Thursday, August 1, 2024

शिक्षणाचे माध्यम - आचार्य विनोबा भावे

 दिनांक १ जुलै २०२४ रोजी वर्धा येथे गांधी सेवाग्रामला भेट दिल्यानंतर तेथे आचार्य विनोबा भावे यांचे शिक्षणः तत्व आणि विचार हे पुस्तक घेतले. 

 त्यातील शिक्षणाच्या माध्यमाची भूमिका ज्ञानदीपशी मिळती जुळती आहे हे वाचून समाधान वाटले. तो लेख खाली देत आहे.
 
शिक्षणाचे माध्यम
 
माध्यम मातृभाषाच हवे. भारतात एक मोठा विचित्र प्रश्न विचारला जातो की शिक्षण मातृभाषेत दिले जावे का? याबाबत दुमत असायलाच नको, गाढवाच्या पिल्लाला विचारले की तुला गाढवाच्या भाषेत ज्ञान द्यावे की सिंहाच्या भाषेत?  तर तो नक्की असेच म्हणेल की सिंहाची भाषा कितीही चांगली असो, मला तर गाढवाचीच भाषा समजेल; सिंहाची नाही. मनुष्याचे हृदय मातृभाषाच ग्रहण करू शकते. शिक्षण तिच्याच द्वारा दिले जावे याबाबत शंका असू नये. माझे तर असे मत आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे शिक्षण मातृभाषेच्या द्वारेच दिले जावे.

 शिक्षणाचे माध्यम काय असावे याबाबत अर्थ चर्चा चालली आहे. उठतो तो  इंग्रजीचा महिमा गातो. इंग्रजी भाषेचा महिमा कोणाला नाकबूल नाही, पण शिक्षणाचे माध्यम काय असावे याच्याशी त्याचा  संबंध काय ?शिक्षणाचे माध्यम बनण्याची अजून आमच्या भाषांची शक्ती नाही. परंतु यात फार मोठा विचारदोष आहे. वस्तुतः शिक्षणाचे माध्यम भाषा असत नाही. कृती असते. बरे, आमच्या भाषा असमर्थ समजल्या जातील, त्या  कोणत्या विषयात? विज्ञानात?  पण विज्ञानाचे प्रयोग तर केल्याने होतात, बोलण्याने होत नाहीत. मग अडचण  कुठे आली?

 परिभाषेचा या लोकांनी एक मोठा बाऊ करून ठेवला आहे. परंतु कोणतेही ज्ञान व विज्ञान पारिभाषिक नसते.अनुभव  प्रथम येतो, मग परिभाषा बनते. प्रत्यक्ष कृतीने अनुभवाचा साक्षात्कार होतो, आणि प्रत्यक्ष कृतीनेच तो करवता येतो. कृती बरोबर शब्दांचाही उपयोग होतो.तेव्हा तूर्त  पारिभाषिक शब्द इंग्रजी चालले तरी हरकत नाही. हायड्रोजनला काय म्हणायचे याचा निर्णय होईपर्यंत हायड्रोजन शब्द भले चालो. हायड्रोजन शब्द चालला म्हणून इंग्रजी भाषा कशात चालायला पाहिजे ?त्याचा उत्तराधिकारी आला म्हणजे तो जाईल. इंग्रजांच्या राज्यात भारतात विज्ञानाचा फारसा प्रसार झाला नाही. कारण विज्ञान इंग्रजी पुस्तकात बंद होते.

 विज्ञान-प्रसारासाठी आवश्यक


 खरे तर विज्ञानाचा सृष्टीशी संबंध असतो. शेती, स्वयंपाक, सफाई - जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात विज्ञानाची गरज असते. इंग्रजीचे ज्ञान नसल्यामुळे कोट्यवधी लोकांना विज्ञानाचे ज्ञान होऊ शकले नाही. आणि आजही लोक विचारतात की इंग्रजीशिवाय विज्ञान कसे शिकता येईल ? विज्ञानाची परिभाषा तर हळूहळू बनत राहील. मात्र विज्ञानाचा मातृभाषेशी संबंध नसेल तर विज्ञान शिकणाऱ्याच्या डोक्यात विज्ञान राहणार नाही. फार मोठी चूक आपण करीत आहोत आपण हा विचारच करीत नाही की विज्ञानासारखी महत्त्वाची गोष्ट मातृभाषेत नसेल तर तिचा प्रसार कसा होणार ?

 आज-काल शेतकी कॉलेज साठी इंग्रजी ज्ञान आवश्यक आहे. इंग्रजीतून शेतीचे ज्ञान  दिले जाते. इंग्रजीतून मुलांना शिकवून उत्पादन वाढत असेल तर मग बैलांनाही इंग्रजी शिकवायला हवे. ही हास्यास्पद गोष्ट आहे. दहा हजार वर्षापासून आमच्याकडे शेती होत आहे, पण आमच्या भाषेत शेतीवर पुस्तके तयार झालेली नाहीत.

आत्मज्ञान तर देशाची वस्तू आहे. मात्र आत्मज्ञानासंबंधी साहित्य जर सगळे संस्कृत मध्ये पडून राहिले असते, तर त्याचा प्रसार जितका आज झाला आहे तितका झाला असता का? ज्यांना वरच्या दर्जाचे चिंतन संशोधन करायचे आहे त्यांनी जरूर संस्कृत शिकावे. परंतु आत्मज्ञानाचा उपयोग आणि प्रसार या गोष्टी संस्कृतच्या माध्यमातून कशा होणार? संशोधन, उपयोग आणि प्रसार या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्मज्ञानाचा उपयोग आणि प्रसार व्हावा यासाठी संतांनी त्याला मातृभाषेत आणले. विज्ञानाच्या बाबतीत तेच करावे लागेल.

 विज्ञानात उच्च दर्जाचे संशोधन करायचे असेल तर इंग्रजी, फ्रेंच वगैरे भाषा शिकाव्या लागतील. परंतु विज्ञानाचा उपयोग व्हावा, त्याचा प्रसार व्हावा, यासाठी मातृभाषेच्या उपयोगाविना गती नाही.संशोधन आणि उपयोग यामधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. रेडिओचा शोध एक गोष्ट आहे पण रेडिओचा उपयोग दुसरी.

 शुद्ध मूर्खपणा

लहानपणापासून मुलांना इंग्रजी शिकवले तर मुले चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतील हा भ्रम आहे. समाजाचे वातावरण इंग्रजी आहे तेथे लहानपणापासून इंग्रजी शिकवता येईल. परंतु जोपर्यंत व्याकरणाच्या माध्यमातून एखादी भाषा शिकवावी लागत आहे, तोपर्यंत मातृभाषेचे व्याकरण आणि साहित्य यांचे उत्तम ज्ञान असल्याशिवाय ती भाषा शिकता येणार नाही. मातृभाषेचे व्याकरण आणि साहित्य यांची ज्याला माहिती नाही तो इतर भाषांचे व्याकरण आणि साहित्य कसा शिकू शकेल? म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

इंग्रजी लादणे हा जुलूम

आज मुलांवर इंग्रजी भाषा ज्या प्रकारे लादली जात आहे, त्यामुळे अत्यंत नुकसान होत आहे. लंडनच्या मुलांना हिंदीत शिकवून बघा, म्हणजे कळेल की त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर किती ताण पडतो. प्राथमिक पातळीवरील पहिली आठ वर्षे तरी इंग्रजी शिकवू नये. त्यानंतर कोणाला इंग्रजी शिकायचे असेल त्याने ती शिकावी. परंतु सर्वांना इंग्रजी शिकण्याची आवश्यकता नाही.सगळ्या  राष्ट्रावर विदेशी भाषा लादली जाते तेव्हा बुद्धी अत्यंत क्षीण होते. भारतात दीडशे वर्षे इंग्रजी चालली, परंतु रवींद्रनाथ आणि श्री अरविंद वगळता कोणाचे साहित्य जगभर वाचले जाते? काही लोकांनी अवश्य इंग्रजी शिकावी, ती लादली मात्र जाऊ नये.ती लादणे हा निव्वळ जुलूम आहे.

मातृभाषा माध्यम व राष्ट्रभाषा

विश्वविद्यालयीन शिक्षणाचे माध्यम ही त्या त्या प्रांताची प्रदेशभाषा असली पाहिजे. सैल  परिभाषेत याला मी मातृभाषा माध्यम म्हणतो. राष्ट्रभाषा अव्वल पासून अखेरपर्यंत सर्वांना सक्तीचा विषय असली पाहिजे. सर्व प्रांतांतील प्रोफेसरांची सेवा सर्वत्र मिळवू शकावी, म्हणून प्रोफेसरांना ते प्रांतभाषेत व्याख्यान देऊ शकत नसतील तर राष्ट्रभाषेत व्याख्यान देण्याची सवलत असली पाहिजे. मला वाटते, इतके केल्याने अखिल भारतीय एकतेची मागणी आणि मातृभाषा माध्यमाचा शिक्षण शास्त्रीय सिद्धांत या दोन्हींचा समन्वय साधला जातो.

 संस्कृतची शब्द-साधनिका


भगवान शंकरांना तिसरा डोळा होता. तिसरा डोळा म्हणजे ज्ञानदृष्टी. तिसरा डोळा असला पाहिजे. संस्कृत ज्ञान अध्ययन आम्हाला लाभदायक ठरेल. मला लोक विचारतात, संस्कृत राष्ट्रभाषा का होऊ नये? मी म्हणतो संस्कृतच राष्ट्रभाषा होईल, नाव हिंदी असेलआणि रूप  संस्कृतचे असेल, शब्द संस्कृतचे असतील आणि विभक्ती प्रत्यय हिंदी चे. संस्कृत मध्ये जो शब्दांचा खजिना आहे ती मुख्य गोष्ट आहे.त्याला मी शब्द-साधनिका म्हणतो. जसे चर धातूपासून विचार, प्रचार, संचार, आचार इ.अनेक शब्द बनले आहेत. संस्कृतचे शब्द धात्वर्थक असतात.

 एकांगी दर्शन नको

अनेकांना वाटते की इंग्रजीच्या ज्ञानाशिवाय शिक्षण अपूर्ण राहील. कारण जगाकडे पाहण्याची ती खिडकी आहे. पण घराला एकच खिडकी असेल, तर सर्वांग दर्शन होणार नाही. भाषा म्हणून सगळ्या मुलांनी इंग्रजी शिकणे हेही धोक्याचे आहे आम्ही स्वतंत्र दृष्टीने जगाकडे पाहू शकणार नाही. इंग्रजी भाषा आमचे डोळे आणि जगातील दृश्य त्यांच्या दरम्यान पडद्या सारखी होतील. आमची इच्छा असो व नसो, आमचा देश इंग्लंड अमेरिकेच्या पक्षात जोडला जाईल. कमीत कमी सात खिडक्या तरी आपण आपल्या घराला ठेवल्या पाहिजेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन या चार युरोपीय भाषा, चिनी व जपानी या दोन पूर्वेच्या भाषा आणि मध्यपूर्वेसाठी अरबी भाषा. तेव्हा जगाचे खरे दर्शन होईल. अन्यथा एकांगी दर्शन होईल.

मुख्य गोष्ट म्हणजे आमचा मानसिक आळस आहे.


 -- आचार्य विनोबा भावे यांच्या शिक्षणः तत्व आणि विचार या पुस्तकावरून टाईप केलेला लेख


ज्ञानदीप फौंडेशनच्या विचार धारेशी समरूप असल्याने साभार सादर
-डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप फौंडेशन, सांगली

No comments:

Post a Comment