Thursday, November 15, 2018

वालचंद कालेज - कै. प्रा. म. वा. जोगळेकर

मी  १९६३-६५ या काळात कराडला एफई, एसई करून  १९६५ मध्ये वालचंद कॉलेजमध्ये बी. ई.च्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी आम्हाला प्रा. ब्रह्मनाळकर, सखदेव, संतपूर, रानडे, एम.डी. भाटे, छापखाने विविध विषय शिकवीत.  कॉलेजमध्ये नव्यानेच दाखल झालेले प्रा. एम. व्ही. जोगळेकर पब्लिक हेल्थ प्राॅजेक्टसाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांच्या  कोणताही विषय सोपा करून सांगण्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण पद्धती व मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

बी.ई. झाल्यावर लगेचच मी कॉलेजवर नोकरीस लागल्याने  मी त्यांच्या अधिक संपर्कात आलो. १९६७ नंतर पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी सुरू झाल्याने व त्यांची खोली त्याजवळच असल्याने आमची चांगली मैत्री जमली. त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्याने ते अंतर्यामी दु:खी होते पण त्यांनी ते कधी दर्शविले नाही. ते नेहमी आनंदी वाटायचे.
प्रा. जोगळेकर अतिशय मनमोकळे,  बोलके  व विलक्षण बुद्धीमान होते. त्यांची खोली सर्वांसाठी सतत उघडी असे. तेथे अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी मी व इतर प्राध्यापकही बिनदिक्कत जात व प्रत्येक विषयावर त्यांचा मौलिक सल्ला घेत.

हायड्रॉलिक्स लॅबच्या वरच्या मजल्याचे बांधकाम करताना त्यांनी वीट बांधकामाचे वेगवेगळे नमुने  विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वापरले होते. अनेक नव्या कॉलेजसाठी मिनी हायड्रॉलिक्स लॅब एआरईतर्फे तयार करऩ्याची कल्पना त्यांचीच.

बी. ई. सिव्हील विद्यार्थ्यांच्या उत्तर भारत सहलीसाठी मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी मला त्यांचे मॅनेजमेंट कौशल्य प्रत्यक्ष  बघायला मिळाले.

एका रेल्वे स्टेशनवर आमची बोगी रात्रीच्या मुक्कामासाठी वेगळी केली होती. आम्ही दोघे एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो तेव्हड्यात काही मुले धावत तेथे आली आणि त्यांनी सांगितले की आपली बोगी ट्रेनला जोडून पुढे गेली आहे. लगेच काहीतरी करा. मी  घाबरलो आमि झटकन उठलो. जोगळेकर शांत होते. ते म्हणाले खाली बैस. मुलांना त्यांनी परत पाठविले  व मला म्हणाले तू काय गाडीमागे पळत जाणार आहेस काय. शांतपणे जेवण कर नंतर बघू. जेवण केल्यावर आम्ही स्टेशनवर गेलो व स्टेशनमास्तरची गाठ घेतली. त्यांनी सांगितले चुकून बोगी जोडली गेली  मी पुढच्या स्टेशनवर बोगी थांबवायला सांगितले आहे.  तुम्हा सर्वांना पुढच्या गाडीने तेथपर्यंत सोडायची व्यवस्था करतो.
एका ठिकाणी आम्ही भाड्याने घेतलेल्या खासगी बसच्या ड्रायव्हरने जादा पैशांची मागणी केली जोगळेकरांनी त्याच्या मालकालाच भेटायचे टरविले. आम्ही दोघेच टांग्याने त्यांच्या अड्ड्यावर गेलो. विद्यार्थ्यांच्या ट्रीपसाठी जादा पैशांऐवजी आणखी कन्सेशन द्यावे असे मालकाला पटवून दिले.

ते मॅनेजमेंटमध्ये गुरू होते. सर्व टीचिंग स्टाफही त्यांना बॉश ( बॉस ) म्हणून संबोधत. पर्ट, सीपीएम, टीक्यूएम या विषयांवर त्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजने अनेक कोर्स घेतले. त्यांच्याबरोबर हैदराबादच्या स्टाफ कॉलेजमध्ये तसेच मुंबईच्या इरिगेशन डिझाईन अॉफिसमध्ये प्रा. संतपूर, पी.ए. कुलकर्णी यांचेसमवेत मला शिकवायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.

धोंडुमामा साठे व एम. टी. ई. सोसायटीच्या स्थापनेपासूनच्या सर्व घटनांची त्यांना इत्थंभूत माहिती होती. वालचंद परिसरातील जमिनीवर त्याच्या पूर्वजांची मालकी होती असा त्यांचा दावा होता. याच इर्षेतून त्यांनी एम. टी. ई. सोसायटीच्या कॉलेजवरील मालकीसाठी कागदोपत्री संघर्ष सुरू केला.
 पुढे कॉलेज सोडून राजारामबापू कॉलेजमध्ये प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी त्या कॉलेजच्या प्रगतीत सर्व लक्ष घालून ते कॉलेज नावारुपाला आणले.

मराठीतून विज्ञानप्रसार हा आम्हा दोघांचा आवडीचा विषय होता. १९८१ साली सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनी स्थापन करण्यात त्यानी मला प्रोत्साहन दिले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे पहिले अध्यक्ष तेच  होते.  १९८३ साली सांगलीतील अखिल भारतीय विज्ञान संमेलन वेलणकर सभागृहात आम्ही आयोजित केले. नंतर ते इस्लामपूरला प्राचार्य असताना १९८९ साली तेथे असेच भव्य संमेलन त्यांच्या सर्वंकष प्रयत्नातून साकार झाले.

 तेथून रिटायर झाल्यानंतर देखील एम. टी. ई. सोसायटीच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपले तन, मन, धन खर्च केले.

 त्याविषयी आणखी खूप काही लिहिता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे आपले दु:ख विसरून इतरांच्या आनंदात सहभागी होऊन सतत विधायक कार्यात मन गुंतवून  समाधान कसे मिळवायचे हे त्यांनीच मला सिकविले.

 त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment