Monday, December 3, 2007

वाढदिवस

आज माझा वाढदिवस. वाढदिवस साजरा करण्याइतका मी आता लहान राहिलो नाही समजूनसुद्धा मनात यादिवशी विलक्षण विचारांचे काहूर उठले. अगदी सामान्य घटना म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे विचार झटकून टाकायचे म्हटले तरी पुन्हा पुन्हा आपण मोठे झाल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करीत होती.
आयुष्याच्या या महत्वाच्या कालखंडात मी काय मिळविले व काय गमावले याचा ताळेबंद करण्याची इच्छा झाली पण ’मी’ म्हणजे कोणी? या प्रश्नाशीच विचारांची वावटळ उठली. मी, स्वत:च्या नजरेतून मी, आई वडिलांच्या नजरेतून पहिला मुलगा, पत्नीच्या नजरेतून पती, मुलांच्या नजरेतून बाबा, सहकार्‍यांच्या नजरेतून मित्र, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षक, राष्ट्राच्या नजरेतून एक सर्वसामान्य नागरिक, मानवजातीच्या नजरेतून या कालखंडात जगत असणार्‍या असंख्य मानवप्राण्यांपैकी एक, पृथ्वीच्या नजरेतून एक यकश्चित क्षणभंगुर सजीव, विश्वाच्या नजरेतून तर पूर्णपणे नगण्य, बिदुरूप व क्षणमात्र आस्तित्व. जसजसा मी स्वत:पासून दूर दूर जाऊ लागलो, तसतसे माझे महत्व, माझे कर्तृत्व, किंबहुना माझे अस्तित्वही कमी कमी होत जात आहे व विश्वाच्या पसार्‍यात मी स्वत:लाच पूर्णपणे हरवून जातो आहे असे वाटले. मन क्षणभर सुन्न झाले पण दुसर्‍याच क्षणी अनुभूतींच्या क्षेत्रात उलट क्रम असल्याचे मला जाणवले. विश्वाच्या पसार्‍यात मी नगण्य असलो तरी माझ्या जाणिवेच्या व ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विश्वाचा पसारा नगण्यच होता व याच उलट क्रमाने विचार करता मला माझे स्वत्व सर्वात उत्तुंग व अंतर्बाह्य आकलन झालेले वाटू लागले.
तरीसुद्धा माझी वैज्ञानिक दृष्टी मला इतरांपेक्षा आगळे वेगळे महत्व देण्यास तयार होईना. माझ्याप्रमाणेच इतरांच्या आशा आकांक्षा, भावभावना व स्वत:विषयी तेवढ्याच प्रमाणात तीव्र जाणीवा असणार हे मला उमगले होते. त्यामुळे मी म्हणजे कोणी अलौकिक, असामान्य आहे असा भ्रम माझ्या मनात झाला नाही. ज्यावेळी असा भ्रम होतो तेव्हाच स्वत:ची स्मृती चिरंतन करण्याचा ध्यास माणसाला लागतो व त्यातून आत्मचरित्राचा प्रपंच उभा राहतो. लोक आत्मचरित्र का लिहितात? मी लिहावे का? का मी लिहावे? आपल्या जीवनात असे काही विलक्षण प्रसंग घडले आहेत का की ज्यामुळे लोकांना मार्गदर्शन होईल, शिकवण मिळेल वा निदान मनोसंजन तरी होईल? माझे कर्तृत्व एवढे मोठे आहे का की लोक माझ्यासारखे बनण्याचा ध्यास घेतील? माझ्या अंगात एवढा प्रामाणिकपणा व धाडस आहे का की मी माझ्या जीवनातील प्रसंग वास्तव रुपात सादर करेन. माझी अशी खात्री आहे का की माझ्या लिखाणातून नकळतही माझी वृथा स्तुती वा माझ्या कृतीचे आंधळे समर्थन होणार नाही ? या सर्व प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नाही असले तर मला आत्मचरित्राचा खरा अधिकार नाही असे माझ्या तर्कबुद्धीला वाटते आणि वरील प्रश्नांना ठामपणे होय असे उत्तर देण्याइतके माझे मन समर्थ नाही हे मला चाण्गले ठाऊक आहे. त्यामुळे मी स्वत;चे आत्मचरित्र लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही.
यापेक्षा मला दुसरा पर्याय जास्त योग्य वाटतो. तो म्हणजे मनात येणारे विचार ग्रथित करण्याचा. स्मृती राहिली तर विचारांची रहावी व्यक्तीची नव्हे कारण विचारावाचून व्यक्ती म्हणजे नुसती सजीवता आहे. व्यक्तीवाचून विचार म्हणजे त्या व्यक्तीच्या भावजीवनाचे व बुद्धिप्रगल्भतेचे सार आहे. त्यास व्यक्तित्वाची पुटे चढली की ते निष्प्रभ व चाकोरीबद्ध होते. आपले विचार इतरांना मार्गदर्शक ठरतील एवढे प्रगल्भ आहेत क? पण सुदैवाने याची काही गरज नाही कारण विचार व भावना यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या विविधरंगी, विविधढंगी स्वरूपातूनच माणसास बरेच ज्ञान ग्रहण करता येते. मग ते विचार परिस्थितीशी मिळते घेणारे वा टक्कर घेणारे असोत ; भावना आशादायी वा पराभूत मनोवृत्तीच्या द्योतक असोत त्यांच्या परिशीलनाने माणसास विचारांचे व भावनांचे विविध पैलू लक्षात येतात. स्वत: विचार, भावनांना योग्य त्या प्रकारे आकार देण्याचे, बदलण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते. आणि त्यावेळी अगदी उलट परिणामही होऊ शकतात. पिचलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या सम्यक दर्शनातून एखादी व्यक्ती संघर्षास तयार व आशावादी होऊ शकते. अशी व्यक्ती त्यामुळे जीवनात यशस्वी होण्याची श्क्यता असते. त्यामुळे विचारांचे प्रकटीकरण व प्रसार यावर सर्वांनी भर दिल्यास विचारांची झेप व मर्याद याविषयी मानवसमूहाच्या सामूहिक ज्ञानात प्रत्यही भर पडत राहील.

म्हणूनच व्यक्तीगौरवाच्या भूमिकेतून नव्हे तर व्यक्तिनिरपेक्ष विचारदर्शनाच्या भूमिकेतून मनात येणारे विचार मांडण्याचे मी ठरविले आहे. अर्थात ते कोणी लगेच वाचोत वा न वाचोत. आज मला ठरवायचे आहे की नियमितपणे आपल्या विचारांना शब्दरूप देणे व कागदावर ते उतरविणे. आज वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या व्यक्तित्वाची वस्त्रे बाजूला ठेवून विचारांच्या पातळीवर उतरलो ही खचितच आनंदाची गोष्ट आहे.

2 comments:

  1. आपले विचार जरुर मांडावेत, आम्हाला ते जाणुन घेण्यासाठी खुप आवडॆल.

    मी एकदा "आयुष्याच्या कालखंडात मी काय मिळविले व काय गमावले " हे जाणुन घेण्यासाठी एकटा दिवेआगर येथे जावुन राहीलो होतो.
    परत आल्यावर पुन्हा तेच जिवनचक्र सुरु झाले हा भाग अलग.

    ReplyDelete
  2. आज माझ्या वाढदिवसा दिवशी आपले हे विचार वाचून खुप वेगळे वाटले. हो आनंद तर झालाच, पण हे तर माझेच विचार आहेत असेहि वाटले. आपण स्वतः कोणी असामन्य नाही, आणि त्यामुळे जगातील सर्व (सुखे, पैसा, प्रसिद्धि...) आपल्यालाच मिळाले पहिजे असे मला वाटत नाही. प्रत्येकाने कायम फक्त स्वतःचा विचार न करता, ह्या मानवजातिसाठी, जगासाठी काहितरी करावे निदान असा विचार तरी करावा असे वाटते. मी बरेचदा असा काही विचार करत असतो, पण तो कधिहि प्रकट पणे लिहायचे धाडस झाले नाही. आज हा ब्लॉग वाचुन माझेच विचार आपण मला माझ्या वाढदिवसाची भेट म्हणुन दिल्यासारखे वाटले. त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद!

    ReplyDelete