Saturday, October 9, 2010

वेबसाईट - रंगांची दुनिया

निसर्गात असणार्‍या विविध रंगांमुळे जग आपल्याला सुंदर दिसते. त्याचप्रमाणे रंग वेबसाईटचे सौंदर्य खुलवितात. ब्लॅक अँड व्हाईट छपाईपेक्षा रंगीत जाहिराती व मासिके कितीतरी जास्त आकर्षक दिसतात. रंगांचा सुयोग्य वापर केल्यास वेबपेजही आकर्षक बनविता येते. सिनेमा, टीव्ही पाहत असताना ज्याप्रमाणॆ आपल्याला प्रत्यक्षाचा भास होतो तोच अनुभव आपण वेबसाईट पाहणार्‍याला देऊ शकतो.

color code ( रंग दर्शविण्याच्या पद्धती) वेबसाईटवर रंग दर्शविताना रंगाचे नाव, विशिष्ठ रंगातील लाल,हिरव्या व निळ्या रंगांचे प्रमाणदर्शक आकडे ( r,g,b) वा हेक्झाडेसिबल पद्धतीची एक संख्या अशा वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात.

रंगांची नावे red,blue,yellow,gray,black यासारखी असतात.

दशमान पद्धती - आपण नेहमी दशमान पद्धती वापरून संख्या लिहितो. म्हणजे संख्येतील कोणत्याही स्थानाचा अंक ० पासून ९ पर्यंत असतो. ९ पेक्षा मोठी संख्या लिहायची झाल्यास स्थान वाढविले जाते उदा १० या संख्येत दोन अंक आहेत (एकम्‌ स्थानाला ० तर दशम्‌ स्थानाला १) याप्रमाणे स्थानांची नावे एकम्‌, दशम्‌ ,शतम्‌, सहस्र, दशसहस्र अशी दिली जातात.

rgb पद्धत - कोणताही रंग लाल, हिरवा व निळा या प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून बनविता येतो. रंगाची छटा ० ते २५५ अशा एकूण २५६ अंकांत दर्शविता येते. सर्व रंगांच्या छटा शून्य असतील तर काळा रंग rgb( ०,०,०) तयार होतो. सर्व रंग पूर्णपणे गडद असतील तर पांढरा रंग rgb(२५५,२५५,२५५) तयार होतो. याप्रमाणे लाल रंगासाठी rgb(२५५,०,०),हिरव्या रंगासाठी rgb(०,२५५,०) व निळ्या रंगासाठी rgb(०,०,२५५) हा (R,G,B) कोड वापरला जातो. या रंगांच्या कमीजास्त मिश्रणाने इतर अनेक रंग बनविता येतात. उदा. जांभळा रंग rgb(२५५,०,२५५), पिवळा रंग rgb(२५५,२५५,०)

हेक्झाडेसिबल पद्धत - हेक्झा म्हणजे सोळा. हेक्झाडेसिबल पद्धतीत ० ते ९ या अंकांनंतर १०,११,१२,१३,१४,१५ दर्शविण्यासाठी A(१०),B(११),C(१२),D(१३),E(१४),F(१५) अशी अक्षरे वापरली जातात. याप्रमाणे एका स्थानाची किंमत ० पासून १५ (एकूण १६) अशी बदलू शकते. दशमान पद्धतीतील २५५ या संख्या हेक्झाडेसिबल पद्धतीत FF अशी लिहावी लागते. रंग दर्शविण्यासाठी rgb मधील तीन संख्या एकत्र करून एक संख्या लिहिली जाते व हेक्झाडेसिबल पद्धतीसाठी # या चिन्हाचा उपयोग करतात. याप्रमाणे पांढरा रंग #FFFFFF , काळा रंग #000000, जांभळा रंग (लाल +निळा) #FF00FF, पिवळा रंग (लाल+हिरवा) #FFFF00 असे लिहिले जातात.

यातील रंगांच्या छटा ० ते २५५ वा 00 ते FF यादरम्यान बद्लून अनेक रंग बनविता येतात. अशा प्रकारे असंख्य ( २५६ गुणिले २५६ गुणिले २५६) रंग बनविणे शक्य असले तरी सर्व मॉनिटरवरील रिझोल्युशनच्या मर्यादांमुळे हे रंग आहे तसे दिसू शकत नाहीत. यामुळे वेबसाईटच्या माध्यमासाठी काही रंग सुरखित मानले जातात व त्यांचाच सहसा वापर करण्यात येतो.

वेबसाईटसाठी सुरक्षित रंग - रंगछ्टा ० पासून २५५ पर्यंत असल्या तरी त्यातील सहा टप्प्यांवरील (0%,20%,40%,60%,80%,100%) रंगछटा वापरून सुरक्षित रंग बनविले जातात हे टप्पे असे

RGB साठी ०,५१,१०२,१५३,२०४,२५५ व हेक्झाडेसिबल पद्धतीसाठी 00,33,66,99,CC,FF. उदा. निळ्या रंगातील छटा

सुरक्षित रंगछटा उदाहरणे

आता नवे लॅपटॉप व LCD मॉनिटर यांचे रिझोल्युशन जास्त असल्याने सुरक्षित रंगांव्यतिरिक्त इतर रंगही त्यावर नीट दिसू शकतात. मात्र साध्या मॉनिटरवर ते जसेच्या तसे दिसणार नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.

लेखनामध्ये अक्षरांचा व शब्दांचा रंग कसा दाखविता येतो हे आपण धडा ३ मध्ये पाहिले. fontcolor="white" किंवा font color=#CC6699" किंवा fontcolor="rgb(153,100,85)" वरील उदाहरणात फॉंट कोडच्या दोन्ही बाजूस < व > ही चिन्हे द्यावी लागतात. मगच तो टॅग पूर्ण होतो.(या वेबपेजमध्ये प्रत्यक्ष टॅग दाखविणे शक्य नसल्याने हे भाग सुटे केले आहेत.

आता वेबपेजचाच रंग बदलावयाचा असेल तर BODY टॅगमध्ये BGCOLOR खालीलप्रमाणे लिहिता येतो.
body bgcolor="#BBE6FA"
किंवा
body bgcolor=rgb(51,153,102)
बर्‍याच वेळा rgb पद्धतीने लिहिलेला रंग फायरफॉक्ससारख्या ब्राउजरमध्ये नीट दिसत नाही. यासाठी शक्यतो हेक्झाडेसिबल पद्धतीत रंग दर्शवावा.
आता तुम्ही पहिल्या तीन धड्यात body चा bgcolor व font चा color बदलून त्यांचा वेबपेजवर काय परिणाम होतो ते पहा व आकर्षक रंगसंगती तयार करा.

3 comments:

  1. अप्रतिम माहिती. मराठी मधून वेब डिझाइनची माहिती सोप्या पद्धतीने वाचकांना मिळत आहे त्याबद्द्ल आपले हार्दिक आभार !

    सलिल चौधरी

    www.netbhet.com

    ReplyDelete
  2. mala kadhi vatle hi nahvte mi kadhi web page designe karel.pan khupach changli anni sopi mahiti dilya badhal manapasun dhanyawad

    ReplyDelete