Friday, October 15, 2010

बांधकाम क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय होलसिम पारितोषिके

पर्यावरणपूरक बांधकामासाठी होलसिम फौंडेशन फॉर सस्टेनेबल कंन्स्ट्रक्शन या कंपनीतर्फे "होलसिम पारितोषिके" या नावाची एक अभिनव व प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत जागतिक स्तरावरील भविष्यकाळास अनुसरून, व्यवहार्य व पर्यावरणपूरक अशा बांधकाम क्षेत्रातील कल्पक प्रोजेक्ट्सची निवड करून त्यांना गौरविले जाते व दोन दशलक्ष डॉलर किमतीची बक्षिसे दर तीन वर्षांनी होणार्‍या या स्पर्धेत दिली जातात. प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर घेतल्या जाणार्‍या या स्पर्धा मुख्य स्पर्धा व नवोदित विद्यार्थ्यांसाठी अशा दोन गटात घेतल्या जातात.

महाराष्ट्रातील हरित गृहरचना (ग्रीन बिल्डींग) करणारे आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक यांना आपल्या कौशल्याचे व प्रोजेक्टचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्यास ही चांगली संधी आहे. या पूर्वीच्या स्पर्धेत सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले व नवोदित गटात ज्ञानदीप फौंडेशनतर्फे दोन विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. मात्र पुरेशी पूर्व तयारी व व्यवस्थित प्रेझेंटेशन न होऊ शकल्यामुळे त्यावेळी निवड झाली नाही. आता यावेळच्या स्पर्धेत जास्तीत जास्त आर्किटेक्टनी यात भाग घ्यावा व ही स्पर्धा गांभिर्याने घेऊन सर्व नियम व अटींची पूर्तता योग्यप्रकारे करावी असे वाटते.

१ जुलै २०१० रोजी स्पर्धकांची नोंदणी सुरू झाली असून २३ मार्च २०११ पर्यंत ती खुली राहणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन करावी लागणार असून प्रोजेक्टच्या प्रगतीनुसार वेळोवेळी माहितीत बदल व सुधारणा करण्यास वाव राहणार आहे. ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत सर्व ते सहकार्य करायला तयार आहे.

स्पर्धेचे दोन गट
१. मुख्य स्पर्धा - सर्वसाधारण गटातील ही स्पर्धा आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या यांच्यासाठी असून तंत्रविज्ञान, पर्यावरण तसेच सामाजिक,आर्थिक व सांस्कृतिक संदर्भात सुयोग्य व सद्यस्थितीस अनुरूप अशा बिल्डींग व बांधकाम प्रोजेक्ट्सचा यात समावेश करता येईल. डिझाइन पूर्ण झालेल्या परंतु १ जुलै २०१० पूर्वी प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात न झालेल्या ( किंवा बांधकाम वस्तू निर्मितीच्या बाबतीत व्यावसायिक उत्पादन सुरू न झालेल्या) प्रोजेक्टनाच या स्पर्धेसाठी प्रस्तुत करता येईल.

२. विद्यार्थ्यांच्या नव्या पिढीसाठी ( नेक्स्ट जनरेशन) स्पर्धा - ही स्पर्धा विद्यापीठ स्तरावरील पदवी परिक्षेच्या अंतिम वर्षातील (पदव्युत्तर व पीएचडीसहित) विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. त्यांना आपले या क्षेत्रातील संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी सादर करता येतील.

भविष्यकालीन गरजांचा शोध घेणारे प्रकल्प
या स्पर्धेचा मुख्य उद्देश प्रचलित बांधकाम क्षेत्रातील ज्ञानापलिकडे भविष्यकालीन गरजांचा शोध घेऊन सामाजिक आर्थिक तसेच पर्यावरणीय निकषांवर उत्कृष्ट ठरणार्‍या व अन्य ठिकाणी वापरात येऊ शकणार्‍या बांधकाम प्रकल्पांचा शोध घेणॆ हा आहे. प्रत्येक प्रवेशिकेची याच महत्वाच्या निकषांवर परिक्षा केली जाणार आहे. बिल्डींग वा स्थापत्य क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प, लँडस्केप, अर्बन प्लॅनिंग व इन्फ्रास्ट्र्क्चर तसेच बांधकाम वस्तू व बांधकाम पद्धती यांचा या स्पर्धेसाठी समावेश करता येईल.

दोन टप्प्यांतील जागतिक स्पर्धा
युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्व देश, व आशिया-पॅसिफिक या जगातील प्रमुख भागांत प्रादेशिक स्तरावर पहिल्या टप्प्यात स्पर्धा जाते. होलसिम फौंडेशनच्या सहयोगी विद्यापिठातील निष्पक्ष तज्ज्ञ परिक्षकांकडून पर्यावरणपूरक बांधकामाच्या वरील मुद्द्यांवर आलेल्या प्रकल्पांचे परीक्षण केले जाते. यात यशस्वी ठरणार्‍या स्पर्धकांना होलसिमतर्फे सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझ पदके दिली जातात. हे यशस्वी स्पर्धकच दुसर्‍या टप्प्यातील जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

२३ मार्च २०१० पर्यंत स्पर्धा प्रवेश खुला
होलसिम स्पर्धेचे तिसरे सत्र १ जुलै २०१० रोजी सुरू झाले असून २३ मार्च २०११ पर्यंत यात स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. ऑनलाईन पद्धतीने इंग्रजीत अगदी सोपा फॉर्म भरुन यात आपल्या सहभागाची व प्रकल्पाची नोंदणी करता येते. या स्पर्धेचे नियम, अटी व प्रवेश फार्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती होलसिम फौंडेशनच्या www.holcimawards.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतात एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेड या कंपन्यांनी संयुक्तपणे होलसिम फौंडेशनच्या वतीने सर्वांना यात भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment