Saturday, February 11, 2012

बहुरंगी करमणूक - पुस्तक परिचय

माझे गुरू व नंतर वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधील माझे ज्येष्ठ सहकारी कै. रा. त्र्यं. रानडे यांनी अनेक कोडी, विनोद, कसरती, करामती यांचा संग्रह करून ‘बहुरंगी करमणूक’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. १९४९ ते १९६७ या काळात या पुस्तकाचे तीन भाग प्रसिद्ध झाले. पुस्तकातील भाषा चित्तवेधक व खेळकर शैलीत लिहून कै. रानडे यांनी या पुस्तकांना एक वेगळी उंची मिळवून दिली. ही पुस्तके लहान थोर सर्वांनाच फार आवडली व त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.


आज ही पुस्तके फक्त काही जणांकडे व जुन्या वाचनालयातच उपलब्ध आहेत. आजच्या पिढीला या पुस्तकांची ओळख करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे.
पुस्तकात खालील विभाग आहेत.
* फसाल बरं का !
* हसाल बरं का!
* नीट सांगा बरं का !
* केवळ दृष्टीनेच ओळखा.
* कुठे आहे चूक ?
* बडे आकडेशास्त्रज्ञ व्हा.
* परीक्षा
* उत्तरे
बहुरंगी करमणूक पहिला भाग-प्रास्ताविक - सारांश
अनेकांचा एकच प्रश्न !
कंटाळवाणा काळ काढावयाचा कसा ? ... अगदी सार्‍या सार्‍यांची हीच अडचण.! आणि म्हणूनच पोरासोरांपासून तो म्हातार्‍या कोतार्‍यांपरयंत, छोट्या बाळापासून तो काठी टेकीत जाणार्‍या रंगोपंतापर्यंत, सार्‍यांची हीच अडचण भाग्विण्यासाठी ‘बहुरंगी करमणूक ’ मोठ्या तत्परतेने सिद्ध ठाकले आहे.
अर्थात केवळ कालहरण इतकाच मात्र त्यातील हेतु निश्चित नव्हे. आणखी कितीतरी भाग त्यात आहे.
.....
बहुरंगी करमणूक तुमची प्रवासात उत्तम सोबत करील आणि तुमच्या सहली नि सफर तर त्याविना निश्चित अळणी ठरतील ! हे पुस्तक तुमची भरपूर करमणूक करील. नेहमीच्या चाकोरीबाहेर ते तुम्हाला घेऊन जाईल. निरनिराळ्या करामती नि गमती सांगेल आणि पुस्तक वाचन थांबविल्यावर तुम्हाला आढळून येईल, की तुमचा शीण नाहिसा झाला आहे आणि कंटाळ्याने तर केव्हाच काळे केले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हेही समजून येईल की घटकाभर मन रंजन करता करता या पुस्तकाने तुमच्या मनाला तरतरी आणली आहे नि तुमच्या बुद्धीचे वेगवेगळे पैलूही तुम्हाला कळत नकळत त्याने मोठ्या कौशल्याने उजळले आहेत. तसेच त्याद्वारे चारचौघावर छाप पाडण्यास योग्य अशी नाना प्रकारची भरगच्च सामुग्रीही आता तुमच्या हाती लागली आहे.

`बहुरंगी करमणूक' पुस्तकाच्या तिसर्‍या भागात लेखकाने करमणूक, कोडी व त्यातून मिळणारे शिक्षण व बुद्धीला कार्यप्रवण करण्याचे कार्य कसे होते याविषयी मौलिक विचार मांडले आहेत. ते त्यांच्याच शब्दांत वाचा.



या पुस्तकातील कोडी व कूट प्रश्नांनी मला अधिक चौकस बनविले व करमणुकीच्या या पद्धतीने शिक्षण किती आनंददायी ठरते हे लक्षात आले. स्वतः स्थापत्य अभियांत्रिकीत तज्ज्ञ प्राध्यापक असूनही त्यांनी लहान मुलांसाठी, हसत खेळत त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, यासाठी वेळ काढून अशी पुस्तके लिहिण्याचे कार्य केले. त्यापासून मला अशा कार्याची आवश्यकता पटली असून असे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना माझे नम्र अभिवादन
---
‘बहुरंगी करमणूक’ एकमेव विक्रेते - अभिनव पुस्तक मंदीर, डेक्कन जिमखाना, पुणे - ४

1 comment:

  1. "तर पेटीतील लायब्ररी मधील माझी सर्वात आवडती पुस्तके होती : हॅन्स अँडरसन च्या परीकथा , नाथ माधव आणि वि वा हडप यांच्या कादंबऱ्या पण ती बऱ्याच वेळा मिळायची नाहीत पण जे पुस्तक बहुतेक कोणाला नको असायच ते सारख समोर यायच - "बहुरंगी करमणूक" , लेखक: रा. त्र्यं. रानडे. ते तीन भागात होते. जयंत नारळीकरांनी पण या पुस्तकाचे कौतुक केले आहे पण मला ती अत्यंत बोअर वाटायची आणि त्यापेक्षा शाळेची पुस्तके बरी असे वाटायचे."

    ReplyDelete