सांगलीतील प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी आपल्या जनस्वास्थ्य मासिकातून गेली अनेक वर्षे मराठीतून आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे अभिनंदनीय कार्य केले आहे. विविध रोगांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांना लेख लिहिण्यासाठी त्यानी आमंत्रित केले होते. मासिकाच्या डिझाईन व संपादनात माधवनगरचे प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर उपळावीकर यांचे मोठे योगदान राहिलेले आहे.लक्षवेधी व कल्पक अशी मुखपत्रावरील त्यांची चित्रे व मांडणी हे मासिकाचे खास आकर्षण होते. आता ते मासिक बंद पडले असले तरी मी अजूनही पूर्वीची सर्व मासिके जपून ठेवली आहेत.
दमा हा माझा जीवनभर साथी राहिल्याने डॉ. मडके यांचेशी पेशंट या नात्याने गेली चाळीस वर्षे संबंध आहे. योगायोग म्हणजे १९८९साली मला अचानक फीट आली आणि त्याचे निदान पाचसहा वर्षांनी मेंदूतील क्षयरोग असल्याचे समजले. मधल्या काळात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, अॅलोपॅथिक औषधे मी घेतली. मिरजेतील डॉ. करमरकर, डॉ.मेहता, न्यूरोलॉजिस्ट डॉ. मोहिरे सांगलीतील डॉ. वसवाडे, डॉ.दिवेकर, डॉ.जावडेकर यांच्याकडे तपासण्या आणि औषधोपचार ट्रायल्स यात तीन चार वर्षे गेली. केईएमला जाऊन मेंदूचे ऑपरेशन करण्याचेही ठरले होते, मात्र तेथील अनुभवी डॉ. कापरेकर यांच्या सल्ल्याने तो बेत रद्द केला. शेवटी स्ट्रेप्टोमायसिनची दररोज एक ग्रॅम प्रमाणे याप्रमाणे ९० दिवस इंजेक्शन घेतल्यानंतरच या रोगापासून माझी पूर्णपणे सुटका झाली. क्षयरोगाशी प्रत्यक्ष असा जीवघेणा संघर्ष केल्यामुळे मला डॉ. मडके यांच्या क्षयरोगावर मात या पुस्तकाबाबत मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
२००८ मध्ये मी डॉ. मडके यांच्या दवाखान्यात आयसीयूमध्ये अॅडमिट होतो. या काळात मला त्यांच्या दिलदार व अभ्यासू मनोवृत्तीची ओळख झाली होती. त्यांनी त्यावेळी मला त्यांचे दमा हे पुस्तक भेट दिले होते.
ज्ञानदीपच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे वीस वर्षांपूर्वी आम्ही डॉ. मडके यांच्या दवाखान्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केले होते. त्यावेळी डॉ. मडके आणि डॉ. उपळावीकर यांचेशी आमची चर्चा होत असे. डॉ. उपळावीकरांचा इंजिनिअर मुलगा शैलेश ज्ञानदीपमध्ये डेव्हलपर म्हणून रुजू झाला व त्याच्या साहाय्याने आम्ही बरेच चांगले प्रॉजेक्ट्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.
दिनांक २४ मार्च २०२५ रोजी माझी त्यांची पुन्हा भेट झाली आणि क्षयरोगावर मात हे बहुमोल माहितीचे पुस्तक माझ्या हाती पडले.
या कार्यक्रमाचे सर्व रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलवर केले व ते व्हिडीओ सर्वांच्या माहितीसाठी युट्यूबवर प्रसिद्ध केले आहेत.
डॉ. मडके यांचे या लोकोपयोगी कार्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्याबद्दल शुभेच्छा.