Monday, October 18, 2010

स्टॅटिक व डायनॅमिक वेबसाईट

आतापर्यंत आपण जे वेबसाईटचे डिझाईन पाहिले त्यात आपण तयार करून सर्व्हरवर ठेवलेले वेबपेज जसेच्या तसे ब्राउजरकडे पाठविले जाते व ते स्क्रीनवर दिसते. कॉम्प्युटरकडून प्रिंटरकडे छपाईसाठी पाठविण्याप्रमाणेच हे काम असते. अशा वेबसाईटला स्टॅटिक वेबसाईट म्हणतात.

प्रत्येक ग्राहकाच्या इच्छेनुसार त्यात बदल करण्याचे वा आवश्यक ती वेगळी माहिती मिळवून ती देण्याचे काम करण्यासाठी आवश्यक त्या प्रोग्रॅमिंगचे कौशल्य साध्या html वेबपेजमध्ये नसते. dhtml किंवा डायनॅमिक वेबपेजसाठी कोणत्यातरी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचा त्यात समावेश करावा लागतो. जावास्क्रिप्ट(javascript), व्हीबीस्क्रिप्ट (vbscript), asp.net किंवा पीएचपी (php) चा उपयोग करून वेबपेज डिझाईन केले की त्याला डायनॅमिक वेबपेज व अशी वेबपेजेस असनार्‍या वेबसाईटला डायनॅमिक वेबसाईट असे म्हटले जाते.

यातील जावास्क्रिप्ट ग्राहकाच्या कॉम्प्युटरवरील सुविधा वापरून कार्य करते. त्यामुळे ग्राहकाची विशिष्ट मागणी सर्व्हरकडे पाठवावी लागत नाही व वेबपेजमध्ये त्याप्रमाणे चटकन्‌ बदल होतो. यामुळे याला क्लायंट साईड प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. नेव्हीगेशन मेनूसाठी वा टूल टिप, चित्राचा रंग, आकार बदलणे यासारखी छोटी कामे वा गणिते करून उत्तर देण्याचे काम जावास्क्रिप्ट वापरून करता येते. मात्र ब्राउजरवर जावास्क्रिप्ट कार्यान्वित करणे वा न करणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून असते. एकदम प्रकट होणार्‍या जाहिराती बहुदा अशा जावास्क्रिप्ट्चा वापर करतात.

आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती आपल्या न कळत वाचण्याचे, त्यात बदल करण्याचे विघातक प्रोग्रॅम नेटवरून येऊ नयेत म्हणून बर्‍याच ठिकाणी ग्राहकाकडून इंटरनेटच्या सिक्युरिटी सेटींगमध्ये जावास्क्रिप्ट बंद केलेले असते. अशा वेळी असे जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम कार्य करू शकत नाहीत. मग डायनॅमिक मेनू दिसत नाही किंवा डायनॅमिक बदल होऊ श्कत नाहीत. वेबसाईटवरून असे विघातक प्रोग्रॅम येणार नाहीत अशी खात्री असल्यास जावास्क्रिप्ट चालू करावे (enable) लागते.

जावास्क्रिप्टचे प्रोग्रॅम क्लायंटच्या कॉम्प्युटरवर चालत असल्याने त्याचे सर्व कोड html वेबपेजमधून द्यावे लागते. त्यामुळे ते कोणासही परत वापरता येते. याउलट व्हीबीस्क्रिप्ट वा पीएचपीचे कोड सर्व्हरवर राहून फक्त तयार झालेले पान क्लायंटकडे जात असल्याने ते सुरक्षित ठेवता येते. या प्रोगॅमना सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंग असे म्हणतात. मुख्य कोडची अशी सुरक्षितता रहावी पण उठसूट सर्व्हरकडे जावे लागू नये यासाठी जावास्क्रिप्ट व सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंग यांचा मिलाफ करून अजॅक्स (Ajax) नावाची प्रोग्रॅमिंगची नवी पद्धत उदयास आली आहे.

व्हीबीस्क्रिप्ट वापरून वेबपेज तयार केले तर ते .htm ऎवजी .asp या दुय्यम नावाने सेव्ह करावे लागते. asp.net वापरल्यास .aspx असे दुय्यम नाव वापरले जाते. पीएचपी पेजसाठी .php असे दुय्यम नाव असते.

सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंगचा मुख्य फायदा म्हणजे सर्व्हरवर ठेवलेल्या डाटाबेसमधून ग्राहकाला हवी असलेली माहिती घेऊन वेबपेज तयार करण्याचे काम सर्व्हरवरच होते. त्यामुळे मुख्य डाटाबेसमधील इतर सर्व माहिती सर्व्हरवरच सुरक्षित राहून सर्व ग्राहकांना त्यातून फक्त देण्यायोग्य माहिती पुरविता येते.

पुष्कळवेळा सर्व्हरसाईड प्रोग्रॅमिंगचा वापर डाटाबेस सर्व्हिसऎवजी केवळ वेबपेजमधील सीएसेस, बॅनर, मेनू, बॉटम फूटर या वेगवेगळ्या भागांच्या वेगळ्या फाईल करून त्या एकत्र करून वेबपेजेस तयार करण्यासाठी केला जातो. अशा वेबसाईटवरील वेबपेजेस डायनॅमिकली तयार होत असली तरी ती वेबसाइट स्टॅटिकच असते. फक्त अशा वेबसाईटमध्ये फेरबदल करणे सोपे असते. त्यामुळे अनेक पाने असणारी मोठी वेबसाईट नेहमी याप्रकारेच केली जाते.

डायनॅमिक वेबसाईट तयार करण्यासाठी डाटाबेस डिझाईन करणे, सर्व्हरवर तो इन्स्टॉल करणे. डाटाबेसमधून हवी ती माहिती काढून वेबपेजवर दाखविण्यासाठी प्रोग्रॅम लिहावे लागतात. यामुळे अशी वेबसाईट वेळखाऊ व कौशल्याचे काम असते. या वेबसाईतच्या डिझाईनसाठी स्टॅटिक वेबसाईतपेक्षा खर्चही बराच जास्त येतो. यामुळे काही वेळा स्टॅटिक वेबसाईट तयार करून त्यात एखादे डाटाबेसवर आधारित डायनॅमिक वेबपेजेसचे मोड्यूल तयार करून घेतले जाते. अर्थात डायनॅमिक वेबसाईटमुळे स्टॅटिकची अनेक पेजेस करण्याचा वेळ व खर्च यात बचत होते व सर्व दृष्टिने ते किफायतशीर ठरते.

No comments:

Post a Comment