आटपाट नगर होते. तेथे एका गरीब ब्राह्मणाने आर्थिक ओढगस्तीत पदरमोड करून आपल्या मुलीचे पालन पोषण करून सुशिक्षित बनविले. एका उद्योजक, धनवान व्यक्तीबरोबर विवाह लावून देऊन संतृप्त मनाने त्याने जगाचा निरोप घेतला.
जावई मान्यवर धनवान आणि उद्योजक असल्याने त्याच्या मनात आपल्या मुलांनी आपल्याप्रमाणेच उद्योगात यश मिळवावे. मोठ्या शहरात वा परदेशात जाऊन नाव कमवावे आणि त्या द्वारे आपली तसेच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी असे मत होते.
मुलीच्या आईला मात्र आपल्या नातवांनी आपले घरदार, शेतीवाडी तसेच आपल्या परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारावे त्यांना नवे तंत्रज्ञान देऊन आर्थिकदृष्ट्या संपन्न व स्वावलंबी करावे असे वाटत होते. मुलीला नव-याचे ऐकावे की आईचे ऐकावे असा प्रश्न पडला. जुन्या पिढीतल्या प्रौढ व्यक्तींना आईचे मत योग्य वाटत होते. पण नव्या पिढीतील मुलांना बाबांच्या धनकीर्तीचे आकर्षण असल्याने त्यांनी बाबांना साथ दिली. मुलीनेही त्याला मूक संमती दिली. मुलीने माहेरचे संबंध तोडायचे ठरविले. आता मात्र आई हट्टाला पेटली. तुला माझ्या जागेत रहायचे असेल तर माझ्या मताप्रमाणेच वागावे लागेल असे खडसावले व स्थानिक लोकांच्या प्राथमिक शिक्षणासाठी आपल्या जागेचा उपयोग करण्यास सुरुवात केली.
तिकडे आड तर तिकडे विहीर अशी मुलीची पंचाईत झाली. आईवर प्रेम असले तरी नव-याचे ऐकणे भाग होते. काय करावे हे तिला कळेना.
काही लोकांनी एक समन्वयाचा मार्ग सुचवला. आईने मुलीला आपल्या नव-याच्या इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्यावे आणि त्याबदल्यात मुलीच्या नव-याने माहेरच्या जागेत नवे नवे तंत्रज्ञान देऊन माहेरला आर्थिकदृष्ट्या संपन्न करावे.
प्रथम कोणीच हा सल्ला ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. पण कालांतराने त्यांना उमजले की स्थानिक जनतेत दुरावा निर्माण झाला तर सासर माहेर दोहोंचे नुकसान होईल.
मग त्यांनी या पर्यायावर विचार केला. काही चूकभूल झाली असल्यास क्षमा करावी असे एकमेकांना सांगून सासर माहेरातील वाद संपला. सहकार्याचे नवे युग सुरू झाले. सर्वजण सुखी व समाधानी झाले.
आटपाट नगरीतील ही कथा साठाउत्तरी सफल संपूर्ण.
आपल्या आवती भोवती अशा घटना घडत असतील तर आपम या कहाणीपासून योग्य तो बोध घ्यावा.