Saturday, July 4, 2009

शिक्षण व उद्योग यांची सांगड घालणारे हॉर्वर्ड विद्यापीठ

अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठाने शिक्षण व उद्योग यांची सांगड घालून एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. येथे शिकणारे विद्यार्थी आपल्या शिक्षण काळातच स्वतःचा मोठा उद्योग उभा करून उद्योजक म्हणून बाहेर पडतात. विद्यापीठ त्यांना या कामात सर्व प्रकारचे साहाय्य करते.


हॉर्वर्ड विद्यापीठ १९५७ मध्ये स्थापन झाले. विद्यापीठाचे शैक्षणिक शुल्क देता यावे यासाठी त्यावेळी अनेक विद्यार्थी आपल्या राहत्या खोलीत काहीतरी व्यवसाय करीत होते. अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून विद्यार्थ्यांचीच एक कंपनी सुरू करायची कल्पना पुढे आली. विद्यापीठाने उद्योगातून विकास हे ध्येय मानून विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग काढण्यास केवळ शिक्षण व प्रोत्साहन न देता त्यांनी सुरू केलेल्या उद्योगांच्या विकासासाठी १३ डिसेंबर १९५३ मध्ये ७००० डॉलरच्या भांडवलावर हॉर्वर्ड स्टुडंट एजन्सी नावाची कंपनी स्थापन केली. यावेळी जॉन मन्रो, डस्टीन बर्क, ग्रेग स्टोन, जॉन ग्यानेटी, थिओडोर एलिओट आणि हॅरोल्ड रोजेन्वाल्ड हे विद्यार्थीच कंपनीचे प्रवर्तक होते. हॉर्वर्ड विद्यापीठाला कापडपुरवठ्याचे काम या कंपनीने हाती घेतले. विद्यार्थ्यानी हॉर्वर्ड विद्यापीठातील इमारतीत सुरू केलेला हा उद्योग हळू हळू वाढत गेला.

या छोट्या रोपट्याचे आता एका मोठ्या उद्योग समूहात रुपांतर झाले आहे. आज त्यातील ‘लेटस गो’ ही हॉर्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चालविलेली जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी बनली आहे. या कंपनीत ५०० विद्यार्थी विविध स्तरांवर काम करतात. या कॉर्पोरेटचे नऊ मोठॆ उपविभाग आहेत व प्रत्येक विभागाचा प्रमुख विद्यार्थी आहे. ‘लेटस गो’ ही कंपनी जगातील पर्यटन स्थळांविषयी माहितीपूर्ण पुस्तके प्रसिद्ध करते. यासाठी विद्यार्थी जगभरातील विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भॆट देऊन माहिती गॊळा करतात.


आपल्या भारतात पालक विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार सोसतात. अमेरिकेत मात्र विद्यार्थ्यांना स्वतः त्यासाठी झटावे लागते. विद्यार्थ्यांची परिक्षार्थी वृत्ती कमी होऊन स्वावलंबन व श्रम यांचे महत्व त्यांना कळावे तसेच उद्योग विकासाला चालना मिळावी यासाठी भारतातील शिक्षणसंस्थांना हॉर्वर्ड विद्यापीठाचा आदर्श घ्यावयास हवा. मात्र केवळ फी व डोनेशन या मार्गांनी पैसे मिळविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना उद्योजक बनवून व त्यांच्या उद्योगात सहभागी होण्यासाठी आवश्यक पावले त्यांना उचलावी लागतील. नवीन उद्योग सुरू होतांना येणार्‍या अडचणींवर सहज मात करता यावी यासाठी बॅंकेकडून अर्थ साहाय्य मिळवून देणे, आपली इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा व वर्कशॉप वापरण्यास देणे, उत्पादित मालाला गिर्‍हाईक मिळवून देण्यास मदत करणे. ही कामे शिक्षणसंस्थांना करावी लागतील. तसे पाहता या संस्थांमधील बर्‍याच सुविधा वापराविना पडून असतात. विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ या धर्तीवर ग्रंथालय, ऑफिस, बागकाम, डाटा एन्ट्री अशी अनेक कामे देता येऊ शकतात.आज शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांची अनेक मंडळे असतात. त्यांचा उद्देश करमणुकीचे कार्यक्रम, खेळ वा स्पर्धा घेणे वा सामाजिक कार्य करणे असा असतो. उद्योगासाठी अशी मंडळे स्थापन झाली तर विद्यार्थ्यांच्या कार्यास नवे क्षेत्र मिळेल व स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता येईल.ज्ञानदीप फौण्डेशन अशा उपक्रमांसाठी शिक्षणसंस्थांना मार्गदर्शन देण्यास तयार आहे.

ज्ञानदीप डॉट नेट या फौंडेशनच्या संकेतस्थळावर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षणसंस्था यांचे परस्पर सहकार्यासाठी समूह करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या घटकांची संलग्नता करून सार्वत्रिक विकासासाठी विचारविनिमय करणे, परिसंवाद आयोजित करणे, प्रकल्प राबवणे वा संशोधन करणे असे कार्य प्रभावीपणे करता येईल. हॉर्वर्ड विद्यापीठाने केलेला यशस्वी प्रयोग आपल्या शिक्षण संस्थात उद्योगासह विविध कार्यांसाठी करणे देशाच्या सर्वांगीण् विकासाला साहाय्यभूत ठरेल यात शंका नाही.
संदर्भ - http://www.harvardstudentagencies.com

No comments:

Post a Comment