आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक हॉस्पिटलची स्वतःची वेबसाईट असणे आवश्यक बनले आहे. नोकरी व्यवसायामुळे लोकांना फार वेळ नसतो. पेशंटला तातडीने उपचार मिळण्याची ही आवश्यकता असू शकते अशा वेळी लोकांना नजिकच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली तर त्यांची चांगली सोय होऊ शकेल. हॉस्पिटललाही नवे पेशंट मिळू शकतील. हॉस्पिटल कोणत्या शरीरव्याधीविषयी आहे? त्यामध्ये पूर्णवेळ व भेट देणारे तज्ज्ञ डॉक्टर कोण आहेत? हॉस्पिटलमध्ये इतर काय सुविधा आहेत? अतिदक्षता विभाग, तातडीची रुग्णसेवा, रुग्णवाहिका, संपर्क फोन व माहिती कक्ष याविषयी माहिती नेटवरून मिळत असेल तर लोकांचा प्रवास खर्च व वेळ वाचेल. दुरचे रुग्णही आधी भेटीची वेळ निश्चित करून येऊ शकतील व हॉस्पिटलचा नावलौकीक वाढेल.
डॉक्टरच्या वेळेइतकेच महत्व पेशंटच्या वेळेलाही महत्व असते हे बहुधा कोणाच्याच लक्षात येत नाही. परिणामी आपला नंबर केव्हा येतो याची वाट पहात अनेक पेशंट व त्यांचे इतर नातेवाईक आपली सर्व कामे सोडून तासन्तास ताटकळत बसलेले असतात. हे दृश्य जवळजवळ प्रत्येक चांगल्या हॉस्पिटलमध्ये दिसते. खेडेगातून आलेल्या लोकांचे तर फारच हाल होतात. मात्र याकडे हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होते. त्यामुळे दूरवरच्या चांगल्या हॉस्पिटलपेक्षा जवळच्या कमी दर्जाच्या व पुरेशा सुविधा नसणार्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणेच बहुधा लोक पसंत करतात. वेबसाईटवरून अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा असेल तर पेशंटना फार वेळ थांबायला न लागता वेळेत योग्य उपचार मिळू शकतील.
आजकाल विविध व्याधींवर एकाच ठिकाणी उपचार मिळणे शक्य व्हावे यासाठी अनेक डॉक्टरांच्या सहभागाने पॉलिक्लिनिक चालविली जातात. यात बरेच तज्ज्ञ डॉक्टर गावातील आपली प्रॅक्टिस सांभाळून थोड्या वेळापुरते अशा हॉस्पिटलमध्ये सल्ला देण्यासाठी येत असतात. त्यांच्या नावामुळेही अनेक पेशंट या हॉस्पिटलकडे आकर्षित होतात. पुष्कळ वेळेला हॉस्पिटलच्या बाहेर अशा डॉक्टरांच्या पाट्या वाचायला मिळतात. पण हॉस्पिटलपाशी आल्यावरच हे समजते. हॉस्पिटलपासून दूर वा परगावी राहणार्या लोकांना याची माहिती कळू शकत नाही. वेबसाईटच्या माध्यमातून अशी माहिती कोणालाही व कोठेही घरबसल्या कळू शकते. शिवाय अशा डॉक्टरांच्या भेटीची वेळ आधी समजू शकते.
हॉस्पिटलसाठी सॉफ्टवेअर
अशा पॉलिक्लिनिकमध्ये काही डॉक्टर पूर्ण वेळ काम करतात व त्यांच्यावर येणार्य़ा सर्व पेशंटवर उपचार करावे लागतात. पेशंटचा फॉलोअप घ्यावा लागतो. पेशंटच्या व्याधीविषयी व औषधोपचारासंबंधी सर्व माहिती पेशंटच्या केसपेपरमध्ये असते. ही माहिती विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने नेटवरून उपलब्ध करून देता आली तर अशा कामात अधिक सुलभता येईलच शिवाय फक्त सल्ला देण्यासाठी येणार्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपल्या घरातून अशा पेशंटच्या प्रगतीवर नजर ठेवता येईल प्रसंगी औषधोपचारात बदल करता येईल. पूर्ण वेळ डॉक्टर व पेशंटही आपल्य़ा व्याधीविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसाईटच्या माध्यमातून चर्चा करू शकतील.
अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांनी रोगाचे केलेले निदान, सुचविलेली औषधे व पेशंटवर त्याचा झालेला परिणाम यांची नोंद हॉस्पिटलने ठेवण्याची व्यवस्था केली तर कालांतराने हॉस्पिटलकडे वैद्यकीय ज्ञानाचा एक अमूल्य ठेवा तयार होईल. त्याचा उपयोग नव्या डॉक्टरना तर होईलच शिवाय विशिष्ट रोगासाठी कोणती उपाययोजना प्रभावी ठरते याची माहिती नव्या पेशंटवर उपचार करताना उपयोगी पडेल.
हॉस्पिटलच्य़ा सुविधांविषयी व डॉक्टरांविषयी सर्व माहिती वेबसाईटवर असल्यास हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल व लोकांचा हॉस्पिटल सेवेबद्दलचा विश्वास वृद्धींगत होईल.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात आरोग्यसेवा हा सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा व्यवसाय मानला जातो. आरोग्यविम्याच्या स्वरुपात हॉस्पिटल व वैद्यकीय सेवा यांना भरपूर अर्थ साहाय्य मिळते. तरीही औषधोपचाराचा खर्च कोणालाही परवडण्यासारखा नसतो. भारतात वैद्यकीय सेवेचा दर्जा उत्कृष्ट आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. मात्र हॉस्पिटलमधील सुविधा व व्यवस्थापन यात आपण फार मागे आहो. आपल्याकडेही आता सर्व आधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटल उभारली जाऊ लागली आहेत. आरोग्य सेवेशी आरोग्यविम्याची सांगड घालणार्या संस्थाही उदयास आल्या आहेत. अशावेळी व्यवस्थापनात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सूज्ञपणा प्रत्येक हॉस्पिटलने दाखविला पाहिजे. वेबसाईटद्वारे हॉस्पिटलची माहिती जनतेला उपलब्ध करून देणे व त्याद्वारे पेशंट व डॉक्टर यांच्यात प्रभावी संपर्क यंत्रणा करणे त्यासाठी आवश्यक आहे.
हॉस्पिटलच्या वेबसाईटवर खालील माहितीचा समावेश करता येईल.
१. हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीचा फोटो व स्थानदर्शक नकाशा
२. हॉस्पिटलच्या स्थापनेचा थोडक्यात परिचय
३. हॉस्पिटलमधील विविध विभाग, तेथील अत्याधुनिक सोयी व प्रयोग शाळा यांची माहिती व फोटो.
४. पेशंट दाखल करून घेण्याची पद्धत
५. आउटडोअर विभाग, डॉक्टरांचा परिचय व भेटीच्या वेळा व पेशंटसाठी इतर सूचना
६. तातडीची रुग्ण सेवा, रुग्ण्वाहिका, ब्लडबॅंक याविषयी माहिती.
७. संपर्क - महत्वाच्या विभागांचे फोन व इमेल
८. महत्वाच्या रोगांविषयी सर्वसाधारण माहिती व घ्यावयाची काळजी
९. डॉक्टरांचे लेख व सल्ला
१०. हॉस्पिटल - डॉक्टर - पेशंट संवादासाठी विशेष ऑन लाईन सुविधा
ज्ञानदीपने मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटल, सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल व सांगली येथील डॉ. लेंडवे यांच्या ओंकार होमिओ हॉस्पिटलच्या वेबसाईट बनविल्या आहेत. त्यांची चित्रे खाली दिली आहेत.
१. मिरज येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटल
२. सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज
वरील दोन्ही वेबसाईटमध्ये हॉस्पिटलविषयी माहिती आहे मात्र त्यात वरील लेखात व्यक्त केलेल्या ऑनलाईन संपर्क सुविधांचा अजून समावेश केलेला नाही.
सर्व मोठ्या हॉस्पिटल्सनी अशाप्रकारे आपली सर्व माहिती वेबसाइटद्वारे जनतेपर्यंत पोहोचविली तर त्या हॉस्पिटलना त्याचा फायदा होईलच पण लोकांची ही फार सोय होईल व वेळेचा अपव्यय टळून अधिक सुलभतेने रुग्णसेवेचा लाभ घेता येईल.
No comments:
Post a Comment