वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामूळे भारतातल्या सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे.
परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमाची कांटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.
आपल्याकडे पायी चालणारे लोक तसेच ठेले व बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व टृक टृॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होऊ शकत नाही. त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाऱ्या लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतर रहात नाही.
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळया प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त ऑफिस वा दुकानात जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील.
यातील बऱ्याचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे. मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या ऑफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाऱ्या व्यक्ती आता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटच्या माध्यमातून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.
भविष्यात शिक्षणासाठी शाळा, कॉलेजमध्ये जावे लागणार नाही. संगणकावरच दूरस्थ शिक्षण देणाऱ्या मान्यतापात्र संस्थांतर्फे हे सर्व शिक्षण आपल्याला मिळेल. प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा ऑपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेता येईल. औषधेही घरपोच मिळतील.
लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रीया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे या सर्व गोष्टी इंटरनेटच्या साहाय्याने करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी लोक प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही.
भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाऱ्या खर्चातही झपाट्याने घट होत आहे व सर्व सामान्यांच्या आवाक्यात हे प्रभावी माध्यम नजिकच्या भविष्यकाळात येईल. असे झाले तर बऱ्याच लोकांना मोठ्या शहरात वा परदेशात जाऊन राहण्याची गरज पडणार नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. गरज आहे ती त्याच्या योग्य व्यवस्थापनाची व दूरदृष्टीची. अशा संगणक तंत्रज्ञांनी इंटरनेट व वेबसाईटचा कल्पकतेने वापर केला व सर्व लोकांनी या तंत्रज्ञानानाचा डोळसपणे स्वीकार केला तर एरव्ही अशक्य वाटणाऱ्या वाहतुकीसारख्या समस्या सहजपणे सुटतील. लोक शिक्षणाद्वारे अशी संगणक क्रांती करून भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा ज्ञानदीप एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फौंडेशनचा उद्देश आहे.
भविष्यात असे खरोखरीच घडले तर काय होईल? रस्त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त वस्तूंची वाहतूक करण्यासाठीच होईल. लोक आपल्या घरात, खेडेगावात, शेतात राहून सर्व कामे करू शकतील. घरातील लोकांना परस्परांशी बोलायला तसेच जीवन खऱ्या अर्थाने जगायला वेळ मिळेल. पाळणाघरे, वृद्धाश्रम यांची गरज राहणार नाही. मग मोठी शहरे व रस्ते ओस पडतील. पेटृोल डिझेलच्या किंमती खाली येतील. प्रदूषण थांबेल व खऱ्या अर्थाने भारतात नंदनवन अवतरेल. परदेशांतील आपले मौलीक बुद्धीवंतांचे धन भारतात परत येईल व त्या आधारे भारतात राहूनच आपण साऱ्या जगातील उद्योग धंदे व व्यवहार करू शकू.
No comments:
Post a Comment