Friday, January 14, 2011

जलाशयावर प्रयोगशाळांचे नियंत्रण

प्रयोगशाळांचे नियंत्रण
जलाशयावर प्रभावी नियंत्रण ठेवणे हे जलाशयातील परिस्थितीसंबंधी परिचालकांना किती ज्ञान अहे यावर अवलंबून असते. जेथे कर्मचारी वर्ग मर्यादित असतो अशा लहान जलाशयांच्या बाबतीत प्रत्यक्ष देखभाल व प्रयोगशाळेतील क्रियापद्धतींचा वापर करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. म्हरून येणाऱ्या अडचणींचे स्वरूप व उपलब्ध सोयी यांचा विचार करूनच नियंत्रणाची मर्यादा ठरवावी लागते. तथापि नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचे गुणधर्म माहीत असणे जरूर असते. यासाठी पी.एच्.,गढूळपणा, क्लोरिनची गरज,व कॉलिफॉर्म जीवाणू परीक्षांचा उपयोग नियमितपणे करण्यावर भर दिला पाहिजे.
खोल पाण्यासाठी वापरावयाचे नमुना संच
जलाशयाच्या किंवा सरोवराच्या पाण्यांचे एखाद्या विशिष्ट खोलीवरचे नमुने घ्यावयाचे असतीलतर एक ठराविक प्रकारचे उपकरण वापरावे लागते. शास्त्रीय उपकरणे विकणाऱ्या कंपन्यांकडून ते विकत घेता येते. आकृती एकमध्ये, कोठेही सहज तयार करता येईल असे उपकरण दाखविले आहे. यामध्ये, एक लिटर मापाची, रूंद तोंडाची, प्लॅस्टिकची बाटली पितळी पट्ट्यात बवविलेली असून बाटली पाण्यात बुडेल इतके वजन त्यास लाविलेले असते. (प्लॅस्टिकची बाटली वापरल्यास काचेच्या बाटलीप्रमाणे ती फुटण्याची भीती राहात नाही.) रबरी बुचामध्ये १/ ४ व्यासाची दोन भोके पाडून आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्यात दोन तांब्याच्या नळया बसविलेल्या असतात. त्यातील लांब नळीवाटे पाणी बाटलीच्या तळाशी सोडले जाते व आखूड नळीवाटे हवा बाहेर निघून जाते. ज्या खोलीवरचा नमुना घ्यावयाचा त्या खोलीपर्यंत हे उपकरण दोरीने खाली सोडून दोरीला जरा हिसका देण्यात येतो. (अ- तांब्याची नळी. ब - रबरी बूच. क - एक लिटर मापाची रूंद तोंडाची प्लॅस्टिकची बाटली. ड - आवश्यक तेथे रिव्हेट केलेल्या पितळी पट्ट्या. इ - तांब्याची नळी. फ - रबरी बुचे. ग - दोरी. ह - स्प्रिंग) यामुळे दोरीच्या टोकाची स्प्रिंग ताणली जाऊन नळयांना बसविलेली रबरी बुचे सहज निघून येतात व त्या खोलीवरचे पाणी बाटलीत शिरते. हे उपकरण पृष्ठभागावर ओढून घेतले की बाटलीचे मोठे बूच व नळया काढून टाकण्यात येतात. आणि त्याला नेहमीचे साधे बूच बसविण्यात येते. नंतर दुसरी बाटली या उपकरणात बसवून दुसरा नमुना घेण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो.

जलपरीक्षेतून निर्धारित करावयाच्या बाबी
नमुना घेतलेल्या पाण्याचे तापमानाची प्रथम नोंद करणे आवश्यक असते. पाण्याच्या साठ्यातील प्रत्येक जागी पाण्याचे पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. उदा. गढूळपणा, पी. एच्., अल्कता, विरघळलेला ऑक्सिजन, लोह व मँगेनीज यांचे प्रमाण प्रत्येक जागी निरनिराळे असते. पाण्याचे गुणधर्म ठरविणाऱ्या या घटकांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी पाण्याचे विश्लेषण करावे लागते. जलाशयातील विशिष्ट निवडक ठिकाणी जीवाणूंचे प्रमाण किती आहे हे ठरविण्यासाठी जीवाणूंचे सूक्ष्मदर्शी परीक्षण करावे लागते व त्यावरून जीवाणूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. (सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने पाण्याच्या थेंबातील जीवाणू प्रत्यक्ष बघता येत असल्याने विविध प्रयोगपद्धतींनी या जीवाणूंचे वर्गीकरण करता येते व यावरून विशिष्ट जीवाणू जास्त प्रमाणात असल्या त्यांच्या वाढीस साहाय्यक ठरणारी कारणे शोधून काढता येतात.) या संपूर्ण विश्लेषणामुळे थर्मोक्लाईनची खोली तसेच त्यावरील पृष्ठभागालगतचा भाग व खालचा स्थिर पाण्याचा भाग यांनी किती क्षेत्र व्यापले आहे याची माहिती होते. बहुद्वार जलग्रहणकेंद्रांचा वापर करीत असताना व गाळवाहक नळातून तळाशी असलेले पूर्वीचे पाणी बाहेर सोडून देताना याचा फार उपयोग होतो. तथापि कित्येकवेळी पाण्याचे तापमान व त्यातील जीवाणूंचे प्रमाण एवढ्यापुरतेच जलपरीक्षण मर्यादित ठेवले तरी चालते.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे जलग्रहणकेंद्र ज्या ठिकाणी व जितक्या खोलीवर आहे तेथील पाणीच शुद्धीकरण व्यवस्थेकडे जात असल्यामुळे शुद्धीकरणासाठी नेण्यात येणाऱ्या पाण्याचे गुणधर्म व त्याचा दर्जा जलग्रहणकेंद्राजवळच्या पाण्यासारखाच असतो. जलाशयातील इतर ठिकाणच्या पाण्याचे गुणधर्म यापेक्षा वेगळे असू शकतात. त्या पाण्याचे गुणधर्म खोल पाण्याच्या गुणधर्मापेक्षा अगदी भिन्न असतात. त्यामुळे पृष्ठभागालगतच्या नमुन्यांवरून खोल पाण्याच्या गुणधर्माविषयी काहीच अंदाज बांधता येत नाहीत. म्हणून जलाशयातील ठराविक ठिकाणच्या व ठराविक खोलीवरील पाण्याच्या गुणधर्माची माहिती करून घ्यावयाची असेल तर खोल-पाणी-नमुना संचाचाच वापर करावा लागतो. असा नमुनासंच उपलब्ध नसेल तर शुद्ध करावयाच्या पाण्याचा दर्जा समजण्यासाठी शुद्धीकरणकेंद्राकडे जाणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन त्यांचे परीक्षण करावे लागते.

No comments:

Post a Comment