Friday, July 12, 2013

कोडइग्नायटरचा वेबडिझाईनसाठी वापर भाग - २

कोड इग्नायटर शिकण्यासाठी लागणारे टप्पे आपण पाहिले. मात्र मी हे शिकविण्यासाठी ‘टॉप टू डाऊन’ म्हणजे ‘बाहेरून आत’ अशा पद्धतीने याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे.

कोड इग्नायटर ह्या नावातील  कोड म्हणजे प्रोग्रॅम आणि इग्नायटर म्हणजे शीघ्र ज्वलन सुरू करणारा असा शब्दश: अर्थ घेतला तरी त्यामुळे कोड इग्नायटर हा प्रोग्रॅम लगेच कार्यान्वित होण्यास मदत करतो असे सूचित करतो.

आता फ्रेमवर्क म्हणजे काय?  खिडकी वा दार यांची चौकट  वा फ्रेम आपल्या माहितीची आहे. या चौकटीत खिडकी किंवा दार बसविले जाते. फोटोफ्रेममध्ये फोटो बसविला तर त्याला आधार देण्याचे व त्याचे संरक्षण करण्याचे कार्य फोटोफ्रेम करते. यात फोटोवरील काचही फोटोफ्रेमचाच भाग असते.  फ्रेमवर्क म्हणजे अशा अनेक फ्रेम्सचा सांगाडा. बिल्डिंग बांधताना आरसीसी फ्रेमवर्क वापरले जाते. हे फ्रेमवर्क बिल्डिंगच्या इतर सर्व घटकांना आधार देते. आपल्या शरिरातही हाडांचा सापळा म्हणजे एक फ्रेमवर्कच असते.

महिलांसाठी याचे समर्पक उदाहरण द्यायचे म्हणजे स्वयंपाकघरातील कट्टा, विविध प्रकारची भांडी, साधने, अगदी गॅस शेगडी, मिक्सर, मायक्रोव्हेव, फ्रीज यांचा समूह म्हणजे किचन फ्रेमवर्कच होय. अन्नपदार्थ ठेवण्यासाठी, त्यावर काही संस्कार करण्याची ती साधने असतात. मात्र मुख्य महत्व अन्नपदार्थानाच राहते. आधुनिक किचन फ्रेमवर्क वापरले तर स्वयंपाक चांगला व चटकन करता येतो.

कोड इग्नायटरचे कार्यही असेच आहे. ते मुख्य सॉफ्ट्वेअरमधील सर्व प्रोग्रॅमना अशा योग्य चौकटीत बसविते की त्याचे कार्य जलद होईल व त्यात फेरबदलही सहज करता येतील. कोड इग्नायटर शिकणे म्हणजे याच्या स्ट्रक्चरची माहिती करून घेणे होय. कोड इग्नायटरचे स्ट्रक्चर हे एम.व्ही.सी या बेसिक मोडूलवर आधारलेले असल्याने आपल्याला एम.व्ही.सी. म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल.


एम.व्ही.सी. म्हणजे मॉडेल,व्ह्यू व कंट्रोलर. यातील कंट्रोलर हा मुख्य नियंत्रकाचे काम करतो. युजरशी संवाद साधून त्याला आवश्यक ती सॉफ्टवेअर सेवा देण्याची जबाबदारी त्याची असते. ब्राउजरकडे पाठवायाची माहिती व त्याची योग्य माडणी करण्याचे काम व्ह्यू विभागाकडे असते. जर मायएसक्यूएल या डाटाबेसमध्ये काही माहिती ठेवली असेल तर त्या डाटाबेसचा वापर करून कंट्रोलरने मागितलेली माहिती देण्याचे वा युजरने दिलेली माहिती डाटाबेसमध्ये भरण्याचे कार्य मॉडेल या विभागाकडे असते. मॉडेल,व्ह्यू व कंट्रोलर म्हणजे असे कार्य करणार्‍या प्रोग्रॅमचे समूहच असतात. मॉडेल्स,व्ह्यूज व कंट्रोलर्स या नावाच्या फोल्डर्समध्ये ते ठेवलेले असतात.



एम.व्ही.सी.ची कार्यपद्धती नीट समजावून घ्यायची असेल तर त्याला आपण एखाद्या प्रकाशन संस्थेचे ऑफिस असल्याची कल्पना करूया. या प्रकाशन संस्थेच्या ऑफिसमध्ये  डाटा एन्ट्री, ग्राफिक डिझाईन विभाग, चित्रे व फोटो यांचा संग्रह, काही तयार डिझाईनचे नमुने तसेच विशेष माहितीसाठी वेगळी लायब्ररी व मॅनेजर किंवा डायरेक्टर ऑफिस असे विविध विभाग असतात. आता एम.व्ही.सी. या ऑफिसमध्येही  व्ह्यू, मॉडेल व कंट्रोलर विभाग असेच असतात.  व्ह्यू म्हणजे  दिलेल्या माहितीची योग्य व आकर्षक मांडणी करण्यासाठी सीएसएस, तयार डिझाईनच्या टेमप्लेट्स, चित्रांसाठी इमेजेस यांची फोल्डर्स वापरणारा विभाग. विशेष माहिती साठविण्यासाठी मायएस्क्यूएलचा डाटाबेस( लायब्ररी) व त्यातील माहितीची देवाण घेवाण करणारा विभाग म्हणजे  मॉडेल विभाग आणि ग्राहकाचे ( युजरचे) काम व माहिती स्वीकारून, आवश्यक भासल्यास मॉडेल करवी डाटाबेसमधील माहितीचा वापर करून व्ह्यू कडे   वेबपेज डिझाईन करण्यास सांगणे व ते तयार झालेले वेबपेज  ग्राहकाकडे ( युजरच्या ब्राउजरकडे) पाठविण्याचे मुख्य काम करणारा कंट्रोलर  विभाग होय.

No comments:

Post a Comment