आज १५ ऑगस्ट २०२०. भारताचा स्वातंत्र्यदिन. आजच्या या शुभ मुहुर्तावर ज्ञानदीप फौंडेशन "इलेक्ट्रॉनिक्स छंदवर्ग" सुरू करण्याचा संकल्प करीत आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या " डिजिटल इंडिया" व "मेक इन इंडिया" या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भारताला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरज लागणार आहे. या विषयासंबंधी सर्वसामान्यांच्या मनात एक गूढतेचे वलय असते. रोजच्या जीवनात आपण मोबाईल, रेडिओ, टीव्ही तसेच इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असलो तरी त्याचे कार्य कसे चालते वा त्याची कशी रचना केलेली असते याविषयी आपणास काहीच माहिती नसते. इलेक्ट्रॉनिक्स हे एक अतिशय अवघड व गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असून ते मुलांना समजणार नाही या कल्पनेने शालेय स्तरावरील शिक्षणात या विषयाचा समावेश केलेला नाही असे वाटते.
मात्र शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित वैज्ञानिक उपकरणे मांडली जातात तेव्हा योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मुलांनाही हा विषय समजू शकतो एवढेच नव्हे तर ते स्वत: इलेक्ट्रॉनिक सर्कीट तयार करू शकतात हे लक्षात येते.
डिप्लोमा व पदवीस्तरावरील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातही या विषयाच्या थिअरीवर जास्त भर दिला जात असून प्रत्यक्ष स्वतंत्र उपकरण तयार करण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण व्हावे या दृष्टीने फारसे प्रयत्न केले जात नाहीत.
साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स हा विषय फक्त अभ्यासाचा विषय ठरतो. अमेरिका व इतर विकसित देशात इलेक्ट्रॉनिक्स विषयाला शालेय शिक्षणात फार महत्व दिले जाते. हा विषय शिकणे सोपे जावे व त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची दूर संवेदक आणि स्वयंचलित उपकरणे तयार करता यावीत यासाठी "आर्डिनो" व " रास्बेरी पाय" सारखी उपयुक्त साधने बाजारात उपलब्ध झाली आहेत.
जे विकसित देशात आज चालू आहे ते भारतातही सुरू व्हावे आणि आपले विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे तयार करण्यास सक्षम व्हावीत या हेतूने ज्ञानदीप फौंडेशन या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स छंदवर्गाच्या माध्यमातून या विषयात शिक्षण व संशोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू करीत आहे.
No comments:
Post a Comment