Friday, October 15, 2010

वेबसाईटचे नाव - डोमेन नेम

ब्राउजर व सर्व्हरची माहिती घेताना वेबसाईटच्या डोमेन नेमचा उल्लेख केला नव्हता. मात्र स्थानिक इंट्रानेट असो की बाहेरचे विश्वव्यापी इंटरनेट असो वेबसाईटला काहीतरी विशिष्ट नाव असावे लागते. विश्वव्यापी इंटरनेटला वेबसाईट जोडली असेल तर ते एकमेवाद्वितीय असणे आवश्यक ठरते अन्यथा एकाच नावाच्या दोन वेबसाईट असल्या तर सर्व्हर वा ब्राउजर या दोहोंसाठी ते अडचणीचे ठरेल. स्थानिक इंट्रानेटच्या बाबतीतही एका इंट्रानेटमध्ये प्रत्येक वेबसाइटचे नाव वेगळे असावेच लागते.भले तसेच नाव दुसर्‍या स्वतंत्र इंट्रानेटमधे वापरले असले तरी फारसे बिघडत नाही. कारण ते फक्त अंतर्गत वापरासाठी असते.

वेबसाईटचे नाव कसे असावे
डोमेन नेम किंवा वेबसाईटचे नाव हे सुटसुटीत, अर्थवाही व लक्षात ठेवण्याजोगे असावे. नाव लिहिताना स्पेलिंग चुकेल असे शब्द वापरू नयेत. खुद्द आमच्या संस्थांच्या वेबसाइटची नावे www.dnyandeep.com व www.dnyandeep.net ही स्पेलिंग खास चुकणारी असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. यापेक्षा आद्याक्षरे वापरून dipl व derf अशी ठेवली असती तर जास्त बरे झाले असते. काही वेळा ग्राहकाच्या इच्छेनुसार व आग्रहानुसार मोठे नाव ठेवले जाते. उदाहरणार्थ www.patwardhanhighschoolsangli.org मात्र या लाबलचक नावामुळे फारच थोडे लोक या वेबसाईटकडे वळतात. www.mymarathi.com या नावातील com या दुय्यम नावामुळे वेबसाईट व्यावसायिक असल्याचे भासते. tata.com,godaddy.com, yahoo.com ही नावे अधिक चांगली आहेत. काहीवेळा अर्थवाही अंक वा अक्षरे वापरून नाव सुटसुटीत करता येते. उदा. school4all.org,esakal.com,net4.in,way2sms.com. एखादी संस्था दरवर्षी एक कार्यक्रम वा सेमिनार करीत असेल तर त्या नावाने (वर्षाचा उल्लेख न करता) वेबसाईट करणे योग्य असते. उदा. habitat2010.org ऎवजी habitat.org कारण यामध्ये पूर्वीच्या कार्यक्रमांची नोंद ठेवता येते. पूर्वीच्या चुका होऊ नयेत म्हणून ज्ञानदीपतर्फे आता ग्राहकांचे प्रबोधन करून योग्य नाव सुचविले जाते.


इंट्रानेटमध्ये सहसा प्रत्येक कॉम्प्युटर वेगळ्या नावाने ओळखला जातो. व त्याला खाजगी IP - Internet Protocol (पत्ता) दिला जातो. मात्र बाह्य इंटरनेटसाठी वेबसाईटला निश्चित असा पूर्ण पत्ता (FQDNs - Fuuly qualified domain name) व सार्वजनिक पत्ता (public IP address) देणे आवश्यक असते. इंन्ट्रानेट व इंटरनेट सर्व्हरच्या नावाचा (host header name) वापर करुन एकमेकांशी संपर्क ठेवू शकतात या व्यवस्थेद्वारे एकच IP address अनेक वेबसाईटसाठी वापरणे शक्य होते.

कॉम्प्युटरचे नाव चार संख्यांच्या समूहाने दर्शविले जाते. त्यातील प्रत्येक संख्या 0 ते 255 या दरम्यान असावी लागते. सहसा ही नावे एका सबनेटमधील दि्ली जातात. उदाहरणार्थ 192.168.10.0 या सबनेटमध्ये 192.168.10.1 ते 192.168.10.254 पर्यंत नावे देता येतात. जरी चार संख्यांचे नाव वेबसाईटला दिले तरी ते लक्षात ठेवणे अवघड जाते यासाठी वेबसाईटच्या विषयाशी वा संस्थेशी संबधित असे शब्द वापरून पर्यायी नाव तयार केले जाते यालाच डोमेन नेम (Domain Name) असे म्हणतात. या नावात दोन भाग असतात. पहिल्या भागात वेबसाईटसंबंधित नावतर दुसर्‍या भागात वेबसाईटचा प्रकार ओळखता यावा यासाठी प्रचलित असे com, gov,org, net,in यासारखे दुय्यम नाव घेऊन व एका बिंदूने ते भाग जोडून पूर्ण डोमेन नेम तयार करतात. जसे dnyandeep.net. www ही अक्षरे या नावाआधी बिंदूने जोडली की बाह्य इंटरनेटसाठी पूर्ण नाव www.dnyandeep.net असे तयार होते.

दुय्यम नाव com असेल तर वेबसाईट व्यावसायिक आहे gov असेल तर शासकीय आहे व org असेल तर धर्मादाय संस्थेची वेबसाईट आहे असे ऒळखता येते. देश व प्रदेशाप्रमाणेही दुय्यम नाव देता येते जसे in ( India), au ( Australia), uk( United Kingdom),asia इत्यादी. आता net,tv,biz इत्यादी बरीच नवी दुय्यम नावे वापरली जाऊ लागली आहेत व केवळ दुय्यम नावाने वेबसाईटचा प्रकार निश्चित करता येत नाही.

इंट्रानेट( स्थानिक खाजगी नेटवर्क) साठी खालील सबनेट राखीव ठेवण्यात आले आहेत.
10.0.0.0 - 10.255.255.255
172.16.0.0 - 172.31.255.255
192.168.0.0 - 192.168.255.255
इंट्रानेटमध्ये कॉम्प्युटरच्या नेटबायॉस नावाशी अक्षरी नाव जॊडले जाते.

बाह्य इंटरनेटवर संदेश पाठविणे व ग्रहण करणे यासाठी (TCP/IP - Transmission Control Protocol/Internet Protocol) या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीनुसार नाव जोडणीसाठी डोमेन नेम सिस्टीम (DNS - Domain Name System) वापरली जाते. ISP (Internet Service Provider) कंपन्या अमेरिकन रजिस्ट्री फॉर इंटरनेट नंबर्स या संस्थेकडून IP address चे ब्लॊक्स ( सबनेट्स) विकत घेतात. त्यातील एक पत्ता वेबसाईटच्या नावाशी (डोमेन नेम) जोडून ते नाव जागतिक रजिस्टरमध्ये नोंदले जाते. यालाच डोमेन रजिस्ट्रेशन असे म्हणतात. हे नाव उपलब्ध आहे की नाही हे IANA - Internet Assigned Numbers Authority यांच्या मध्यवर्ती रजिस्टरमध्ये पडताळून पाहूनच हे रजिस्ट्रेशन केले जाते. या कामासाठी व IP address साठी ISP कंपनीकडून दरवर्षी भाडे आकारले जाते. दुय्यम नावानुसार व मागणीनुसार या भाड्यात फेरबदल केले जातात.

वेबसाईटचा पत्ता ओळखण्यास खालील गोष्टींची आवश्यकता असते.
१. ज्या कॉम्प्युटरवर वेबसाईट ठेवली आहे त्या कॉम्प्युटर(सर्व्हेर)चे नाव
२. IP address
३. पोर्ट नंबर (कॉम्प्युटरवरील वेबसाईटच्या मेमरी लोकेशनचा पत्ता)
४. सर्व्हरचे पर्यायी नाव ( Host header name)

इंटरनेटवर वेबसाईट शोधण्यासाठी URL(Universal Resource Locator) लिंकचा वापर करता येतो. उदा हरणार्थ http://www.microsoft.com (शाब्दिक नाव) किंवा http://207.46.230.210( IP address - सांकेतिक मूळ नाव) या नावाला जोडून पोर्ट नंबरही देता येतो. उदा.http://www.microsoft.com.80/ किंवा http://207.46.230.210.80

कॉम्प्युटरचा IP address व TCP/IP सेटींग शोधणे
कॉम्प्युटरच्या कंट्रोल पॅनेलमध्ये नेटवर्क कनेक्शन पर्याय निवडून त्यावर डबल क्लिक केले की लोकल एरिया नेटवर्कचा पर्याय दिसतो. त्यावर राईटक्लिक करून प्रॉपर्टीज हा पर्याय निवडावा. येणार्य़ा डायलॉग बॉक्समधील TCP/IP वर क्लिक करावे. म्हणजे IP address व TCP/IP ची सेटींग दिसतील.

1 comment:

  1. Got a significant increase in knowledge about the different aspects and internet technologies.
    Sir, if I were to set up a small mail network on an intranet than what all things should I know?

    ReplyDelete