Wednesday, October 13, 2010

इंटरनेट,ब्राउजर व सर्व्हर

इंटरनेटविषयी माझा याआधीचा लेख वाचावा. ब्राउजर व सर्व्हर

वेबसाईट व वेबपेजेस पाहण्यासाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम म्हणजे ब्राउजर. ज्या कॉम्प्युटरवर वेबसाईट व वेबपेजेस ठेवलेली असतात त्याला सर्व्हर असे म्हणतात. असा सर्व्हर बारा महिने चोवीस तास ( देखभाल व दुरुस्तीचा थोडा काळ वगळता) कार्यरत ठेवावा लागतो. साहजिकच सर्व्हर धुळविरहित जागेत व कमी तापमानाला ठेवणे आवश्यक असते. शिवाय त्यावरील सर्व्हर प्रोग्रॅम व्यवस्थित चालू ठेवणे, व्हायरस वा हॅकिंगपासून तो सुरक्षित ठेवण्यासाठी सुयोग्य संरक्षण यंत्रणा ( फायरवाल) त्यात बसवावी लागते. सर्व्हरला विनाखंड वीजपुरवठा करावा लागतो. यासाठी बॅटरी बॅक अप व व्होल्टेज व करंटनियंत्रक बसवावे लागतात. सर्व्हरपासून वेबपेजेसची माहिती सर्वदूर पाठविण्यासाठी डिश प्रक्षेपक बसवावे लागतात. सर्व्हरपासून डिशपर्यंत इलेक्ट्रिक केबल जोडली जाते. डिशमधून प्रक्षेपित केलेली माहिती सॅटेलाईटवरून सर्वदूर परावर्तित केली जाते. टेलिफोन वा इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्यांच्या ग्राहक यंत्रणेद्वारे त्याचे ग्रहण होते व नंतर केबलमधून वितरण केले जाते. ती कॉम्प्युटर सर्व्हरकडून ग्राहकाच्या ब्राउजरपर्यंत जाईपर्यंत इंटरनेटच्या जाळ्यातील अनेक टप्प्यांवर मार्गदर्शक कॉम्प्युटर (रूटर) मधून सर्वात जवळच्या मार्गाने छोट्या छोट्या तुकड्यात (पॅकेट्समधून) पाठविली जाते. ग्राहकाच्या ब्राउजरद्वारे त्याचे संकलन करून ती माहिती मॉनिटरवर दाखविली जाते. यासाठी TCP/IP नावाची प्रणाली वापरली जाते.

या सर्व यंत्रणेला खर्च बराच येतो व कुशल तंत्रज्ञांची व्यवस्था करावी लागते. वेबसाईट करू पाहणार्‍या छॊट्या कंपनीला वा व्यक्तीला हा खर्च पेलणे अशक्य असते. यासाठी इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांचे साहाय्य घ्यावे लागते. त्यांच्या सर्व्हरवर आपली वेबसाईट ठेवली (वेबसाईट होस्ट करणे असे म्हणतात) की त्यांच्याकडून सर्व व्यवस्था केली जाते या सेवेबद्दल दरवर्षाला काही रक्कम भाडे म्हणून आकारले जाते. भाड्याची रक्कम वेबसाईट कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे, त्याला किती जागा(मेमरी) लागते व किती बँडविड्थ पुरविली जाते यावर अवलंबून असते.

मेमरी - माहिती साठविण्यासाठी लागणार्‍या हार्डडिस्कवरील जागेला मेमरी म्हणतात. मेमरीचा सर्वात लहान भाग म्हणजे बिट(bit) याची किंमत ० किंवा १ असते (द्विमान पद्धती). एका अक्षरासाठी ८ बिटचा संच वापरला जातो. त्याला बाईट (byte)असे म्हणतात. १०२४ बाईट म्हणजे १ किलोबाईट (1kb) , असे १०२४ किलोबाईट म्हणजे १ एमबी (1mb - megabyte), असे १०२४ एमबी म्हणजे १ जीबी तर असे १०२४ जीबी म्हणजे १ टिबी (1tb - terrabyte) अशा चढत्या क्रमाने मेमरी मोजली जाते. एक पानाचा मजकूर साठविण्यासाठी फक्त २ केबी जागा पुरेशी होते. मात्र फोटोसाठी बरीच जास्त जागा लागते.( विशेष संस्कार करून ती १०० केबीपेक्षा कमी करता येते.) एका मिनिटाच्या ध्वनीफितीसाठी १ एमबी तर व्हिडिओसाठी सुमारे ५ एमबी जागा लागते. सर्वसाधारण वेबसाईटला ( १५ ते २० पाने व प्रत्येक पानावर २ फोटो) सुमारे १० एमबी जागा पुरेशी होते. फोटोगॅलरी व ग्राफिक जास्त रिझोल्युशनचे असेल तर ५० एमबी जागा आवश्यक असते. ISP सेवा देणार्‍या कंपन्या सहसा ५० एमबी जागा देतात.

बँडविड्थ - सर्व्हरकडून माहिती पाठविण्याचा तसेच ग्राहक कॉम्प्युटरवर माहिती ग्रहण करण्याचा वेग बँडविड्थवर अवलंबून असतो. सर्व्हरकडून अनेक वेबसाईटला सेवा पुरविल्या जात असल्याने ग्राहक संख्येत व माहितीच्या एकूण मागणीत वाढ झाली की माहिती देण्याचा व घेण्याचा वेग मंदावतो. जास्त बँडविड्थ असेल तर असा परिणाम होत नाही. छोट्या रस्त्यावरील वाहतूक व मोठ्या रुंद रस्त्यावरील वाहतुकीत जसा फरक पदतो. तसेच येथेही होते.

2 comments:

  1. Very good one sir was knowing the basics but not up to this minute level.

    ReplyDelete
  2. Very good one sir was knowing the basics but not up to this minute level.

    ReplyDelete