Friday, May 24, 2019

स्थलांतर व नवनिर्मिती हा निसर्गाचा स्थायी भाव

 मुलगी लग्न करून सासरी जाते. त्यावेळी तिला नवे घर मिळते. नव्हे ती नव्या घराची मालकीण बनते. सासरच्या कुटुंबियांना ती आपले मानते नव्हे ती त्या कुटुंबाची सदस्य बनते. नवे नाते संबंध तयार होतात.  पण तरीही ती आपल्या माहेराला विसरत नाही. दोन घराणी एकत्र सांधण्याचा ती एक दुवा बनते.

दोन्ही घराण्यांचा वारसा एकत्र करून शारिरिक, मानसिक, रितीरिवाज व परंपरा यांच्या मिश्रणातून नवी स्थानिक परिसरास अनुकूल अशी पिढी तयार होण्याची प्रक्रिया हा सार्‍या सजीव सॄष्टीचा  एक अपरिहार्य आणि स्वाभाविक आविष्कार आहे.

याचप्रमाणॆ जन्मभूमी व कर्मभूमी या दोहोंबद्दल तेवढीच आत्मीयता प्रत्येकाला असावयास हवी.   कालानुरुप आपोआप घडणारी ही गोष्ट असली तरी त्यासाठी बराच कालावधी लागतो.


परगाव, परप्रांत व परदेश या तीनही बाबतीत असा अनुभव येत असला तरी या तीनही गोष्टी परस्परांहून भिन्न आहेत. त्यांचे  संदर्भ मोठ्या प्रमाणात विस्तॄत होत असल्याने व अनुकूलनातील अडचणी भोगोलिक,सामाजिक व राजकीय स्तरांवर कित्येक पटींनी वाढत असल्याने वाटते तेवढी ही सोपी गोष्ट नाही.


आपल्या हिंदू धर्मात विजयादशमीला सीमोल्लंघन करून नवीन प्रदेश पादाक्रांत करणे, व विजयी होणे याला अतिशय महत्वाचे स्थान दिले आहे.


वामन पंडितानी देशाटनाची महती खालील प्रमाणे वर्णिली आहे.

केल्याने देशाटन, पंडितमॆत्री सभेत संचार ।
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ॥

खेड्याकडून शहराकडे, शहराकडून दुसर्‍या प्रांतात, वा एका देशातून दुसर्‍या देशात असे स्थायी स्थलांतर होत असताना मानसिक व  सामाजिक ताणतणाव व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो. पूर्ण बदल होण्यासाठी लागणारा कालखंडही मोठा असतो.


पशु, पक्षी, फुलपाखरे, समुद्रातील मासे दरवर्षी स्थलांतर करतात. मानवनिर्मित सीमा त्यांना अटकाव करू शकत नाहीत. प्राणीच काय पण वनस्पतीदेखील आपल्या बीजांद्वारे स्थलांतर करत असतात. वृक्षांचा स्थलांतर वेग वर्षाला एक मॆल असतो असे मी वाचले आहे. मानवजातीचा पृथ्वीवर झालेला विस्तार अशा स्थलांतरातूनच झाला आहे.

अमेरिकेत तर जवळजवळ सर्व लोकसंख्या इतर देशातील लोकांच्या स्थलांतरातून तयार झाली आहे असे विधान नुकतेच कॅलिफोर्नियातील अमेरिकन सिनेटर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी केले आहे. त्या अमेरिकेतील २०२०च्या राष्ट्राध्यक्ष  निवडणुकीसाठी उमेदवार आहेत.
(Ref: Indian Express News Washington | Published: June 8, 2018 9:11:43 )
Ref:1. https://en.wikipedia.org/wiki/Exploration_of_North_America 2. http://daily-work.org/

अर्थात ’लग्न” या मानवनिर्मित संस्कारांनी ज्याप्रमाणे मुलीची मनोधारणा त्वरित बदलण्याच्या क्रियेस मदत मिळते. त्याचप्रमाणे स्थलांतर प्रक्रियेतील स्वाभाविक परिणाम व बदल  स्थलांतरिताने समजून घेतले  व नव्या स्थानातील समाजाच्या आशाआकांक्षांशी जुळवून घेतले तर सामाजिक समरसतेला गती येईल व संघर्षाऎवजी सहकार्याने असा बदल घडून येईल.


No comments:

Post a Comment