मल्टीमिडीया याला पर्यायी मराठी नाव मी बरेच दिवस शोधत होतो. दृक्श्राव्य हा संस्कृत शब्द योग्य असला तरी तो मराठीसाठी तसा उपराच वाटतो. बहुरंगी करमणूक या पुस्तकाची माहिती लिहिताना मला जाणवले की ‘बहुढंगी’ हाच यासाठी योग्य शब्द ठरेल. बहुरंगी करमणूक या पुस्तकात मुखपृष्ठ सोडल्यास कोठेच वेगळा रंग नाही. पण तेथे रंग हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला आहे. तसेच ढंग हा शब्दही रंग, रूप, आवाज व हालचाल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून वापरता येईल.
संगणक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनोरंजन क्षेत्राला नवी संजीवनी मिळाली आहे.व्हिडीओ गेम्सनी सार्या जगाला भुरळ घातली आहे. विकसित देशात तर पुस्तके, खेळणी, टीव्ही, मोबाईल या सर्व माध्यमात मल्टीमिडीया आधारित मनोरंजन हा मोठा व्यवसाय बनला आहे. २००३ मध्ये मी अमेरिकेत असतानाच मला याची प्रचिती आली होती. माझ्या ब्लॉगची सुरुवात मी Toy Mania या नावाचा लेख लिहून केली होती. त्यात अशा व्यवसायाचा नवीन पिढीवर किती वाईट परिणाम होत आहे याबद्दल मी माझे मत मांडले होते.
आता मल्टीमिडीया तंत्रज्ञानाने मनोरंजनातून शिक्षण देण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही चांगली गोष्ट आहे. बहुरंगी करमणूक या पुस्तकातील हसत खेळत शिक्षण या तत्वाचेच आधुनिक रूप म्हणजे ही बहुढंगी करमणूक आहे असे मला वाटते.
शिक्षणासाठी मल्टीमिडीया तंत्रज्ञान वापरल्याने शिक्षण (e-Learning) तर प्रभावी होतेच पण त्याचे स्वरूप पुस्तकी न राहता त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कोठे व कसा उपयोग होतो हे दाखविता येत असल्याने शिक्षणाचे उद्दिष्टही पूर्णपणे साध्य होते.
शिक्षणातील मल्टीमिडीयाचे महत्व वाढल्याने या तंत्रज्ञानाच्या संशोधनास अधिक चालना मिळाली आहे. फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग व व्हीडिओ एडिटींग या क्षेत्रात जागतिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पुणे, मुंबई, हैदराबाद,बंगलोर, दिल्ली, चेन्नई यासारख्या महानगरात अशा अनेक कंपन्या वरील आधुनिक विषयात तज्ज्ञ असणार्या व्यक्तींच्या शोधात आहेत. दुर्दैवाने प्रचलित शिक्षणपद्धतीत संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयांच्या अभ्यासक्रमातही या तंत्रज्ञानाला विशेष स्थान नाही. शिवाय हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रातील शिक्षणास स्थायी अभ्यासक्रम पद्धत उपयुक्त ठरत नाही.
काळाची पावले ओळखून आमच्या ज्ञानदीप इन्फोटेकमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा अभ्यास व उपयोग ही पद्धत अवलंबल्याने सांगलीसारख्या छोट्या शहरात राहूनही उच्च दर्जाचे काम व मोठ्या शहराप्रमाणे जास्त आर्थिक लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
आता हे ज्ञान सांगलीतील रोजगाराच्या शोधात असणार्या हुशार मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्ञानदीप फौंडेशनने वेब डिझाईन व फ्लॅश/ फ्लेक्स प्रोग्रॅमिंग मराठीतून शिकविण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून याविषयी लेख व प्रात्यक्षिके व प्रकल्प याची माहिती देण्याचा संस्थेचा मनोदय आहे.
याचा पुढचा टप्पा म्हणजे या क्षेत्रात काम करू शकणार्या विविध ठिकाणच्या व्यक्तींना सहभागी करून व प्रशिक्षित करून त्याना घरबसल्या काम मिळवून देणे हा आहे.
No comments:
Post a Comment