वेबसाईटवरील सदस्यनोंदणीसाठी व्यवस्था लॉगिन मोड्यूल (Login Module)
इंटरनेटवर शोध घेतला तर सर्व विषयांची व सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी ती देताना बर्याच वेळा सदस्य नोंदणीची अट घालून फक्त नोंदणीकृत सदस्यांनाच हवी ती माहिती मिळण्याची व्यवस्था डायनॅमिक वेबसाईटमध्ये केलेली असते. ही सदस्य नोंदणी मोफत वा काही शुल्क आकारून केली जाते. मोफत नोंदणी करण्याची अट ही केवळ युजरचा इमेल पत्ता, परिचय आवडनिवड व गरज याविषयीची माहिती गोळा करण्यासाठी ठेवलेली असते व या माहितीचा उपयोग बातमीपत्र वा जाहिराती पाठविण्यासाठी केला जातो. काही माहिती मिळविण्यासाठी सदस्य वर्गणी भरावी लागते.
लॉगिन मोड्यूल
सदस्य नोंदणी करताना किमान सदस्यनाव (Login Name) व इमेल (E Mail) याची माहिती द्यावी लागते. दिलेल्या इमेल पत्त्यावर नोंदणीचा सांकेतिक शब्द (पासवर्ड) पाठविला जातो. खोटी वा अनधिकृत इमेल पत्ता लिहिल्यास हा सांकेतिक शब्द मिळत नाही व सदस्य नोंदणी होत नाही. फॉर्ममध्ये युजरने दिलेली माहिती योग्य आहे की नाही हे तपासणे आवश्यक असते.
नोंदणीकृत सदस्याने आपले नाव व पासवर्ड लिहिल्यावर, त्या सदस्याचे नाव व पासवर्ड सर्व्हरवर असणार्या सदस्ययादीतील माहितीशी पडताळून पहावा लागतो. त्यात काही चूक असल्यास त्याची माहिती देऊन नकार कळवावा लागतो व पुनः योग्य माहिती भरण्यास सूचना द्यावी लागते.
नवीन सदस्यत्वासाठी कोणी माहिती भरली तरी सर्व्हरवर असणार्या सदस्ययादीतील नावात ते नाव नाही ना याची खात्री करावी लागते अन्यथा वेगळे सदस्यनाव घेण्यास सुचविले जाते.
सर्व्हरवर सर्व सदस्यांची माहिती एका डाटाबेस टेबलमध्ये जतन केली जाते. लॉगिन होताना वा नव्या सदस्याच्या नोंदणीच्यावेळी ह्या माहितीचा वापर करून योग्य त्या प्रतिसादाचे वेबपेज तयार करून युजरकडे पाठविले जाते. तसेच युजरच्या माहितीचा समावेश करून टेबल अद्ययावत करावे लागते.
युजर लॉगिन झाला की त्याच्यासाठी एक सेशन ( स्वतंत्र माहिती कप्पा) सुरू करण्यात येतो व त्याद्वारे युजरला सर्व्हरवरील डेटाबेसमधून आवश्यक ती माहिती दिली जाते. युजर लॉगाआउट झाला की तो सेशन नाहिसा केला जातो. यामुळे एकाच वेळी अनेक युजर एकाच डेटाबेसमधून वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत असले तरी त्यात सरमिसळ होत नाही. एखादा युजर डेटाबेसमध्ये माहिती भरत असेल वा त्यातील माहितीत बदल करीत असेल तर अत्यल्प काळाकरता त्याची सेवा इतर सर्व युजर्ससाठी बंद केली जाते व डेटाबेसच्या माहितीत बदल झाल्यानंतर ती सेवा पूर्ववत खुली होते. या सर्व क्रिया अतिशय वेगाने होत असल्याने युजरला याची जाणीव होत नाही.
ऑनलाइन रेल्वे रिझर्व्हेशन व्यवस्थेत सांगलीतून, दिल्लीतून व अन्य अनेक ठिकाणांहून एकाच वेळी एकाच गाडीचे रिझर्व्हेशन होत असले तरी एकाच सीटचे डुप्लिकेट रिझर्व्हेशन होण्याचा धोका अशा व्यवस्थेमुळे टाळला जातो.
No comments:
Post a Comment