Wednesday, January 13, 2021

कोरोनाच्या अंधारात ज्ञानदीपचा इंटरनेट प्रकाश


नमस्कार मंडळी,

या कोरोनाने सारे जग उलटे पालटे करून टाकले आहे. इतके दिवस आपण श्रोत्यात बसून नेत्यांची भाषणे ऐकत होतो. आता आपण स्टेजवर आणि इतर सारे श्रोते बनण्याची वेळ आली आहे. टीव्ही, सिनेमा, नाटक आपण अंधारात बसून पाहण्याची सवय झालेल्या सा-या प्रेक्षकांनाच कॉम्प्युटरच्या पडद्यावर आणून कलाकार बनावे लागत आहे.



सभेत भाषण करण्यास धैर्य लागते. आचार्य अत्रे यांनी शाळेत पहिले भाषण करताना आपली कशी फजिती झाली याचा किस्सा त्यांच्या मी  वक्ता कसा झालो या लेखात  विनोदी शैलीत सांगितला आहे. शिक्षक होणा-या प्रत्येकाला अशा प्रसंगातून जावे लागते. सभाधीटपणा नसल्याने आजही बहुतेक लोक श्रोते वा प्रेक्षक म्हणून राहण्यास पसंती देतात. लेखनाच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार आहे. पण त्यामुळे होते काय की अधिक हुषार, अनुभवी व ज्ञानी व्यक्तीही कायम अंधारात राहतात. त्यांचे विचार, मते व मार्गदर्शन तसेच मौनात विरून जाते. खाजगीत बोलताना मग ते टीका वा स्तुती करण्यात समाधान मानतात.

कोरोनाने सर्वांनाच एकमेकांपासून दूर केल्याने इंटरनेटच्या एकमेव माध्यमाशिवाय प्रत्यक्ष भेट अशक्य झाल्याने, इतके दिवस कधीही प्रकाशात न आलेली माणसे एकदम सा-या जगापुढे येत आहेत. नव्हे त्यांना येणे भाग पडले आहे.


 याचा एक फायदा म्हणजे सभाधीटपणा असण्याची आता गरज उरलेली नाही. कारण आपल्याला घरात बसून व कोणत्याही वेषभूषेत जगातील कोणाशीही संवाद साधणे शक्य झाले आहे. शिवाय आपल्यासा प्रेक्षक दिसत नसल्याने ते दडपणही नाहिसे झाले आहे.

त्यामुळे आता विद्यार्थीही शिक्षक बनू शकतो आणि प्रेक्षकालाही कलाकार बनता येते.

इंटरनेटचा हा उपयोग पाश्चात्य राष्ट्रात व मोठ्या शहरांतील उच्च शिक्षितांना पूर्वीपासून माहिती असला तरी आता लहानांपासून थोरांपर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि महानगरातील बंगल्यापासून ते दुर्गम भागातील झोपडीपर्यंत सर्वांना याचा साक्षात्कार झाला आहे.

आज माझ्या लग्नाचा ५० वा वाढदिवस. माझ्या प्रिय पत्नीच्या कै. सौ. शुभांगीच्या ' मराठी माऊली ' या कवितेतील शब्दांत सांगायचे तर

                            स्थलकालाचे बंधन नुरले

                           अखिल विश्वही तुझे जाहले


अशी स्थिती आज प्रत्येक व्यक्तीची झाली आहे.


याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे वय, पैसा, शिक्षण, धर्म, जात किंवा देश  यामुळे मागे पडलेल्या सर्वांना आपले  कौशल्य, श्रम व बुद्धीमत्ता यांचा उपयोग करून आपली प्रगती करण्याचा व इतरांशी समान पातळीवर स्पर्धा करण्याचा मार्ग खुला झाला आहे.


सा-या जगात खरी लोकशाही येण्याची शक्यता कोरोना संकटाने दृष्टीपथात आणली आहे.

आता आपले काम एवढेच आहे की इंटरनेटने प्रकाशित केलेल्या या प्रगतीच्या रस्त्यावर  निःसंकोचपणे, निर्धाराने आणि जलद वाटचाल करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.

Add caption



ज्ञानदीपने गेली वीस वर्षे जे स्वप्न उराशी बाळगले त्याची प्रतिपूर्ती  अशी अचानक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण, समर्थ आणि सधन झाली तर सारा देश सशक्त होईल व जगाचे नेतृत्व करू शकेल.



No comments:

Post a Comment