भारत सरकारच्या ‘सर्व शिक्षा अभियान’ योजनेस मदत म्हणून ज्ञानदीप फौंडेशन सर्वांसाठी मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने www.school4all.org हे संकेतस्थळ सुरू करीत आहे.
शिक्षण प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरून आपणास हे ज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफिती व चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांना माहिती असते. यासाठी अशा योग्य संकेतस्थळांतील विशिष्ट माहिती शोधून ती विषयानुसार या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र या संकेत स्थळांचे माध्यम इंग्रजी असल्याने मराठी माध्यमाच्या मुलांना त्याचा लाभ घेता येणार नाही. यासाठी माहितीचे मराठीत भाषांतर वा स्पष्टीकरण सोबत देण्याची योजना आहे.
शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ यांच्या मदतीने हे संकेत स्थळ पूर्णपणे विकसित करण्याची योजना आहे.
यापूर्वी मराठी, संस्कृत व विज्ञान या विषयांसाठी ज्ञानदीप फौंडेशनने स्वतंत्र संकेतस्थळांची निर्मिती केली आहेच. आता इतिहास, भूगोल, गणित, चित्रकला इत्यादी विषयांची माहिती संकलित करण्यात येईल.या संकेत स्थळासाठी प्रामुख्याने मराठी माध्यम वापरले जाईल मात्र आवश्यक तेथे इंग्रजीचा वापर केला जाईल. इतर भाषांचा समावेश भविष्यात होऊ शकेल.
विनम्र आवाहन
या प्रकल्पाचा आवाका मोठा असल्याने आपण सर्वांनी या उपक्रमास सक्रीय सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या पाहण्यात आलेल्या शिक्षणविषयक मोफत माहिती देणार्या संकेत स्थळांचे पत्ते कळविणे, स्वतः लेख, चित्रे वा माहिती पाठविणे, उपयुक्त सूचना करणे, चुका दर्शविणे असे सहकार्य मिळाल्यास या संकेतस्थळाची व्याप्ती लवकर वाढू शकेल. स्पर्धा, प्रश्नोत्तरे व शिक्षणविषयक घटना व कार्यक्रम यांनाही येथे प्रसिद्धी देण्यात येईल.
पुस्तक परिचय
वाचकांनी आवडलेल्या विविध विषयातील माहितीपूर्ण पुस्तकांची यादी व परिचय पाठविल्यास पाठविणार्याच्या नावासह त्यांचा समावेश येथे करण्यात येईल
पुस्तक प्रसिद्धी
जे प्रकाशक वा लेखक आपल्या पुस्तकाची संगणक प्रत पाठवतील वा प्रसिद्ध पुस्तकाच्या स्कॅन प्रतीच्या प्रसिद्धीस अनुमती देतील त्यांची पुस्तके या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. ( गुगलवर प्रसिद्ध केल्यामुळे परदेशातील पुस्तकांचा खप कित्येक पटींनी वाढला हे लक्षात घ्यावे. कारण पुस्तक इंतरनेटवर पाहिल्यावर त्याची छापील प्रत घेण्यास वाचक तयार होतात.)
अर्थ साहाय्य
अनेक व्यावसायिक व उद्योजक क्रिकेटसारखे खेळ, दूरदर्शनवरील संगीत स्पर्धा यासारख्या उपक्रमांना प्रायोजित करून त्याद्वारे आपल्या वस्तूंची वा सेवेची जाहिरात करीत असतात. शिक्षणासाठी मात्र असे साहाय्य दिले जात नाही. शिक्षणाची सार्वत्रिक गरज व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाचे असनारे अनन्यसाधारण महत्व लक्षात आल्यावर ज्ञानदीपने सुरू केलेल्या या मोफत शिक्षण प्रकल्पास जाहिरात व प्रायोजकत्वाद्वारे अर्थ साहाय्य मिळू शकेल असे वाटते.
No comments:
Post a Comment