आपल्या शासन काळात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं यांनी आपली सत्ता टिकविण्यासाठी ज्या गोष्टी केल्या वा समाजविघातक घटकांना पाठिशी घातले यामुळे त्यांच्याविषयी मी मांडलेले मत वाचकांना आवडणार नाही हे मला माहीत होते. त्यांच्या या वागण्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र बंगालमधील ग्रामीण भागात अजूनही त्यांची लोकप्रियता कशी कायम राहिली आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
शहरी भागात नवे विचार रुजविणे सोपे असते. ग्रामीण भागात वैचारिक क्रांती करण्यास त्यांच्या बरोबरीने प्रदीर्घ काळ काम करावे लागते.एवढाच याचा अर्थ.
नवसंशोधन, प्रशिक्षण वा नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार शहरात ज्या गतीने होतो तसा ग्रामीण भागात होत नाही. रूढ पद्धती आणि चालिरितींची बंधने यास अटकाव करतात.
संगणक शिकणे, लिहिण्याऐवजी संगणकावर टाईप करणे सोपे असले तरी त्यासाठी लागणारी मानसिकता आज शहरातल्या मध्यम वर्गातही अभावानेच आढळते. मग ग्रामीण भागात तर असे कार्य कसे रुजविता येईल असा प्रश्न पडतो. आर्थिक लाभ मिळण्याबाबत तेथील लोकांची खात्री पटली तरच ते अशा उपक्रमात सहभागी होतील. असा आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासन तसेच इतर उद्योगांकडून असे काम मिळवून वितरित करण्याची यंत्रणा उभारावी लागेल. झोहो या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीने चेन्नईमध्ये असा यशस्वी प्रकल्प सुरू केला असून अनेक खेड्यातील तरुणांना शिष्यवृत्तीसह प्रशिक्षण आणि नोकरी देऊ केली आहे.
सांगायचा मुद्दा हा की आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी मोठ्या शहरांत आपला व्यवसाय न करता आपले प्रकल्प ग्रामीण भागात वितरित करून त्यांचे व्यवस्थापन विकसित करण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच आयटी क्षेत्रात यशस्वी व चिरस्थायी तृणमूल क्रांती होऊ शकेल, - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.