प्रोग्रॅमचे कोड व त्याचे आउटपुट उदाहरणादाखल खाली दिले आहे.


प्रोग्रॅममध्ये value मध्ये लिहिलेली माहिती केवळ माहिती भरल्यावर आउटपुट कसे दिसेल हे दाखविण्यासाठी लिहिली आहे. प्रत्यक्षात ती माहिती आउटपुट च्या मोकळ्या रकान्यांत भरावी लागते. submit बटन दाबले की युजरच्या कॉम्प्युटरवरील outlook express द्वारे मेल पाठविली जाते.

Friday, November 19, 2010

फीडबॅक फॉर्म

डायनॅमिक वेबपेज
साध्या html पेजची तुलना एखाद्या छापलेल्या पानाबरोबर करता येईल. छापलेल्या जाहिराती जशा सर्वत्र वाटल्या जातात तसे सर्व ग्राहक( क्लायंट वा युजर) कॉम्प्युटर्सकडे सर्व्हरकडून html पेज पाठविले जाते. यामध्ये ग्राहकाला सर्व्हरशी संवाद साधता येत नाही. ग्राहकाचा अभिप्राय सर्व्हरकडे पाठविण्याची सोय स्टॅटिक (html) वेबपेजमध्ये नसते. याचे कारण त्यात कृतीशील प्रोग्रॅम नसतो. व्हीबीस्क्रीप्ट (VB Script) वा पीएचपी(PHP) सारखे प्रोग्रॅम वापरून ती कृतीशीलता त्यात आणली की कृतीशील डायनॅमिक वेबपेज तयार होते अशा डायनॅमिक वेबपेजेसचा समावेश वेबसाईटमध्ये केलेला असल्यास तिला डायनॅमिक वेबसाईट असे म्ह्टले जाते.

फीडबॅक फॉर्म
वाचकाचा अभिप्राय घेण्यासाठी जो फीडबॅक फॉर्म (Feedback Form) वापरला जातो. ते डायनॅमिक वेबपेज असते. यामध्ये फॉर्म (Form) हा टॅग वापरला जातो. फॉर्ममध्ये माहिती भरण्यासाठी मजकूर लिहिण्याची (input box) व पर्याय निवडण्याची ( radio button or check box) व्यवस्था, ती माहिती(अभिप्राय, सूचना वा प्रश्न) सर्व्हरकडे पाठविता यावी यासाठी एक सबमिट बटन व माहिती पाठविण्याची कृती करण्यासाठी action गुणविशेष यांचा समावेश केला जातो.

फॉर्म अदृश्यच असतो फक्त फॉर्म टॅगमधील माहिती ब्राउजरमध्ये दिसते. खाली माहिती भरण्याचे प्रकार(प्रोगॅम व आउटपुट) दाखविले आहेत मात्र सबमिट बटन व फॉर्मला action गुणविशेष नसल्याने ते कृतीशील नाहीत हे लक्षात ठेवावे.
माहिती लिहिण्यासाठी इनपुट टे्क्स्टबॉक्स


पर्याय निवडण्याची रेडिओ बटन

एकापेक्षा अधिक पर्याय निवडण्यासाठी चेक बॉक्स


एक सबमिट बटन व माहिती पाठविण्याची कृती करण्यासाठी action गुणविशेष यांचा समावेश केल्यानंतर तयार केलेल्या फीडबॅक फॉर्मचे एक उदाहरण खाली दाखविले आहे.

वरील प्रोगॅमचे आउटपुट ब्राउजरमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे दिसेल.

हा फीडबॅक फॉर्म झाला. त्यात भरलेली माहिती घेऊन सर्व्हरच्या माहिती कोषात साठविण्याचे व आवश्यकतेनुसार आलेल्या माहितीचा व सर्व्हरवरील माहिती कोषात असणार्‍या माहितीचा उपयोग करऊन नवे उत्तरादाखल वेबपेज करण्याचे काम form.action.php या डायनॅमिक वेबपेजद्वारे कसे केले जाते हे समजण्यासाठी पीएचपी प्रोग्रॅमिंग शिकावे लागणार आहे.

Thursday, November 18, 2010

वेबसाईटच्या इंडेक्स पेजचे डिझाईन

वेबसाईटचे इंडेक्स पेज म्हणजे वेबसाईट ब्राउजरमध्ये उघडल्यावर दिसणारे पहिले पान. एखाद्या दुकानाच्या दर्शनी भागात जशी दुकानाच्या नावाची पाटी व आकर्षक प्रवेशद्वार असते तसेच वेबसाईटचे इंडेक्स पेज हे आकर्षक व वेबसाईटचे नाव व मुख्य उद्देश स्पष्ट करणारे असणे असावे लागते. रस्त्यावरून जाणारे लोक दुकानाची पाटी व दर्शनी भाग पाहून आकृष्ट होतात व दुकानाला भेट देतात. त्याप्रमाणेच वेबसाईटला भेट देणारे वाचक पहिल्या पानावरूनच वेबसाईटचा अंदाज बांधतात. त्यामुळे या पानाच्या डिझाईनला फार महत्व असते. काहीवेळा दुकानाबाहेर चित्रकृती वा कारंजे असते. त्याप्रमाणे वेबडिझाईनचे पहिले पान उघडण्याआधी फ्लॅश स्क्रीन टाकून त्याद्वारे एखादी चित्रफीत (फ्लॅश प्रोग्रॅम वा व्हिडिओ फिल्म) दाखविली जाते. मात्र या चित्रफितीस वेळ लागत असल्याने ग्राहक दुसरीकडे जाऊ नये म्हणून चटकन पहिल्या पानावर जाण्यासाठी एक लिंक ठेवावी लागते. सध्याच्या घाइगर्दीच्या जमान्यामुळे अशी चित्रफीत दाखविण्याची पद्धत आता मागे पडली आहे.

ज्यांच्यासाठी वेबसाईट करावयाची आहे त्यांच्या आवडीनिवडीनुसार आकर्षक रंगसंगतीचे पहिले पान प्रथम फोटोशॉपमध्ये ग्राफिक डिझाईनरकडून तयार करून घेतले जाते. यात संस्थेचा लोगो, वेबसाईटचे नाव, आतील पानांच्या विभागवार लिंक असणारा मेनू व महत्वाच्या विभागांची ओळख करून देणार्‍या मजकुराची व चित्रांची आकर्षक मांडणी केलेली असते. यासाठी इंतरनेटवर उपलब्ध असणारे फोटो व चित्रे यांवर फोटोशॉपमध्ये योग्य संस्कार करून इंडेक्स पेज सारखे दिसणारे एकसंध चित्र तयार केले जाते. पर्याय निवडीस वाव रहावा यासाठी वेगवेगळ्या मांडणीची अशी तीन चित्रे करून त्यातून एका योग्य चित्राची निवड केली जाते. या चित्राचा इंडेक्स पेज म्हणून वापर करता येत नाही. कारण त्यावर वेगवेगळ्या लिक देता येत नाहीत.

या चित्राचे वेगवेगळे भाग व आकृत्या फोटोशॉपच्या स्लाईस टूल ने कापून त्याची वेगवेगळी अनेक चित्रे बनविली जातात. ही चित्रे html च्या टेबल वा div टॅग चा उपयोग करुन इंडेक्स पेजचे html पेज बनविण्यात येते. व त्यातील वेगवेगळ्या चित्रांना वा मजकुराला वेगवेगळ्या लिंक दिल्या जातात.
आता ज्ञानदीपने केलेल्या अशा इंडेक्स पेजेसची उदाहरणे पाहू.

१. डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर, सांगली च्या वेबसाईटचे इंडेक्स पेज

वरील पेजमध्ये निळ्या रंगाचे बॅकग्राऊंड ( पार्श्वभूमी) घेऊन मध्ये पिवळट पांढर्‍या रंगाची एक पट्टी घेतली व त्यात ठळक अक्षरात संस्थेचे नाव, इमारतीचा फोटो व लोगो यांची मांडणी केली. माजी विद्यार्थी, भविष्यकालीन स्वप्ने, सुवर्ण क्षण याविभागांसाठी समर्पक चित्रे वरच्या बाजूस तर अमृत महोत्सव, मुख्याध्यापक मनोगत, यशोधन व क्षणचित्रे या विभागांची चिन्हे खालच्या उजव्या बाजूस मांडली. पानाच्या मुख्य भागात डॉ. बापट बाल शिक्षण शाळेच्या स्थापनेविषयी थोडक्यात माहिती लिहिली. एका दृष्टीक्षेपात वेबसाईटच्या अंतर्गत माहितीची कल्पना देणारे असे हे पान आहे.

२. सांगली हायस्कूल, सांगली च्या वेबसाईटचे इंडेक्स पेज

येथे वरच्या बाजूस कमानीसारखी रचना करून वरच्या बाजूस लोगो, शाळेचे नाव व वेबसाईतचे नाव तर कमानीत वरच्या भागात शाळेची इमारत व मधल्या मुख्य भागात शाळेच्या संस्थापकांचा फोटो व स्थापनेविषयी माहिती दिली आहे.
३. हि. हा रा. पटवर्धन हायस्कूल, सांगली चे इंडेक्स पेज

वरील गुलाबी व लाल बॅकग्राऊंडच्या पेजमध्ये मध्यभागी लंबवर्तुळाकृती डिझाईनमध्ये शाळेची इमारत दाखवून सर्व विभागांच्या लिंक त्याभोवतीच्या वक्र आकृतीत मांडल्या आहेत. वरच्या पट्टीत शाळेचे नाव पांढर्‍या अक्षरात लिहिले आहे. खाली डाव्या बाजूस मा. राजेसाहेबांचा फोटो व उजव्या बाजूस शाळेतील एका कार्यक्रमाचे चित्र दाखविले आहे.

४. वालचंद इंजिनियरिंग कॉलेज, सांगली च्या वेबसाईटचे इंडेक्स पेज

येथे निळ्या रंगाचे डिझाईन वापरून वरच्या पट्टीत कॉलेजचे नाव, जागतिक दर्जाचे निदर्शक करणारी पृथ्वीची रेखांकित आकृती,इंजिनिअरिंगच्या स्थापत्य, यांत्रिकी व इलेक्ट्रीकल शाखांच्या निदर्शक चित्रांचा डिझाईनमध्ये उपयोग केला आहे. येथील मेनूदेखील आकर्षक स्वरुपात डिझाईन केला आहे. पहिल्या पानाच्या मुख्य भागात कॉलेजच्या इमारतीचा फोटो व लोगो यांना स्थान दिले आहे व कॉलेजविषयी थोडक्यात महत्वाची माहिती तसेच गौरवप्राप्त प्राध्यापकांचे फोटो दाखविले आहेत.

वरील उदाहरणांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारच्या डिझाईनमध्ये इंडेक्स पेज बनविता येते. हल्ली कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचे स्क्रीन अधिक रुंद असतात चित्र दाखविण्याची क्षमता व वेगही जास्त असतो. यामुळे मोठा एकच चांगल्या दर्जाचा फोटो घालूनही चांगले आकर्षक पेज करता येते.

५. माजी विद्यार्थी संघटना,वालचंद इंजिनियरिंग कॉलेज, सांगली च्या वेबसाईटचे इंडेक्स पेज

वरील पेजमध्ये एकच फोटो पेजला आकर्षक बनविण्यास पुरेसा होतो हे दिसते. फोटोच्या रुंदीपेक्षा स्क्रीन अधिक रुंद असल्यास राहिलेल्या जागेत संलग्नतेसाठी रंगाच्या पट्ट्या वाढतील असे डिझाईन करता येते.

Tuesday, November 16, 2010

शैक्षणिक संस्थेची वेबसाईट

महाराष्ट्र शासनाच्या, शिक्षण विभागाच्या वा विद्यापीठ/मंडळाच्या निर्बंधामुळे शाळा, महाविद्यालय वा शिक्षणसंस्था यांना स्वतःची वेबसाईट करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र वेबसाईट म्हणजे काय व त्याचा काय उपयोग होऊ शकतो याची माहिती नसल्याने विशेष पूर्वतयारी न करता केवळ अटींची पूर्तता करण्यासाठी घाईगडबडीत अननुभवी व्यक्तींकडून कमी खर्चात वेबसाईट करून घेतली जाते. अशा वेबसाईटचा संस्थेला फायदा न होता त्यावरील चुकीच्या वा अपुर्‍या माहितीमुळे संस्थेविषयीची प्रतिमा खालावण्याचा धोका उद्‌भवतो.

ज्ञानदीपने आतापर्यंत अनेक महाविद्यालये, शाळा व शिक्षण संस्थांच्या वेबसाईट डिझाईन केल्या असून त्या करीत असताना आलेल्या बर्‍यावाईट अनुभवांवर आधारित निष्कर्ष व चांगल्या वेबसाईटसाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शनपर माहिती खाली दिली आहे.

सर्वसाधारणपणे कोणत्याही शिक्षणसंस्थेची वेबसाईट तयार करताना त्यात खालील माहितीचा समावेश करावा लागतो.
१. संस्थेचे बोधवाक्य व लोगो
२. संस्थेच्या अध्यक्षांचा फोटो व संदेश
३. मुख्याध्यापक वा प्राचार्य यांचा फोटो व संदेश
४. संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास
५. संस्थेच्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे, फोटो व परिचय
६. शाळा / महाविद्यालयाच्या इमारतीचा फोटो
७. व्हिजन, मिशन
८. संस्थेची वैशिष्ठ्ये व गुणवत्ता निदर्शक प्रमाणपत्रे
९. स्थानदर्शक नकाशा
१०. विविध विभागांची माहिती - फोटो व माहिती
११. शिक्षक यादी, पद, शिक्षण, अनुभव, फोटो
१२. फोटोगॅलरी - कार्यक्रमांचे फोटो
१३. वाचनालय, क्रीडांगण, प्रयोगशाळा, छंदग्रह व इतर सुविधांची माहिती
१४. प्रवेशप्रक्रिया - अर्ज, अटी, तारखा
१५. अभ्यासक्रम
१६. वेळापत्रक, सुट्ट्यांची यादी, नियम व सूचना
१७. स्पर्धा व कार्यक्रम
१८. पारितोषिके, विद्यार्थी परिक्षा निकाल, गुणवत्ता यादी, पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे फोटो
१९. गुणवंत माजी विद्यार्थी - यादी, परिचय
२०. स्थानदर्शक नकाशा
२१. संपर्क पत्ता, फोन, इ-मेल ( विभागवार वा इतर आवश्यक पदांसाठी)
२२. सूचनाफलक विद्यार्थ्यांसाठी/पालकांसाठी/इतर लोकांसाठी
२३. शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी पाने
२४. संस्थेच्या भविष्यकालीन विस्तार योजना

वरील सर्व माहिती ( आवश्यकतेनुसार निवड वा फेरफार करून) संकलित करण्याचे काम फार वेळ घेणारे असते. शिवाय ही सर्व माहिती तपासून अधिकृत व बिनचूक आहे याची खात्री करणे जरूर असते. बर्‍याच वेळा वेबसाईट करण्याचे काम वेबडिझाईन करणार्‍या संस्थेवर सोपविल्यावर अशी माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. अर्धवट माहिती व नियोजनातील त्रुटी यामुळे वेबडिझाईनच्या कामात विलंब होतो. वेबसाईट लवकर होण्यासाठी संस्थेकडून छापील प्रसिद्धी पत्रके, जुने फोटो व छापील संदर्भ माहिती दिली जाते. यांचा वापर करताना टायपिंगच्या चुका होऊ शकतात. स्कॅनिंग केलेले फोटो नीट दिसत नाहीत. कामातील चुका व काम वेळेत पूर्ण न झाल्याचा ठपका वेबडिझाईन संस्थेवर येतो. वेळेत वेबडिझाईन सुरू न झाल्याने शिक्षण संस्थेचेही नुकसान होते.

या गोष्टी टाळण्यासाठी वेबसाईट करावयाचे निश्चित झाल्यावर वेबसाईटचा मुख्य उद्देश काय आहे ते लेखी नमूद करावे त्यानुसार वेबसाईटवर काय काय माहिती घालावी लागेल याची यादी करावी. ह्या सर्व माहिती संकलनाचे योग्य नियोजन करावे. जबाबदार्‍या वाटून द्याव्यात. वेळेचे बंधन घालावे. वेबसाईट डिझाईन करणारी संस्था व शिक्षणसंस्था यात दुवा म्हणून शिक्षणसंस्थेने वेबसाईटचे ज्ञान असणार्‍या एका समन्वयकाची नेमणूक करावी. वेबसाईट डिझाईनमध्ये रंग, आराखडा याविषयी व्यक्तिव्यक्तिनुसार आवडी बदलत असल्याने वेबसाईटच्या डिझाईन संबंधी सूचना देण्याचे वा निर्णय घेण्याचे अधिकार त्याला द्यावेत. अन्यथा वेबसाईट डिझाईनला निश्चित दिशा मिळत नाहीत. तसेच डिझाईन झाल्यावर त्यात रंग वा इतर बाबी बदलण्याचा प्रयत्न केल्यास सर्व वेबसाईटचे डिझाईनच पुन्हा करावे लागते. खर्च वाढतो. वेळही वाया जातो.

वेबसाईटवर घालायची सर्व माहिती शक्यतो सॉफ्टकॉपी स्वरुपात (कॉम्प्युटरवर टाईप करून) द्यावी म्हणजे त्यात चुका होत नाहीत.प्रसिद्ध करावयाचे फोटो हे चांगल्या कॅमेर्‍याने काढलेले व डिजिटल स्वरुपात असावेत व इ मेलने, पेन ड्राईव्हच्या साहाय्याने वा सीडीवर द्यावेत. फोटोप्रिंटवरील फोटो स्कॅन करून वापरल्यास ते एवढे उठावदार दिसत नाहीत.
शिक्षण खात्याच्या निर्बंधानुसार प्रसिद्ध करावयाची माहिती, शिक्षण शुल्क समिती व अनिवार्य प्रसिद्धीचा मजकूर (Mandatory Disclosures) पीडीएफ स्वरूपात द्यावी.

वेबडिझाईन करताना पहिले दर्शनी पान सर्वात महत्वाचे असते. या पानावरील रंगसंगती, आकृत्या व मजकूर मांडणी समन्वयकाच्या इच्छेनुसार तयार केली जाते. त्यास थोडा वेळ लागतो. त्याचे डिझाईन मान्य झाल्यावर मगच इतर माहितीची पानांचे डिझाईन करता येते. सर्वसाधारणपणे वेबडिझाईनला एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र माहिती मिळाली नाही तर यात विलंब होतो.

वरील सर्व माहिती फक्त स्टॅटिक प्रकारच्या वेबसाईटलाच लागू आहे. डायनॅमिक वेबसाईटसाठी लागणार्‍या माहितीचा यात उल्लेख केलेला नाही. डायनॅमिक वेबसाईटमध्ये डाटाबेस व सॉफ्ट्वेअर वापरून आवश्यक ती माहिती देणारी वेबपेजेस आपोआप तयार होण्याची सोय करता येते. संस्थेच्या अनेक शाळांच्या व्यवस्थापनासाठी, माजी विद्यार्थी माहिट कक्षासाठी वा ऑनलाईन शिक्षण व परिक्षा घेण्याची सोय अशा वेबसाईटवर करणे शक्य असते.

मराठी - महाराष्ट्राची ज्ञानभाषा

महाराष्ट्र हे उद्योग, तंत्रज्ञान तसेच विज्ञान संशोधनात आघाडीवर असणारे राज्य आहे. मात्र इंग्रजी भाषेच्या अडथळ्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यात अपयशी ठरलेले आहे. सध्या विज्ञान व उच्च तंत्रज्ञान फक्त इंग्रजी भाषेची मक्तेदारी झाल्याने मराठीत याविषयी काही लिहिणेही कमीपणाचे वाटू लागले आहे.

मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था गेली अनेक वर्षे मरा्ठीतून विज्ञानप्रसाराचे काम करीत आहेत. या उपक्र्मात मोठमोठे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानातील शब्दांना समर्पक मराठी शब्द शोधून त्यांचा वापर करून बरेच लिखाणही केले आहे. तरीही हे काम शालेय विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित राहिले. याचे कारण मराठीतील पर्यायी शब्द व प्रचलित इंग्रजी शब्द यांची सांगड घालून अर्थ समजावून घेण्याचा खटाटॊप करण्याएवढा वेळ देण्याची लोकांची तयारी नसते. साहजिकच अशा मराठी साहित्याकडे केवळ अभ्यासण्याजोगी मराठी कलाकृती या दृष्टीकोनातून पाहिले गेले.

शुद्ध मराठी पर्यायी शब्दांचा आग्रह धरल्याने मराठीतील असे बरेच साहित्य सर्वसामान्यांना दुर्बोध झाले आहे. कालांतराने हे मराठी शब्द रूढ होतीलही पण प्रगत विज्ञान व मराठीतील भाषांतरित ज्ञान यातील अंतर वाढतच राहील. भाषेचा मुख्य उद्देश ज्ञान संक्रमित करणे हा असल्याने नेहमीच्या वापरातील इग्रजी शब्दही मराठीत निःसंकोचपणे वापरून हे ज्ञान लवकरात लवकर विशेष प्रयास न करता सर्व सामान्य जनतेला कसे समजू शकेल याचा विचार दुर्दैवाने झाला नाही.

माझ्याही बाबतीत असेच घडले. १९६८ मध्ये पर्यावरण विषयात एम. ई. करतानाच मराठीत हे ज्ञान यावे असे मला वाटले. मराठी साहित्य संस्कृती मंडळातर्फे ‘जलशुद्धीकरण’ या विषयावरील जागतिक आरोग्य संघटनेचे चार्लस कॉक्स या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्याचे काम मी अंगावर घेतले. मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे श्री. बा. रं. सुंठणकर यांनी सांगलीत माझ्या घरी येऊन या माझ्या कामास प्रोत्साहन दिले. माझ्या या कामास मार्गदर्शक म्हणून निवृत्त सचिव व मुख्य अभियंता असणारे श्री. वि. ह. केळकर हे काम पहात होते. त्यांनी धरण व जलसिंचन विषयावरील पुस्तके भाषांतरित केली होती. जलशुद्धीकरणातील सेटलिंग व फिल्ट्रेशन या प्रक्रियांसाठी त्यानी अवसादन व निस्यंदन हे मराठी शब्द सुचविले. अशा पद्धतीच्या अनेक संस्कृतोद्भव नव्या शब्दांचा उपयोग करून जिद्दीने मी ते ३०० पानांचे पुस्तक भाषांतरित केले खरे. जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याविषयी अतिशय बहुमोल अशी माहिती यात असल्याने मी ते जलशुद्धीकरण केंद्रातील लोकांना वाचायला दिल्यावर पूर्ण वाचायचे कष्ट न घेता वरवर चाळून ‘छान भाषांतर आहे’ एवढ्या अभिप्रायाने त्यांनी ते परत केले. या पुस्तकाचा प्रत्यक्ष व्यवहारात काहीही उपयोग होणार नाही हे कळून चुकल्याने जवळजवळ ६०० पानांचे ते हस्तलिखित प्रकाशित न करता मी तसेच ठेवून दिले.

गेल्या पन्नास वर्षात मराठीत अनेक नवे पर्यायी शब्द आता रुढ झाले आहेत मात्र त्यासाठी बराच काळ जावा लागला आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती ज्या वेगाने होत आहे त्याच्याशी तुलना करता भाषांतरित ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एवढ्या उशीरापर्यंत थांबणे परवडणारे नाही. इंग्रजी शबदांचा बिनदिक्कतपणे वापर करून म्रराठीचा केवळ संपर्क भाषा म्हणून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासनाने ठरविले असते तर विज्ञान तंत्रज्ञानातील नव्या मराठी शब्दांच्या वापराला निश्चितच बळ मिळाले असते. रशियाने सर्व इंग्रजी पुस्तकांचे व संशोधनपर लेखांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याचे काम सक्तीने तेथील साहित्यिक व शास्त्रज्ञांकडून करवून घेतले होते. राष्ट्रीय अस्मिता जपण्याचा व वाढवण्याचा तो मार्ग त्यांनी अवलंबिला होता.

आजही शासकीय व्यवहार, कायदा, शेती, सहकार या क्षेत्रात शासनाच्या पुढाकारामुळे मराठीने चांगले पाय रोवले आहेत. मात्र विज्ञान तंत्रज्ञानाकडे शासन याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. उलट यासाठी इंग्रजी शिक्षणास प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. मुलांनी इंग्रजी शिकून मगच विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाटेला जावे असे शासनाला वाटत असावे. त्यांचे हे मत विद्यार्थ्यांसा्ठी योग्य आहे असे मानले तरी शाळेबाहेर पडलेल्या वा शाळेतच न गेलेल्या बहुसंख्य मराठी लोकांचे काय? त्यांना हे ज्ञान मिळविण्याचा कोणता मार्ग उपलब्ध आहे.

मराठी ही फक्त साहित्यिकांची भाषा आहे अशा थाटात शासन त्याकडे पहात आहे. केवळ साहित्य संमेलनाला देणगी दिली की आपले मराठीविषयी दायित्व संपले अशी भावना शासनाची झाली आहे. मराठी शिकणे म्हणजे व्याकरण शिकणे व साहित्य वाचणे एवढाच अर्थ शिक्षण क्षेत्रातही रूढ आहे. त्यामुळे मराठी शिकविणारे प्राध्यापकही मराठी वाचतात पण लिहीत नाहीत. मराठी घेऊन बीए एमए होणार्‍यांना काही मान नाही व शिक्षण क्षेत्राशिवाय कोठे संधी नाही. भाषांतर हा मुख्य उद्देश मराठी शिकण्यासाठी ठेवला तर हा विषय व्यवसायाभिमुख होईल. मात्र त्यासाठी मराठीचा दुराग्रह न ठेवता किमान दोन भाषांचा अभ्यास करण्याची व भाषांतराची कृती सत्रे अत्यावश्यक थरविण्याची गरज आहे.

आज मराठी लिहिण्याबद्दल कमीपणाची भावना व विलक्षण उदासीनता शिक्षित वर्गात निर्माण झाली आहे. इंग्रजी वाचलेले कळत नाही व मराठीत साहित्य उपलब्ध नाही जे आहे ते प्रत्यक्ष वापरातील शब्द नसल्याने दुर्बोध आहे आजचा जिज्ञासू मराठी वाचक व विद्यार्थी अशा तिहेरी कात्रीत सापडला आहे.

प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर करून मराठीत असे साहित्य निर्माण करणेच या परिस्थितीत योग्य ठरेल. मराठीवर प्रभुत्व असणार्‍या लोकांनी नवे शब्द जरूर तयार करावेत पण त्याविना अडायचे कारण नाही. रशियासारखे महाराष्ट्रात होणार्‍या प्रत्येक संशोधनाचा गोषवारा मराठीत प्रसिद्ध करण्याचे बंधन शासन व शिक्षणसंस्था घालू शकतात. सर्वांनी या बाबतीत कर्तव्याच्या भावनेतून मराठीत लिहिण्याचे ठरविले तर मराठी ज्ञानभाषेचे स्थान पुन्हा मिळवू शकेल.

आमच्या ज्ञानदीपने हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठीत वेबसाईट (संकेतस्थळे) व सॉफ्ट्वेअर(संगणक प्रणाली) विकसित करण्याचे काम हाती घेतले त्याला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथम शिवाजी फॉंट(अक्षरसंच) नंतर श्रीलिपी फॉंटचा आम्ही वापर केला. श्रीलिपीतल्या माय कोल्हापूर या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिकही मिळाले होते. जागतिक युनिकोड फॉंट वापरात आल्यावर आम्ही आपल्या सर्व वेबसाईट युनिकोडमध्ये परिवर्तित केल्या. आज मायमराठी, मायसांगली, संस्कृतदीपिका, विज्ञान, स्कूलफॉरऑल या वेबसाईट मराठीत असून त्यांना जगभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र अजूनही शासनस्तरावर युनिकोड फॉंटचा वापर सुरू झालेला नाही ही खेदाची गोष्ट आहे. कर्नाटकात तयार केलेल्या बराहा सुविधेचा वापर करून आम्ही मराठी लिहीत आहोत. सीडॅकनेही अशि सुविधा तयार केल्याचे कानावर आले आहे मात्र त्याचा प्रसार व सर्वत्र सक्ती करण्याचे धारिष्ट्य महाराष्ट्र शासनाने दाखविण्याची गरज आहे. शेवटी मराठीविषयी काही कवींचे विचार खाली देत आहे.

मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
- प्र. ग. सहस्त्रबुध्दे

परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
--- कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी )

नको पप्पा - मम्मी, आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
---कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

साय मी खातो । मराठीच्या दुधाची ।
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? ।।
- कवि सुरेश भट

ठाणे येथील मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या राजधानीजवळ भरत आहे. नवे मुख्यमंत्री विज्ञान तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत. या संमेलनात मराठीला खरी ज्ञानभाषा बनविण्याविषयी साहित्यिक व राजकीय नेते काही खास उपाययोजना सुचवतील व त्या अमलात आणतील अशी आशा करूया.

Sunday, November 14, 2010

बालदिन

पंडित जवाहरलाल नेहरूंचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. उद्याचे भविष्य घडविणार्‍या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या भावविश्वाशी समरस होऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व त्यांना योग्य ते शिक्षण देण्याची जबाबदारी मोठ्यांच्यावर आहे ही जाणीव बालदिन साजरा करताना असावयास हवी.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत असताना मुद्दाम वेळ काढून पंडित नेहरूंनी आपल्या मुलीवर असे संस्कार करण्यासाठी लिहिलेली पत्रे जगप्रसिद्ध आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवाच्या प्रगतीचा व भारताच्या उदयाचा इतिहास त्यांनी आपल्या पत्रांतून अत्यंत सोप्या भाषेत विशद केला व अप्रत्यक्षपणे पुढील जबाबदारीची जाणीव इंदिरा गांधींच्या मनात निर्माण केली. त्याचीच परिणती एका प्रगल्भ व राष्ट्रीय नेतृत्वात झाली. 'Letters to daughter' या त्यांच्या पुस्तकाचे महत्व आजही कायम आहे.

पंडित नेहरूंना मुले फार आवडत. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात ते रममाण होत यामागे त्यांचे संवेदनशील भविष्यवेधी मन होते. मुलांनाही ते फार आवडत कारण ते मुलांमध्ये आपले मोठेपण विसरून मुलांसारखे वागत असत. त्यांना लाभलेले असे मुलांचे प्रेम मिळविणे प्रत्येकाला सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी आपले ज्येष्ठत्व, आपली प्रतिष्ठा व लोक काय म्हणतील याचा विचार करता कामा नये.

असे केले तर आपल्याला आपले हरवलेले बालपण प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे आपण म्हणतो. कारण त्यावेळी आपले मन नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे निर्मळ असते. निसर्गाकडे व भोवताली घडणार्‍या घटनां पाहण्याचा आपला दृष्टीकोन कुतुहलाचा व निकोप असतो. पूर्वग्रहाने, काळजीने वा आशाआकांक्षांनी मन ग्रासलेले नसते. ते अधिक संवेदनशील असते. त्यामुळे आपल्याला जीवनातील खरा आनंद अनुभवायला मिळतो.

सुदैवाने अशी संधी मला सतत मिळत राहिली. आम्ही चौघे भाऊ, मी सर्वात थोरला व भावाभावात ४/५ वर्षांचे अंतर. यामुळे सर्वात थोरला मुलगा म्हणून धाकट्या भावांना सांभाळण्याचे काम माझ्याकडे होते. साहजिकच लहान मुलांच्यात मिसळण्याचे प्रसंग नेहमी येत. पुढे लग्नानंतर माझी मुलगी सुमेधा व मुलगा सुशांत यांच्याबरोबर वागताना त्यांच्या व माझ्यामध्ये वडिलकीचा अडसर य़ेऊ नये याची मी पुरेपूर दक्षता घेतली. त्यांच्याकडूनही मला बरेच काही शिकायला मिळाले. सुमेधा विलक्षण संवेदनशील होती. साधा शांत स्वभाव, दुसर्‍यांच्या आनंदात मोकळेपणाने सामील होणे व केवळ दुसर्‍या व्यक्तीच नव्हे तर किडामुंगीसारख्यांचे दुःखही तिला जाणवत असे व डोळ्यात पाणी तरळू लागे. अशाच एका प्रसंगावर मी माझी ‘भिंग’ ही कथा लिहिली. सुशांत हा धडपड्या स्वभावाचा, प्रचंड कुतुहल व संशोधक वृत्तीचा होता. विज्ञान विषय त्याच्या सर्वात आवडीचा. कोणतीही वस्तू वा खेळणे यांची मोडतोड करून त्याचे कार्य समजावून घेणे व पुनः ते जोडण्याचा प्रयत्न करणे त्याचा नेहमीचा छंद होता. भविष्यकाळातील कला व संशोधनातील त्याच्या यशाच्याच त्या निदर्शक होत्या हे आता मला उमजले आहे.

सुमेधाच्या दोन मुलांशी व सुशांतच्या मुलीशी आजोबा या नात्याने संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले. केतन (अनंत) हा सुमेधाचा थोरला मुलगा. तो आपल्या आईप्रमाणेच अतिशय हळवा व कलावंत वृत्तीचा असल्याने त्याच्याशी खेळताना मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. गूढतेचा शोध घेण्याची त्याची वृत्ती, पोकिमॅनच्या कथानकात ( अमेरिकेत वास्तव्य असल्याने) रंगून जाणे व अत्यंत चिकाटीने पेपर ओरिगामी व मेकॅनोच्या गुंतागुंतीच्या रचना करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, हार्मोनियम वाजवणे व भावपूर्ण इंग्रजी कविता करणे यातून त्याच्या भविष्याचा अंदाज घेणे शक्य आहे.

सुशांतची मुलगी अनुषा अतिशय जिज्ञासू, संवेदनशील व अनुकरणप्रिय आहे. वडिलाचा धडपड्या स्वभाव व आईचा टापटीप व व्यवस्थित राहण्याचा गुण तिने नकळत उचलला आहे. समोरच्या माणसाचे बोलणे, वागणे, सवयी यांचे ती हुबेहूब अनुकरण करते. भातुकलीचा खेळ खेळताना ती ज्या काळजीपूर्वक स्वयंपाक करून खोटे खोटे वाढते त्यावरून तिच्या बुद्धीमत्तेची कल्पना येते. सांगलीत आल्यावर माझी पत्नी सौ. शुभांगी हिच्याशी तर तिची अगदी गट्टी जमते. शुभांगीची देवपुजा, रांगो्ळी काढणे, फुले वेचणे यात बरोबरीने भाग घेणे तिला फार आवडते. शुभांगी लहान मुलांशीच नव्हे तर पशुपक्षांशीही मुलांच्या भाषेत बोलते. दारात येणारे मांजर व बुलबुल व सातभाई यांना तिची भाषा कळते हे पाहून अनुषाही अगदी खूष होते. सध्या अमेरिकेत असली तरी ती सांगलीच्या माऊची चौकशी करते व सांगलीला येण्याची इच्छा व्यक्त करते.

सुमेधाचा धाकटा मुलगा ओजस अगदी वेगळ्या प्रवृत्तीचा, धाडसी, प्रखर बुद्धिमत्तेने दृक‌‌श्राव्य कथाकविता मुखोद्गत करणे व अमेरिकन संशोधकासारखे प्रकल्प तयार करणे यात तरबेज आहे.शिवाजी, राम, कृष्ण, भीम, गणपती, मारुती, शंकर अशा ऎतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखांच्या वेषात त्या त्या भूमिका वठविण्यात तो अधिक रमतो. आमच्या अमेरिकेच्या भेटीत रोज रात्री गोष्ट सांगताना अवकाशवीराच्या थाटात टॉयस्टोरीतले वुड व बझ ही मुख्य पात्रांच्या साथीने मी त्याच्याबरोबर सूर्यमालिकेतील अनेक सफरी केल्या आहेत. रोबोट बॉय, जेम्स वॅट व न्यूटन यानाही मी गोष्टीत हिरो बनविले होते. ओजस त्यात एवढा समरस होई की त्याला विज्ञानाची गुरुत्वाकर्षणासारखी तत्वेही सहज समजत असत. त्याच्या स्वभाववैशिष्ठ्यात मला त्याच्या वडिलांचा प्रभाव जास्त जाणवला.

मुलांशी स्वतः मूल होऊन खॆळताना माणसाच्या मूलभूत मानसिक प्रवृत्तींचे दर्शन घडते. त्यात कोणताही आडपडदा वा बुरखा नसतो. प्रेम, भीती, लोभ, राग या सार्‍या भावना अभ्यासता येतात. लहान मुलापासून मोठे होत असताना आपण काय गमावले याची जाणीव होते. त्याचबरोबर एका निर्भेळ आनंदाचा लाभ आपल्याला होतो. आपल्या वृत्ती उल्हसित बनतात.
मुलांवर संस्कार करीत असताना आपल्यावरही चांगले संस्कार करण्याचे कार्य मुले करीत असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

Saturday, November 13, 2010

वेबसाईटची पूर्वतयारी

वेबसाईट तयार करण्याची कला अवगत करून घेतली तरी वेबसाईटवर काय माहिती व कोणत्या स्वरुपात घालायची याची पूर्वतयारी नसेल तर वेबसाईटचे काम पूर्ण होण्यात विलंब लागतो. बर्‍याच वेळा वेबसाईट डिझाईनचे काम देणार्‍या ग्राहकाला याची काहीच माहिती नसते. शिवाय प्रत्येक क्षेत्रातील वेबसाईटसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करावी लागते. अशी माहिती अद्ययावत व अधिकृत असावी लागते.

एकूणच वेबसाईट हे प्रसिद्धी माध्यम लोकांना फारसे परिचयाचे नसल्याने अशा माहिती संकलनातच बराच वेळ जातो. वेबसाईटचे डिझाईन करणार्‍या संस्थेने ग्राहकास याबाबतीत मार्गदर्शन करणे गरजेचे असते. ग्राहकाच्या वेबसाईटपासूनच्या अपेक्षा विचारात घेऊन त्यास समर्पक अशी कोणती माहिती वेबसाईटवर घालणे योग्य ठरेल. त्यासाठी कोणत्या प्रकारची ( स्टॅटिक वा डायनॅमिक) वेबसाईट आवश्यक आहे त्यावर काय विशेष सुविधा देणे फायदेशीर ठरेल, त्यासाठी किती खर्च येईल व दरवर्षी लागणार्‍या माहितीतील फेरबदलासाठी कोणती पद्धत अवलंबावी याविषयी सविस्तर माहिती ग्राहकास दिल्यानंतरच वेब डिझाईनचे काम सुरू करणे श्रेयस्कर ठरते. अन्यथा वेबसाईट तयार झाल्यानंतरही ग्राहकास त्यापासून अपेक्षित लाभ होत नाही. त्याची निराशा होते व वेबसाईट सतत नव्या माहितीने ताजी ठेवण्याकडे दुर्लक्ष होते व कालांतराने अशा वेबसाईट बंद पडतात.

ग्राहकाचे असे प्रबोधन करण्यासाठी वेब डिझाईन करणार्‍या संस्थेने ग्राहकाच्या उद्योग / व्यवसायाचा अभ्यास करुन वेबसाईटवर प्रसिद्ध करावयाच्या माहितीचा कच्चा आराखडा करणे, ग्राहकाच्या इतर स्पर्धकांच्या वेबसाईटविषयी माहिती जमा करणे व ग्राहकाला वेबसाईटच्या संभाव्य प्रभावाविषयी कल्पना देणे आवश्यक असते. वेबसाईट डिझाईन करणारी संस्था अनुभवी असेल तर तिच्याकडे अशी माहिती नियमितपणे संकलित केली जात असते. वेबसाइट डिझाईनचे अद्ययावत तंत्रज्ञान व समर्पक माहिती यांचा कुशलतेने वापर केल्यास ग्राहकास या वेबसाईटचा फायदा होतो व अशी यशस्वी वेबसाईट ग्राहक तसेच डिझाईन करणारी संस्था दोघांनाही लाभदायक ठरते.

ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. ह्या आमच्या संस्थेने गेल्या दहा वर्षात अनेक वेबसाईट तयार केल्या. सुरुवातीच्या काळात ग्राहकाच्या इच्छेनुसार वेबसाईट बनविल्या तरी त्या फारश्या यशस्वी झाल्या नाहीत. याचे मुख्य कारण ग्राहकासच याविषयी असणारी अपुरी माहिती आहे हे लक्षात आल्यानंतर वेबसाईटच्या डिझाईनसाठी स्वतंत्रपणे अभ्यास करुन ग्राहकापुढे योग्य पर्याय विचारासाठी ठेवण्याची पद्धत अवलंबण्यात आली. मात्र त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील वैशिष्ठ्यांचा अभ्यास व वेब डिझाईन क्षेत्रात होणार्‍या प्रगतीचा अंगिकार अशा दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागले. अशा संशोधनात वेळ गेल्याने आर्थिक लाभ झाला नाही तरी वेबडिझाईनच्या क्षेत्रात सतत नवे प्रयोग करणारी संस्था असा नावलौकीक प्राप्त झाला. वेबसाईटचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकलेल्या आमच्या बर्‍याच कर्मचार्‍यांना पुण्या-मुंबईतील मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या. पण काही ध्येयवेडया व्यक्तीनी अशा संधीकडे पाठ फिरवून ज्ञानदीपची परंपरा कायम राखली एवढेच नव्हे तर परदेशातील कामे मिळवून यशस्वी करून दाखविली.

स्थानिक पातळीवर मात्र वेब डिझाईनबद्दल पुरेशी जागृती निर्माण करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. उद्योग व व्यवसाय करणार्‍या लोकांच्या वयोगटाला वेबसाईट हे नवे माध्यम अजूनही नवखेच वाटत आहे. शासन, बॅंका, शिक्षणसंस्था वा अन्य संस्थांच्या ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे नाईलाजाने वेबसाईट करावी लागणारे लोक अधिक आहेत. साहजिकच एखाद्या प्रसिद्धीपत्रकाइतकीच वा त्याहूनही कमी उपयुक्तता वाटून नावापुरती, कमीतकमी खर्चाची वेबसाईट करण्याकडे त्यांचा कल असतो. आम्ही सादर केलेले पर्याय त्यांना पटत नाहीत. त्यांच्या इच्छेनुसार केलेली वेबसाईट कार्यक्षमतेत तोकडी पडते व त्यांच्या पूर्वग्रहाला आणखीनच बळकटी येते.

त्यांना वेबसाईटच्या प्रभावी माध्यमाविषयी माहिती देणे व त्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करणे अशी महत्वाची कामे आमच्यासारख्या वेबडिझाईन संस्थांना करावी लागणार आहेत. वेबसाईट जनजागृतीचा उद्देश हाच आहे.

Tuesday, November 2, 2010

माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा

प्राचीन काळी साधुसंतांना आपल्या मनःचक्षूने जगातील सर्व घटना पाहता यायच्या अशी आपली दृढ समजूत आहे. धृतराष्ट्राला संजयाने कौरव-पांडव युद्धातील प्रसंग याच शक्तीने प्रत्यक्ष बघून सांगितले असे महाभारतात म्हटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला याच शक्तीने सार्‍या विश्वाचे दर्शन घडविले होते. शंकराला तिसरा डॊळा असतो व त्याने तो उघडला की समोरचे सर्वकाही तो क्षणार्धात भस्म करू शकतो असेही आपल्या पुराणांत म्हटले आहे. या सर्व शक्तींचा प्रत्यय आता माहिती तंत्रज्ञानाने होऊ लागला आहे.

आज मोबाईलवरून आपण कोणासही व कोठेही संपर्क करू शकतो. इंटरनेटवरील स्काईपसारख्या सुविधा वापरून जगात कोठेही असणार्‍या आपल्या मित्राशी वा नातेवाईकाशी दृश्य स्वरुपात भेटू शकतो. थ्री डी तंत्रज्ञानाने आता अशा सर्व संपर्क सुविधात अधिक जिवंतपणा येऊ लागला आहे. गुगलने आपल्या वेबसाईटवरून सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो प्रदर्शित करून सार्‍या जगाचे दर्शन घरबसल्या घेण्याची सोय उपलब्ध करून दिली. पुस्तक वाचण्यासाठी आता ग्रंथालयात जाण्याची गरज नाही ते आपण नेटवरून वाचू शकतो. आता कोणत्याही ठिकाणच्या रस्त्यावरून हिंडण्याचा, दुकानात खरेदी करण्याचा वा कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेण्याचा अनुभव आपण एका जागी बसून घेऊ शकतो. जगातील सर्व घटना टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला लगेच पाहता येतात. माहिती तंत्रज्ञानात अशा अनेक सुविधा निर्माण होत आहेत.

मला याबाबतीत एका वेगळ्याच विषयाशी याचा संदर्भ जोडायचा आहे. देवादिकांना व साधुसंतांनाच शक्य असणारी ही विद्या आता सर्व सामान्य माणसाला प्राप्त करून देण्याचे महत्वाचे कार्य माहिती तंत्रज्ञानाने केले आहे. माहितीचा केवळ अधिकार असून चालत नाही. प्रत्यक्षात माहिती मिळाली पाहिजे असे आपण म्हणतो. ते काम आता माहिती तंत्रज्ञान करू लागले आहे.

पूर्वी मी एक ‘गोल्डफिश’ नावाची विज्ञानकथा वाचली होती. त्यात एक शास्त्रज अपारदर्शक वस्तूच्य़ा पलिकडचे पाहू शकणार्‍या यंत्राचा शोध लावतो. मात्र या यंत्राचा प्रसार झाला तर माणसाला आपले खासगी आयुष्य राहणार नाही. काचेच्या बाउलमध्ये ठेवलेल्या गोल्डफिशसारखी त्याची स्थिती होईल या भीतीने सरकार ते यंत्र नष्ट करते. आज अशी पारदर्शकता माहिती तंत्रज्ञान आपल्याला देऊ करीत आहे.

अंधारात, निर्मनुष्य जागेत वा गुप्तपणे कोणतीही कृती झाली तरी त्याचा छडा लावण्याची शक्ती माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केली आहे. भ्रष्टाचारात तर कमीत कमी दोन माणसांचा संबंध असतो. प्रसारमाध्यमांच्या स्टिंग ऑपरेशनमधून असे अनेक प्रकार लोकांसमोर आले आहेत. गुप्त कॅमेर्‍यामुळे चोरही पकडले जातात. गुन्हेगारही सापडतात.

आज समाजात कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार वाढला आहे असे आपण म्हणतो. माझे मत असे आहे की भ्रष्टाचार पूर्वीही कमी प्रमाणात असेल पण अस्तित्वात होता मात्र तो कोणालाच कळायचा नाही. आता कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे त्याचे भयावह रूप आता आपल्यासमोर येत आहे. ‘Atlos Shrugged’ या कादंबरीच्या सुरुवातीस लिहिलेला प्रसंग मला आठवतो. ऑफिस सुटल्यावर घरी जाताना चौकात नेहमीच्या पाहण्यातील एक भला मोठा वृक्ष कोसळलेला दिसतो. त्याच्या भव्यतेचे कौतुक करणारी जनता आश्चर्याने त्याच्या भोवती गोळा होते. प्रत्यक्ष झाडाचा तुटलेला बुंधा पाहिल्यावर मात्र आतून वाळवीने सारे झाड पोखरले गेले होते हे लोकांच्या ध्यानात येते. सध्या आपल्याला तसाच काहीसा अनुभव येत आहे. मात्र झाड पडण्याअगोदरच आपल्याला आतली पोकळी आता दिसू लागली आहे. ही चांगली गोष्ट आहे.

उच्च पदस्थ भ्रष्टाचारामुळे जनता हैराण व हताश झाली असली तरी माहिती तंत्रज्ञानाने या जनतेला हा तिसरा डोळा दिला आहे. या डॊळ्यात दुहेरी ताकत आहे. ती आता सर्व काही पाहू शकते व कोणालाही सत्तेवरून खाली खेचू शकते. कोणाचाही व कोणताही भ्रष्टाचार व गैरकृत्य आता लपून राहणार नाही. वेळीच सावध होऊन त्यापासून दूर राहिले तरच धडगत आहे. अन्यथा शंकरासारखा तिसरा डोळा उघडून सर्व नष्ट करण्याचे अचाट सामर्थ्य माहिती तंत्रज्ञानाने जनतेला बहाल केले आहे.

कदाचित हे सामर्थ्य आधी आपल्याला मिळाले असते तर आंतरराष्ट्रीय गुप्त कारस्थाने, हिटलरची हुकुमशाही, रशियातील छळवणूक छावण्या, महायुद्धे, गुलामगिरी याना वेळीच अटकाव करता आला असता. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिगत अधिकार यांचे सत्तेच्या जुलमी राजवटीपासून संरक्षण करता आले असते. माहिती तंत्रज्ञान हे कलियुगातील स्वैर व स्वार्थी सत्ताधीशांचा नाश करून पुनः सत्ययुगाची सुरुवात करण्यासाठी जनतेच्या हातात दिलेले अमोघ शस्त्र आहे. परशुरामासारखा त्याचा वापर जनतेने करायला हवा.

परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे म्हटले जाते. इतक्यावेळा त्याला हे का करावे लागले व नंतरही तो सुव्यवस्था लावण्यात अयशस्वी का झाला याचा शोध घेतला तर सत्तेची अभिलाषा व सत्ता मिळाल्यावर अहंकार ही मानसिक प्रवृत्ती आहे व त्याच्याशी सतत लढण्याची आवश्यकता आहे.हे लक्षात येते. 'To err is human' असे म्हटले जाते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत ह. वि. कामत यांनी आपल्या भाषणात ‘माणसाचे पाय मातीचे असतात. त्याला देवत्व देऊ नका.’ असा इशारा दिला होता. त्यामुळे सध्या जे व्यक्तिपूजेचे स्तोम माजविले जात आहे ते चुकीचे आहे. बहुसंख्य जनता नेहमी निष्पक्षच राहिली पाहिजे. कोणीही सत्तेवर आला की तो अहंकारी होणार व स्वार्थी कृत्ये करणार हे गृहीत धरून जनतेने त्याला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा आपल्यावर नजर ठेवून आहे हे त्याला लक्षात आले म्हणजे त्याचे वर्तन आदर्श व लोकाभिमुख राहू शकेल.