Monday, June 14, 2021

पुण्यातील एचसीसी प्रोजेक्टचे माझे अनुभव

 १९६८ मध्ये पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू केल्यानंतर लगेचच मी एमईसाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी माझ्याबरोबर प्रा. दिवाण, पोतदार, घारपुरे होते. शिकविण्यासाठी प्रा. केतकर, एमवायजोशी, कुंटे, छापखाने होते. दुस-या वर्षी मी सेप्टीक टॅंकच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विषय निवडला.

त्यावेळी कॉलेजच्या वॉटर सप्लायचे काम मेकॅनिकलचे प्रा. दिवाण यांचेकडे होते तर कॉलेज, होस्टेल व स्टाफ क्वार्टर्सच्या नव्या ड्रेनेज पाईप घालण्याचे काम आमच्याकडे आले. त्याआधी होस्टेलसाठी प्रा बर्वे यांनी सेप्टीक टॅंक बांधले होते मात्र मेसचे पाणी तसेच बाहेर सोडले जाई. हे सर्व पाणी एकत्र करून त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी परकोलेटिंग फिल्टरचा विषय मी एमईच्या प्रोजेक्टसाठी निवडला. सर्व्हे, ड्रेनेज पाईप, मॅनहोलसहीत सर्व ड्रेनेज व्यवस्था डिझाईनपासून बोँधकामापर्यंतचे काम मला करायला मिळाले.

त्यावेळी मी नवीन व पुस्तकी विद्वान होतो. प्रा. बर्वे, सखदेव, सर्व्हेचे सत्तू, कॉन्ट्रॅक्टर यशवंत कोलप, करंदीकर हे आमचे खरे गुरू होते.  फिल्टर आणि सेटलिंग टॅंक बांधून मला त्या विषयावर एमई करता आली. प्रा. सुब्बाराव हे सांडपाण्याच्या प्रक्रियेत तज्ज्ञ असल्याने मी जलशुद्धीकरणावर लक्ष केंद्रीत करावे असे सुब्बाराव यांनी मला सांगितले. जलशुद्धीकरण यंत्रणेचे डिझाईन आणि बांधणीचा अनुभव घेण्यासाठी १९७२च्या उन्हाळी सुट्टीत पुण्यातील पर्वती वाटरवर्क्सच्या एचसीसी प्रोजेक्टवर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅमखाली तीन महिने अनुभव घेण्याची संधी मला मिळाली.


माझे सासर पुण्यातच होते पण त्यांच्या एका खोलीतील संसारात पाच जण रहात असल्याने मला तेथे राहणे शक्य नव्हते. पुण्यात अलका टॉकिजजवळील एका हॉटेलमध्ये  व नंतर हत्ती गणपती जवळच्या होस्टेलमध्ये या काळात मी रहात होतो.

पर्वतीच्या पायथ्याशी शेल रूफ असणारे चार रॅपिड सॅंड फिल्टर आणि दोन सेटलिंग टॅंक बांधण्याचे काम एचसीसी ला मिळाले होते. त्यांचे इंजिनिअर आणि कर्मचारी तेथेच तट्ट्याच्या कॉलनीत रहात असत. फक्त मुख्य इंजिनिअर कुलकर्णी याना पक्के घर होते.

सकाळी ९ पासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत काम चाले. मी  डिझाईन ऑफिस व कन्स्ट्रक्शन साईट दोन्ही कडे जाऊन काम पहात असे. मी फिटींग कामातील प्रगती, सळई, सिमेंट बॅग, सिमेंट वाळूचे प्रमाण यांच्या नोंदी ठेवी.नोट्स काढून त्या कुलकर्णी इंजिनिअरना दाखवे. जर्मन फर्मच्या ड्राईंग्जवरून नवी ड्राईंग बनविली जात. मुंबईहून मदन नावाचे चीफ इंजिनिअर येऊन मार्गदर्शन करीत. डिझाईन आणि प्रत्यक्ष काम य़ात ब-याच वेळा अनेक बदल करावे लागत. तेथील अनुभवी मेकॅनिक व गवंडी यांना असे बदल करायला मुभा असे. त्यांचा काम करण्याचा झपाटा वाखाणण्यासारखा होता. अनेक वेळा त्यांनी डिझाईनमध्ये सुचविलेले बदल सुपरवायजरलाही मान्य करावे लागत.

म्युनिसिपालिटीचे इंजिनिअर येऊन कामाची पाहणी करून जात. कुलकर्णीसर अगत्याने माझी ओळख करून देत.   ते मला ब-याच गोष्टी कोदून खोदून विचारत. मीही माझ्या नोट्सवरून सर्वकाही त्यांना सांगत असे. यामुळे नियमावर बोट ठेवून एचसीसीच्या कामात चुका काढायला त्यांना संधी मिळे. एचसीसीच्या अधिका-यांनी मग मला मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेत आहे याची जाणीव करून दिली. त्यामुळे मला अशावेळी काय सांगायचे आणि काय नाही हे समजले.

त्यावेळी शेलरूफचे डिझाईन व उभारणी  अवघड आणि नाविन्यपूर्ण होती. अनेक लोक ते काम पहायला येत.  फिल्टरखालील पाईप जोडणी, वाळू चाळून थर करणे, सेटलिंग टॅंकमध्ये ग्राऊंडवाटर अपफ्लो प्रेशर कमी करण्यासाठी रिलीफ व्हाल्व, फ्लॉक्युलेटर व स्क्रॅपरची जोडणी, ओव्हरफ्लो वीअरसाठी व्ही नॉच पट्ट्या बसविणे अशा अनेक गोष्टी प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने मला या ट्रेनिंगचा फार फायदा झाला. शिवाय कर्मचा-यांबरोबर दिवस घालविल्याने त्यांचे जीवन, अडचणी, आकांक्षा याचीही कल्पना आली. म्युनिसिपातलिटीचे फिल्टर ऑपरेटर आणि इंजिनिअर मला फार मान देत. त्यांच्याकडून मला इतर अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.



फिल्टर प्लॅंट प्रत्यक्ष बांधणीचा एक समृद्ध अनुभव मला एचसीसीच्या या प्रोजेक्टमधून मिळाला. १९७३ ता १९७६ या काळात  आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी साठी   कानपूर वाटरवर्क्समध्ये काम करताना  मला या अनुभवाचा फार फायदा झाला.

नीरी, नागपूरमधील माझे अनुभव

 

१९६६ साली सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीई सिव्हील पास झाल्यानंतर लगेच मी त्या कॉलेजमध्ये सिव्हील डिपार्टमेंटमध्ये नोकरीस प्रारंभ केला. माझ्या सुदैवाने त्याच वर्षी अमेरिकेतील ओक्लाहोमा युनिव्हर्सिटीतून एमएस झालेले सुब्बाराव वरिष्ठ प्राध्यापक म्हणून आमच्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. अमेरिकेतील त्यांचे पर्यावरणविषयक नवे ज्ञान आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याची मनीषा बाळगून मी त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांच्या पर्यावरण अभियांत्रिकी विषयात एम.ई. करण्याचे ठरविले.


त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये पब्लिक हेल्थ हा विषय शिकविला जात असला तरी त्याची प्रयोगशाळा नव्हती. नीरी, नागपूरमधील डायरेक्टर डॉ. जी. जे. मोहनराव हे सुब्बाराव यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या ओळखीने नीरीत पर्यावरण प्रयोगशाळेत तीन महिने प्रशिक्षण घेण्याचे मी ठरविले. जागतिक संशोधकांच्या गोष्टी वाचल्या असल्याने भारतातील महत्वाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेत मला काम करायला मिळणार या कल्पनेने मी हुरळून गेलो. पण मला नागपूर नवखे होते आणि इतक्या दूर परक्या शहरात कसे रहायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडला. पण माझे जेष्ठ सहकारी प्रा. श्रीधर करंदीकर नागपूरचे असल्याने त्यांनी आपल्या घरी माझ्या राहण्याची सोय केली. युजीसीची शिष्यवृत्ती मिळवून १९६७ साली मी नागपूरला गेलो. त्यांच्या तीन भाऊ व आईवडील असणा-या कुटुंबात त्यांनी आपलेपणाने मला सामावून घेतले. त्यांचे घर सीताबर्डीत होते. तेथून नीरी ३ किलोमीटर दूर होली. आमच्या घराशेजारी राहणारे देशमुख नीरीमध्ये काम करीत असल्याने त्यांचेबरोबर मी बसने नीरीत जाई.


तेथील प्रत्यक्ष पाणी, मलजल, घनकचरा, हवाप्रदूषण या वेगवेगळ्या विभागात प्रत्येकी १५ दिवस प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला मिळाली. तेथील अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली. डॉ. एस. एन. कौल, डॉ. अलगरस्वामी, डॉ. लक्ष्मीनारायण, डॉ. देशपांडे इत्यादींनी मला बहुमोल मार्गदर्शन केले.


 


त्यावेळी मी जरा धीट व स्पष्टवक्ता होतो. कोणाचीही तमा न बाळगता मी प्रश्न विचारत असे. माझे मतही मांडत असे. नीरीबद्दल माझ्या मनात असलेल्या कल्पनांना मात्र मोठा तडा गेला. तेथे घड्याळाच्या वेळेनुसार व नियमाप्रमाणे चाललेले काम मला आवडले नाही. कर्मचारी, अधिकारी यांच्या संघटना कायदेशीर बाबींचा अतिरेक, विभागाविभागातील दुरावा यामुळे माझे मन खिन्न झाले. संशोधन वा नवनिर्मितीसाठी भूक तहान विसरून व काळवेळाची पर्वा न करता धडपडणा-या शास्त्रज्ञांऐवजी मला चाकोरीबद्ध काम करणारे व पगार आणि बढती आणि अधिकार यात मशगुल असणा-या लोकांचेच तेथे प्राबल्य असल्याचे जाणवले. संशोधनासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत असूनदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन येथे का होत नाही असे मी डॉ. मोहनराव यांना विचारले. तेव्हा त्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे संशोधन प्राथमिकता बदलत राहिल्याने आणि व्यवस्थापनाला मर्यादित अधिकार असल्याचे कारण सांगितले आणि आपली हतबलता व्यक्त केली. अर्थात माझा हा अनुभव १९६८ सालातील आहे. आणि आता त्यात बरेच चांगले बदल झाले असतील असे मला वाटते.

नागपूरचा उन्हाळा, तेथील व-हाडी भाषा, लोकांची आदरातिथ्य व मदत करण्याची वृत्ती आणि करंदीकरांच्या घरातील खेळीमेळीचे प्रसंग आजही माझ्या मनात ताजे आहेत.

नागपूरला पर्यावरण अभियांत्रिकी प्रयोगशाळेत प्रदीर्घ काळ अनुभव घेतल्याने वालचंद कॉलेजमध्ये परतल्यानंतर आम्ही पब्लिक हेल्थ लॅब उभी करायचे मनावर घेतले. कॉलेजचे प्राचार्य श्री. कानिटकर यांनी यासाठी पूर्ण सहकार्य दिले. बीईच्या क्लासरूममध्येच लाकडी पार्टिशन घालून आम्ही प्रयोगशाळा उभारली. सुब्बाराव कॉलेज कॅंम्पसमध्येच रहात असल्याने कॉलेज सुटल्यानंतर रात्रीपर्यंत आणि शनिवारी रविवारी पूर्ण दिवस आम्ही प्रयोगशाळेत काम करीत असू. प्राचार्य कानिटकरही रविवारी प्रयाोगशाळेत येऊन आम्हाला प्रोत्साहन देत.
आज वालचंद कॉलेजमधील सुसज्ज प्रयोगशाळा बघताना नागपूरच्या नीरीमधून आणलेल्या बीजाचा वटवृक्ष झाल्याचे समाधान वाटते.


या जाणिवेतूनच नागपूरला ज्ञानदीपची शाखा काढण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.


डॉ. एन. एस. रमण यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले तेव्हा मला मनस्वी आनंद झाला. ज्या नीरीत मी प्रयोगशाळेचे पहिले धडे गिरविले. त्याच नीरीतील अत्युच्च पदावर असणारी व्यक्ती ज्ञानदीपची पर्यावरण शाखा तयार झाली हे मी माझे परमभाग्य समजतो.