एचटीएमएलचे टॅग वापरून साधे वेबपेज तयार केले असेल ते एखाद्या प्रिंटरवर छापलेल्या पानासारखे असते. त्यात स्वयंचलित वस्तूसारखे डायनॅमिक इफेक्ट आणायचे असल्यास त्यास प्रोग्रॅमिग लॅंग्वेजची जोड द्यावी लागते. अशा वेबपेजमध्ये स्क्रिप्टींग लॅंग्वेज बहुदा खालील कामांसाठी वापरली जाते.
१. युजरच्या माउस वा कीबोर्डवरील कृतीप्रमाणे वेबपेजवरील अक्षरे, चित्रे वा मांडणी बदलणे (जावास्क्रिप्ट)
२. युजरने भरलेली माहिती तपासून सर्व्हरकडे पाठविणे ( जावास्क्रिप्ट व सर्व्हरसाईड स्क्रिप्ट)
३. सर्व्हरवरील माहितीकोषातून माहिती देणे ( सर्व्हरसाईड स्क्रिप्ट)
सर्व्हरवर ठेवलेल्या माहितीच्या साठ्यातून Database) आवश्यक ती माहिती शोधून वेबपेज सर्व्हरवरच आपोआप तयार होऊन वापर कर्त्याकडे पाठविले जाते. अशावेळी सर्व्हरवर कार्यान्वित होणारी प्रोग्रॅमिंगची भाषा वापरुन डायनॅमिक वेबपेज डिझाईन करावे लागते.
जावास्क्रिप्ट, व्हीबीस्क्रिप्ट, डॉट नेट किंवा पीएचपी या लॅंग्वेजचा वापर करून वेबपेज डायनॅमिक करता येते.यापैकी जावास्क्रिप्ट हे युजरच्या कॉम्प्युटरवरील ब्राऊजरच्या मदतीने चालू शकते व त्याला वेगळ्या सर्व्हरची आवश्यकता नसते. यालाच क्लायंटसाइड कॉम्प्युटिंग (Clientside computing) असे म्हणतात. जावास्क्रिप्ट वापरले तरी वेबपेजचे दुय्यम नाव .html किंवा .htm असे देता येते. व्हीबीस्क्रिप्ट, डॉट नेट किंवा पीएचपी मात्र सर्व्हर कॉम्प्युटरवरून कार्यान्वित होतात. त्यामुळे त्यांचा वापर केल्यास सर्व्हरसाईड कॉम्प्युटिंग (Serverside computng) असे संबोधले जाते. अशा वेबपेजेसची नावे .asp, .aspx,.php अशी असतात.यापैकी व्हीबीस्क्रिप्ट व डॉट नेट विंडोजवर वापरावे लागतात. यांसाठी मायक्रोसॉफ्टच्या लायसन्स्ड सॉफ्ट्वेअरची गरज असते. पीएचपी ही मुक्त प्रणाली असल्याने त्याला लायसन्सची गरज नसते. पीएचपी लिनक्स वा विंडोज दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येते. लिनक्ससाठी अपाचे सर्व्हर इन्स्टॉल करावा लागतो.
आपल्या कॉम्प्युटरवर अशी वेबपेजेस करावयाची असल्यास सर्व्हर इन्स्टॉल करावा लागतो. विंडोजमध्ये यासाठी पूर्वी ( windows 95 windows 98) पर्सनल विंडोज सर्व्हर(PWS) इन्स्टॉल करावा लागे. आता windows 2000, windows xp, vista वा windows 7 या नव्या विंडोजमध्ये IIS Internet Information Server इन्स्टॉल करावा लागतो.विंडोज इन्स्टॉल केली असली तरी IIS इन्स्टॉल करण्यासाठी विंडोजच्या अधिकृत सीडीचा वापर करावा लागतो.
जावास्क्रीप्ट ही प्रोग्रॅमिंगची भाषा समजायला सोपी आहे. तिचा वापर करून वेबपेजमध्ये जिवंतपणा आणता येतो. म्हणजे वापरणार्यास केवळ माऊसच्या कृतीने अक्षरे, चित्रे व मांडणी यात बदल व वेळ, गतीवर आधारित चलतचित्रे व गणिती क्रिया करता येतात. जावास्क्रीप्ट वापरणे व न वापरणे वापरणार्याच्या मर्जीवर अवलंबून असल्याने व यातील प्रोग्रॅम बदलता येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डायनॅमिक वेबसाईटमध्ये जावास्क्रीप्टऎवजी सर्व्हरसाईड
प्रोग्रॅमिंगची भाषा वापरली जाते.
जावास्क्रीप्ट प्रोग्रॅमसाठी वेबपेज सर्व्हरकडे पाठविण्याची आवश्यकता नसल्याने वेबपेजमधील बदल वा फॉर्मतपासणीचे काम स्थानिक पातळीवर जावास्क्रिप्टने करून नंतर ते पुनः सर्व्हरकडे पाठविता येते. यामुळे फॉर्म वा माहिती भरण्याचे वा शोधण्याचे काम जावास्क्रिप्ट्च्या वापराने सुकर करता येते. आवश्यक तो प्रोग्रॅम गुप्त ठेवायचा असल्यास तो सर्व्हरवरून कार्यान्वित करणे आवश्यक असते. AJAX या नव्या प्रोग्रॅमिग पद्धतीत जावास्क्रीप्ट व सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंगचा कौशल्याने वापर करून सुरक्षितता राखून जलद प्रतिसाद देणारे वेबपेज करता येते.
No comments:
Post a Comment