Saturday, October 2, 2010

महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ

Here is the link to my earlier blog
Mahatma Gandhi - The great legendary guide for tomorrow's world
Marathi translation of this blog

महात्मा गांधी - उद्याच्या शांतताप्रेमी जगासाठी महान मार्गदर्शक तत्वज्ञ

आज गांधी जयंती. निदान आजच्या या शुभदिनी तरी भारतासह सार्‍या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींचे विचार समजवून घेण्याचा प्रयत्न करू या.
सर्व धर्म समभाव, हिंदुत्व व समाजवाद या तीनही विचारधारांचा योग्य समन्वय करून त्यांनी भारताला सुयोग्य अशा राष्ट्रीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला तसेच जगातील इतर देशांसाठीही अशा प्रकारच्या शांततामय सहजीवनाचे उद्दीष्ट असणार्‍या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास उद्युक्त केले. त्यांची मानवता, निसर्ग, आपला स्वतःचा धर्म यावरील श्रद्धा, जीवनातील साधेपणा व अहिंसेवरील गाढा विश्वास यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व स्थलकालातीत आदर्श बनले आहे.

सारे जग आज हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले आहे, मोठ्या साम्राज्यवादी संस्थांच्या शोषण व पिळवणूक यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे आणि मानवी लालसेपायी पृथ्वीवरील निसर्गास धोका निर्माण झाला आहे. यापरिस्थितीत महात्मा गांधींच्या विचारांची सार्‍या जगाला आज खरी गरज आहे.

अहिंसक सामाजिक चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांच्या जीवनाची महान उपलब्धी होती. या यशामुळे अहिंसक मार्गाच्या क्षमतेला नवी ताकद मिळाली व कोणत्याही सामाजिक, आर्थिक, राजकीय वा पर्यावरणीय व्यवस्थेतील बदलासाठी ते एक प्रभावी, सर्वमान्य व विधायक साधन बनले.

विविध धर्म, भाषा याबरोबरच सामाजिक व आर्थिक विषमतेने ग्रासलेल्या व लहान मोठ्या समूहांत वा संस्थानांत विभागलेल्या भारतावर राज्य करताना प्रशासकीय सोयीसाठी स्वातंत्र्यापूर्वीच्या ब्रिटीश शासकांनी व्यवस्थापन व कायद्याची चौकट तयार केली होती. आपल्या पूर्वजांनी शांततामय सहजीवनाचे तत्व आपल्या भारतीय संस्कृतीस दिले होते. अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात निर्माण केली. सरदार पटेलांनी सारा भारत देश एकत्र जोडून भारतीय संघराज्य बनविण्याचे महान कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म समभाव, लोकशाही व समाजवाद या तीन मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटना तयार केली.

दुर्दैवाने गेल्या साठ वर्षांत भारतातील जनता या आपल्या स्वीकृत मार्गापासून दूर गेली आहे. आज पण आपण काय पाहतो? धर्म, लोकशाही व समाजवाद या तीनही संकल्पनांचा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी वा राजकीय लाभासाठी उपयोग केला जात आहे असे दिसते.

लोकशाहीचे यश हे स्वयंशिस्तीवर अवलंबून असते हे आपण विसरलो आहोत. सर्व राजकीय पक्ष लोकशाहीबद्दल आपली आस्था व्यक्त करतात मात्र प्रत्यक्षात लोकशाहीच्या खालील मूलभूत आवश्यक बाबींचा विचार करीत नाहीत.

१. जबाबदारी - व्यक्तीस्वातंत्र्याची हमी नागरिकांना घटनेने दिली असली तरी कोणाही व्यक्ती,धर्म वा सामाजिक गटाविरुद्ध मानहानीकारक वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. प्रत्येकाने दुसर्‍याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे. जरी दुसर्‍याची मते मान्य नसतील वा सामाजिक तणाव निर्माण करणारी असतील तरी फक्त अहिंसक व विधायक मार्गानेच त्यास विरोध करण्याचा अधिकार आपल्याला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

२. कायदा - कोणाही व्यक्तीला वा संस्थेला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कृती करावयास हवी. म्हणजे कोणाच्याही दैनंदिन कामातील अडथळा, तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

३. प्रामाणिकपणा - तुम्ही तुमच्या तत्वांशी व अंगीकृत कार्याशी प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणा हा शब्द आता एतिहासिक बनला आहे. जुने, सेवानिवृत्त वृद्ध प्रामाणिकपणाच्या व निष्ठेच्या गोष्टी सांगतात. आता लोक एका रात्रीत आपला पक्ष बदलतात आणि आयुष्यभर ज्या पक्षाची तत्वे स्वीकारली त्यांच्या पूर्ण्पणे विरोधी मते असणार्‍या पक्षाशी आपली निष्ठा जाहीर करतात. दुर्दैवाने त्यांचे पाठीराखे आपल्या नेत्याच्या निर्णयाबरोबर एका मिनिटात आपली निष्ठा बदलतात.

४. पूर्वगृहापासून फारकत - कोणतीही घटना ही कोणताही पूर्वगृह न ठेवता त्रयस्थ दृष्टिने व केवल राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून तपासणे आवशयक आहे. मात्र असे दिसते की कोणी वा कोणत्या पक्षाच्या संदर्भात ही घटना आहे याचाच फक्त विचार केला जातो व त्यावरून मत बनविले जाते. यामुळे कोणतीही घटना विपर्यस्त स्वरुपात लोकांपुढे मांडली जाते व समाजात परस्परविरोधी गट तयार होतात.

शोषित व्यक्ती संप, रास्ता रोको, जाळपोळ, तोडफोड याद्वारे आपला संताप व्यक्त करतात. राजकीय नेते व समाजसेवक याबाबतीत शासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत न करता अशा विध्वंसक कृत्यांना फूस देतात, त्याचे समर्थन करतात वा दुसर्‍या पक्षाला दोषी धरतात. शोषित वा अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी गांधींच्या अहिंसक मार्गांचा वापर केला जात नाही.

काहीवेळा गांधींच्या अहिंसक मार्गांचा ( सविनय कायदेभंग वा प्राणांतिक उपोषण ) मार्गांचा उपयोग व्यक्तिगत वा गटाच्या स्वार्थासाठी सरकारवर दडपण आणण्यासाठी केला जातो. तेही चूक आहे. आपल्या हट्टाग्रहासाठी अशा साधनांचा वापर केला तर लोकशाहीची आपन प्रतारणा करीत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.

मला असे वाटते की सर्वत्र पसरलेला व प्रतिष्ठा पावलेला भ्रष्टाचार हा लोकशाही व समाजवादातील मोठा अडसर आहे. पुषकळदा मला हे नवल वाटते की एवढा भ्रष्टाचार असूनही भारतात लोकशाही अजून कशी टिकून आहे. महात्मा गांधींनी अनुसरलेल्या तत्वांचा प्रभाव सर्वसामान्य लोकांवर अढळ आहे व त्याचाच हा परिणाम आहे. मात्र त्यांच्या सहनशीलतेला योग्य प्रतिसाद न मिळाला तर आत्महत्येसारख्या दुदैवी घटना वा चोर्‍या, गुन्हेगारी व हिंसक उद्रेक होऊन लोकशाहीचाच अंत होण्याची व ती जागा लष्करी, साम्राज्यवादी वा दमनकारी समाजवादी यांनी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय समाजवाद व लोकशाही यांच्या रक्षणासाठी आज महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपण्याचा व ते विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निश्चय करूया.

No comments:

Post a Comment