Tuesday, December 4, 2007

ग्रीन संमेलन

सांगली येथे येत्या जानेवारीत भरविले जाणारे ८१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ’ग्रीन’ करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे. सर्वसाधारणपणे ग्रीन या शब्दाचा ’हिरवे ’ वा ’हरित’ असा अर्थ घेतला जाऊन ’ग्रीन’ म्हणजे हिरवळ, बागबगीचा यांची योजना करून आल्हाददायक निसर्गसुंदर वातावरण तयार करणे असे समजले जाते. मात्र जागतिक पातळीवर ’ग्रीन’ हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यात या शब्दाची व्याप्ती खूपच विस्तारलेली धरली जाते. प्रदूषण टाळून पर्यावरणास पोषक असणाऱ्या व ऊर्जा तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करण्याच्या, कोणत्याही स्वयंप्रेरणेने केलेल्या कृतीस ’ग्रीन’ संबोधले जाते.

उद्योगधंदे आणि लोकसंख्या वाढ यामुळे हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण आणि सजीव सृष्टिची होणारी हानी सारख्या घटना जगाच्या चिंतेची बाब बनली आहे. त्यातच आम्ल पर्जन्य, जागतिक तापमानात होणारी वाढ यासाऱख्या पृथ्वीवरील पर्यावरणास धोका पोहोचविणाऱ्या घटनांनी मानवाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे याविषयी लोकजागृती करून प्रभावी उपाययोजना करणे राज्यकर्त्यांना भाग पाडावे व व्यक्तीपासून समाजापर्यंत सर्व थरावर पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न व्हावेत या हेतूने ’ग्रीन’ चळवळीस प्रारंभ झाला. प्रदूषण नियंत्रण व निसर्ग संवर्धन ही उद्दिष्टे ठेवून सुरू झालेली ही चळवळ मानवी व्यवहाराच्या सर्व क्षेत्रात पोहोचणे आवश्यक आहे. ग्रीन ही एक विधायक विचारधारा आहे व जनमानसामध्ये याचे महत्व पटवून देण्याचे कार्य साहित्यिक उत्तमपणे करू शकतात. याच हेतूने सांगलीचे संमेलन ग्रीन करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे.

पर्यावरणास हानी पोहोचविणाऱ्या प्लॅस्टिक, थर्मोकोल, विषारी धातू व रसायनमिश्रीत रंग व सुगंधी द्रव्ये न वापरणे, कागद, कापड, बांबूजन्य पदार्थ, नारळाच्या झावळ्या व काथ्या, ज्यूट यांचा वापर करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून आणि नेहमीच्या ट्यूब व बल्ब ऎवजी सी.एफ.एल. वा एल. ई. डी.चे दिवे वापरून ऊर्जाबचत करणे इत्यादी उपाययोजना यांचा समावेश ग्रीन संकल्पनेत केला जातो.

या संमेलनासाठी बांधकामातील निरुपयोगी झालेल्या लाकडी फळकुटे, बांबू, फुटक्या तुट्क्या फरशा, काचा, आरसे, या सारख्या वस्तूंचा उपयोग करून व त्यांचे रूप पालटून कलात्मक रितीने मंडप व परिसर यांची सजावट केली जाईल. पुरेशा स्वच्छ्तागृहांची व्यवस्था करून सर्व सांडपाण्याचा पुनर्वापर व अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होईल आणि सर्व परिसर स्वच्छ, प्रदूषणमुक्त राहील याची विशेष काळजी घेतली जाईल. रस्त्याकडेने फुलझाडांच्या कुंड्या लावून परिसर सुशोभित केला जाईल. प्लॅस्टिक पिशव्यांऎवजी कागदी वा कापडी पिशव्या व प्लॅस्टिक कप ऎवजी कागदी कप वापरण्याचा आग्रह धरला जाईल. कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी आकर्षक संकलक बसविले जातील. सत्कारासाठी पुष्पगुच्छ व हार तुरे यांचे ऎवजी रोपे वा बीजपाकिटे देण्याविषयी संयोजकांना आवाहन करण्यात येईल. कापडी माहितीफलकांचा उपयोग या ग्रीन संमेलनात केला जाईल. संमेलन परिसरात धूम्रपान वा मद्यपानास बंदी राहील. महाराष्ट्र ऊर्जा विकास मंडळाच्या सहकार्याने सौरशक्ती व पवनऊर्जेचा वापर करून प्रकाशयोजना केली जाईल. झगमगीत व डोळे दिपविणाऱ्या प्रकाशयोजनेऎवजी आवश्यक तेथे व आवश्यक तेवढ्या प्रमाणात सुखकर प्रकाश योजना केली जाईल. अंतर्गत सजावटीसाठी वापरता येणाऱ्या ग्रीन व पऱ्यावरणास पोषक वस्तूंचे प्रदर्शन मांडल्यास समाज प्रबोधनासाठी याचा चांगला उपयोग होईल.ग्रीन संमेलन परिसरात वाहने आणण्यास बंदी राहील व वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली जाईल. सांगलीतील प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. प्रमोद चौगुले यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली इंजिनिअर्स ऍण्ड आर्किटेक्ट्स असोसिएशन च्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. सांगलीतीलच ज्ञानदीप फोंडेशनने सौरऊर्जा, ग्रीन बिल्डींग आणि ग्रीन सिटी या विषयांवर कोल्हापूर, पुणे, नाशिक इत्यादी ठिकाणी कार्यसत्रे घेतली असून ग्रीन सिटी पोर्टल डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यात या विषयातील प्रयोगशील व तज्ज्ञ व्यक्तींचे अभ्यासपूर्ण लेख तसेच ग्रीन तत्वावर आधारलेल्या वास्तूंची छायाचित्रे आहेत.

बांधकाम क्षेत, नगरपालिका व कारखाने यांचेसाठी ग्रीन उपाययोजना करण्याचे प्रयत्न सर्व ठिकाणी सुरू झाले असले तरी साहित्य संमेलनासारख्या समारंभासाठी ग्रीन व्यवस्थेचा हा प्रयोग अभिनव म्हणावा लागेल. समाज व संस्कृतीचे जतन व दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या साहित्यिकांना ग्रीन कल्पनेचे महत्व पटेल व ते ही विचारधारा अधिक प्रभावीपणे जनमानसात रुजवू शकतील. मग या कल्पनेचा विस्तार गावातील जत्रा, आठवड्याचा बाजार, गणेशोत्सव वा लग्नसमारंभ यासारख्या लोकसंमेलनात होऊ लागेल आणि ग्रीन चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

2 comments:

  1. वाढदिवसाच्या शुभेच्छा. ( ऊशीरा का होईना ) आपला बॉग खुपच माहीतीपुर्ण आहे. नियमीत वाचायला मला जरुर आवडेल.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ’ग्रीन’ करण्याचे संयोजकांनी ठरविले आहे हे वाचुन, जाणुन घेवुन खुप बरे वाटले. कोठे तरी एका काळाची गरज असलेला स्त्युत उपक्रम सुरु झाला आहे. खरच हा प्रयोग अभिनव म्हणावा लागेल. पर्यावरणाच्या बाबतीत विचार करणारे फारच थोडे असतात. एक चांगला पायंडा या निमीत्ते घातला जाणार आहे. जमलेच तर हे सारे उमजुन घेण्यासाठी मी साहित्य संमेलनाला येईन. नाहीच जमले तर आपल्या बॉगमधुन त्याचे सविस्तर वॄतांत जाणुन घ्यायला आवडॆल.

    माझा मुलगा सध्या १२ वीत आहे. त्याला पर्यावरणात आपले करीयर करायचे आहे. पुढल्या वर्षी मी त्याला पुण्यात Environment Science या विषयात फर्गुसन महाविद्यालयात शिकायला पाठविणार आहे. पुढे पुणे विद्यापिठातुन त्याला याच विषयात MSC करुन संशोधन करायचे आहे.

    ReplyDelete
  2. आपल्याला सगळ्यांना हे नविन वर्ष सुखासमाधानचे जाओ

    नविन काही ?

    ReplyDelete