राजकीय मतभेद बाजूला ठेवल्यास, डाव्या कम्युनिस्टांचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी तृणमूल क्रांती करून सत्ता स्थापन केली. हे त्यांचे कार्य निश्चितच स्पृहणीय आहे. मला आठवते की १९७०-७५ च्या काळात आयआयटी कानपूरमध्ये कट्टर डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे खूप व प्राबल्य होते. संप आणि व्यसनाधीनता या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला आक्रमक बनवून प्रस्थापित व्यवस्थापनास विरोध करण्यात तो यशस्वी झाला होता. प्रा. सुब्रह्मण्यम स्वामी, प्रा. धनागरे, डॉ. जी. डी. आगरवाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधायक कार्य करत होता पण अशा विद्यार्थी व प्राध्यापकांची संख्या फार थोडी होती. ममता बॅनर्जींनी जशास तसे या न्यायाने कम्युनिस्टांची आक्रमक शैली उचलून त्यांना नामोहरम केले. समाजवादी व कॉंग्रेस पक्षाने तळागाळातून संघटना बांधण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते पक्ष केवळ नेत्यांचे पक्ष बनले. तळागाळात जेव्हा क्रांती होते त्यावेळीच इच्छित कार्यात यश मिळते हे आता सर्वांना कळून चुकले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात किर्लोस्करांनी उद्योग क्षेत्रात, धोंडो केशव कर्वे, भाउराव पाटील आणि साने गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात, एसएम जोशी,विनोबा भावे,अण्णाभाऊ साठे, शाहूमहाराज यांनी सामाजिक क्षेत्रात, नाना पाटील, सेनापती बापट व लोकमान्य टिळक यांनी राजकीय क्षेत्रात अशीच तृणमूल क्रांती केली.
गरीबी आणि बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे धाव घेत आहेत. त्याचा शेती आणि छोटे स्थानिक उद्योग यावर फार मोठा अनिष्ट परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाच्या दहशतीमुळे पुन्हा शहरातील युवक आपल्या घरी परतत आहेत. सुदैवाने मोबाईल व इंटरनेटमुळे ऑनलाईन शिक्षण वा व्यवसाय करण्याची सोय उपलब्ध झाल्याने हे चित्र पालटेल आणि ग्रामीण भागात सुबत्ता येईल अशी चिन्हे दिसत आहेत.
मात्र ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांना इंग्रजी येत नसल्याने आयटी क्षेत्रातील काम करणे त्यांना दुरापास्त वाटत आहे. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठी स्थानिक भारतीय भाषांत वेबसाईट, मोबाईल सुविधा आणि सॉफ्टवेअर विकसित करण्याचे ठरविले आहे. भारतीय लोकांचा बुद्ध्यांक सर्वसाधारणपणे उच्च प्रतीचा असल्याने आणि जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने सर्वांना घरबसल्या प्रशिक्षण व व्यवसाय करणे शक्य होणार आहे.
अर्थात यासाठी निमशहरे आणि ग्रामीण भागात स्थानिक भारतीय भाषेत संगणक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौडेशनला हे शक्य नसले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्र उभारणीच्या कार्यास वाहून घेतलेल्या संस्थांनी असा उपक्रम हाती घेतला तर अशी तृणमूल क्रांती निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे. असे झाले तर परदेशी बलाढ्य कंपन्यांच्या आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू आणि आपल्या छोट्या उद्योगधंद्यांचे रक्षण व संवर्धन करू शकू. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
Saturday, May 22, 2021
आयटी क्षेत्रात तृणमूल क्रांतीची गरज
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment