ऊर्जा म्हणजेच जीवन. या संबंध विश्वाचा कारभार ज्या मुलभूत घटकांवर आधारित आहे. त्यातील एक घटक म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. जीवनक्रम अव्याहत चालू ठेवण्याचे कार्य उर्जा करते. कोणत्याहि कार्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. शरिराला लागणाऱ्या ऊर्जेचे इंधन म्हणजे अन्न. ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे इंधन म्हणजे दगडी कोळसा, लाकूड, खनिज तेल, वायू आणि वीज म्हणजेच मनुष्य प्राणी आणि वनस्पती यांचे पोषणासाठी तसेच उष्णता व प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे.
प्राचीन काळापासून लाकूड हाच मानवाचा एकमेव उर्जास्त्रोत होता. अगदी सतराव्या शतकापर्यंत लाकूडच वापरले जायचे. सतराव्या शतकात वेगवेगळे ऊर्जास्त्रोत सापडले. हे ऊर्जास्त्रोत म्हणजे दगडी कोळसा आणि पेट्रोलियम. यांची ऊर्जा पुरविण्याची शक्ति लाकडापेक्षा प्रचंड असल्यामुळे त्यांचा वापर यंत्रामध्ये केला गेला. आणि पुढील ३ शतकांत मानवी संस्कृतीने प्रगतीचा मार्ग प्रचंड वेगाने कापला. एकोणीसाव्या शतकात मोठमोठी जनित्रे निर्माण झाली. विद्युत शक्तिने तर जगाचे स्वरूपच पालटून टाकले. विद्युत शक्तीवर चालणारी हजारो नवी उपकरणे, यंत्रे तयार झाली. आज घरातील बरीचशी कामे विजेच्या सहाय्याने होतात. आज कोळसा हा रेल्वे इंजिन आणि आगबोटीत वापरला जातो. रस्त्यावरील लहान मोठी वाहने ही खनिज पेट्रोलियम पासून शुध्द केलेल्या पेट्रोल व डिझेलवर चालतात. पण आज हे ऊर्जास्त्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. भरमसाठ जंगलतोडीने जगातील मोठमोठी जंगले नष्ट झाली आहेत आणि त्यातून प्रदूषणाची दुसरी समस्या उभी राहिली आहे.
No comments:
Post a Comment