Thursday, October 16, 2025

भूमितीच्या स्वप्ननगरीत अनुषा भाग- १




अनुषा ही पहिलीत शिकणारी एक हुशार, उत्साही मुलगी होती. तिला रोज शाळेत जायचं फार आवडायचं. दररोज सकाळी ती लवकर उठायची, आंघोळ करून, युनिफॉर्म घालून, आनंदाने शाळेकडे निघायची. तिच्या शिक्षिकेला ती फार आवडायची, आणि अनुषालाही तिची बाई खूप प्रिय होती.


एके दिवशी बाईंनी अनुषाला वर्गासमोर शिक्षिका बनून दाखवायला सांगितलं. अनुषा ना घाबरली, ना लाजली—ती आत्मविश्वासाने पुढे गेली. ती फळ्यावर उभी राहिली आणि वर्गाकडे पाहून म्हणाली,


 “चला, एक ते वीस आकडे म्हणूया!” सगळ्या मुलांनी मोठ्याने आकडे म्हणायला सुरुवात केली. बाई खूप खूश झाल्या आणि बक्षीस म्हणून अनुषाला एक गोष्टीचं पुस्तक दिलं—Alice in Wonderland.

अनुषा आनंदाने घरी धावली. आपल्या छोट्याशा खेळाच्या तंबूत शिरली आणि वाचायला लागली. पण आश्चर्य! पुस्तकाच्या कव्हरवर तिचाच फोटो होता! 



तिने डोळे मिटले… आणि क्षणातच ती एका सुंदर नव्या शाळेच्या इमारतीत उभी होती. तिच्या बाई हसून म्हणाल्या, “अनुषा, तू तर कमाल शिक्षिका आहेस! मी आज थोडी बिझी आहे, तू बाहेर खेळणाऱ्या छोट्या मुलांना शिकवशील का?”

अनुषा मैदानात गेली. तिथे छोटे छोटे मुलं चेंडूसारखी उड्या मारत होती. तिने एका मुलाला हाक मारली, “तुझं नाव काय?”


तो म्हणाला, “माझं नाव पॉइंट.”

दुसऱ्यालाही विचारलं, तोही म्हणाला, “माझं नाव पॉइंट.”

अनुषा गोंधळली. तिने सगळ्या मुलांना एकत्र बोलावलं आणि विचारलं, “तुमचं नाव काय?” सगळ्यांनी एकच उत्तर दिलं—“माझं नाव पॉइंट.”

थोडा विचार करून अनुषाने एक शक्कल लढवली. तिने सगळ्यांना एका रांगेत उभं केलं आणि नावं दिली—Point1, Point2, Point3… अगदी Point20 पर्यंत! आता सगळ्यांना एकमेकांना नावानं हाक मारता येत होतं. सगळे खूश झाले.

नंतर अनुषा त्यांना एका छोट्याशा वर्गात घेऊन गेली. तिथे पाच रांगा आणि प्रत्येकी चार छोटे स्टूल्स होती. पण मुलं बसल्यावर कोण कोण आहे, हे ओळखणं कठीण झालं.

मग अनुषाने नावं थोडी बदलली. “Point” ऐवजी “P” वापरलं आणि प्रत्येक मुलाला त्याच्या रांगेनुसार नाव दिलं—जसं P(1,1), P(1,2), P(1,3), P(1,4)… दुसऱ्या रांगेत P(2,1), P(2,2)… असं पुढे.


आता प्रत्येक मुलाचं नाव वेगळं आणि ओळखण्यास सोपं झालं.

मग अनुषाने त्यांना हातात हात घालून आकृती बनवायला शिकवलं—चौरस, कपाटं, प्लस चिन्ह, अगदी स्वस्तिकही! सगळी मुलं बाहेर धावली आणि हसत खेळत वेगवेगळ्या आकृती बनवू लागली.

बाई आल्या तेव्हा त्या सगळं पाहून थक्क झाल्या. अनुषाने मुलांना टाळ्या वाजवायला सांगितल्या. टाळ्यांचा आवाज इतका मोठा झाला की…

अनुषा जागी झाली!

आई जेवायला बोलवत होती.




No comments:

Post a Comment