डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्याचे वृत्त समजले आणि मला मनस्वी खेद झाला. दाभोळकर माझा वर्गमित्र. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत आम्ही एका इयत्तेत शिकत होतो. लहानपणी तो एक उत्तम कबड्डी खेळाडू म्हणुन प्रसिद्ध होता. शिवाजी उदय मंडळात उथळे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कबड्डीत चांगले प्राविण्य मिळविले होते. प्रतिस्पर्धी पार्टीत बेधडक घुसून नंतर उंच उडी मारून सीमारेषा गाठण्याचे व सर्वांना बाद करण्याचे त्याचे कसब पाहण्यासाठी आम्ही सर्वजण धनिणीच्या बागेत जात असू. आयुष्यभर अंधश्रद्धेशी झगडणार्या या योद्ध्याला अशी उडी मारून विजय मिळविण्याचे भाग्य मिळाले नाही. समाजद्रोही घटकाने त्यांच्यावर बेसावध असताना जीवघेणा हल्ला केला. मात्र आपला जीव गमावूनही समाजात अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष क्रांतीचे पर्व सुरू करण्यात तो यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
वाचन हा माझा छंद असल्याने माझे खेळाकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष झाले. त्यामुळे खेळ या प्रकारात प्रेक्षक या भूमिकेपलिकडे माझा खेळ या प्रकाराकडे फारसा संबंध आला नाही. त्यामुळे एका इयत्तेत असूनही मी दाभोळकरच्या मित्रमंडळात सामील नव्हतो. दाभोळकर घराण्यातील सर्व व्यक्ती राष्ट्रसेवादलाच्या संस्कारात वाढलेल्या असल्याने विज्ञान व सामाजिक सुधारणा याचे बाळकडूच नरेंद्रला घरातून मिळाले होते. खेळामुळे त्याच्यात निधडेपणा, संघर्षाची तयारी, जिंकण्याची जिद्द तर सामाजिक जाणिवेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची तळमळ, तर केळकर या आमच्या शाळेतील विज्ञानशिक्षकांनी निर्माण केलेला वैज्ञानिक दृष्टीकोन यातून नरेंद्रचे व्यक्तिमत्व विकसित झाले व जीवन कार्याला एक दिशा मिळाली.
नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्य सुरू झाले. मलाही वैज्ञानिक दृष्टीकोनाबद्दल आस्था असली तरी समाजात रूढ झालेल्या धार्मिक परंपरांना विरोध करण्याचे धारिष्ट्य मला होत नव्हते. धर्म का विज्ञान यावर आम्ही खूप तावातावाने चर्चा करायचो मात्र कृतीमध्ये वा प्रत्यक्षात चुकीच्या वाटणार्या गोष्टींना ठामपणे विरोध करून ज्येष्ठ लोकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा त्याला मूक संमती देण्याची क्रियाच माझ्याकडून व्हायची. याबबतीत नरेंद्र दाभोळकरांचा मला आदर वाटायचा मात्र त्यांच्या बरोबर लढाईत प्रत्यक्ष उतरणे मला जमले नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने सध्याच्या युवापिढीत जागृती करण्याचे कार्य यशस्वी केले असून आज महाराष्ट्रात सर्व ठिकाणी विज्ञानवादी कार्यकर्त्यांची भक्कम संघटना उभी राहिली आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. नरेंद्र दाभोळकरांना जाते.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य आपल्याला खालील संकेतस्थळांवर वाचायला मिळेल.
http://www.mahans.co.in
http://www.berational.co.in/
https://www.facebook.com/MaharashtraANiS
समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन मंत्र तंत्र, भविष्य, जादुटोणा, भुतेखेते इत्यादी मार्गांनी समाजाला लुबाडणारे भोंदू, वैदु आणि स्वयंघोषित साधु यांच्या विरुद्ध चळवळ करून त्यांचे बिंग फोडण्याचे तसेच तथाकथित जादुटोण्यामागचे विज्ञान समजावून सांगणारे अनेक कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे समाजात हळुहळू जागृती होत आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या आवश्यक कायद्याला होणारा विरोध हा स्वार्थापोटी, राजकारणासाठी का अज्ञानातून आहे याचा उलगडा न झाल्याने या कायद्याबद्दल अजूनही लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण करण्यात काहीजण यशस्वी झाले आहेत.
विज्ञान शिक्षण देऊन लोकांत जागृती निर्माण करणार्या मराठी विज्ञान परिषदेसारख्या नेमस्त संस्थेचे मला आकर्षण वाटले. त्यातूनच मराठी विज्ञान प्रबोधिनी सारखी संस्था स्थापन करण्यास व विज्ञान डॉट नेट ही वेबसाईट करण्याची प्रेरणा मला मिळाली. मात्र केवळ विज्ञान शिकवून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होत नाही व जुन्या अंधश्रद्धांच्या जोखडातून समाजाला मुक्त करायचे असेल तर नरेंद्र दाभोळकरांसारखे जिवावर उदार होऊन रणांगणात उडी घेणे आवश्यक आहे हे मला आता कळून चुकले आहे. माझ्यासारखे अनेक विज्ञानविषयक आवड व कळकळ असणारे पण अंधश्रद्धांना स्पष्टपणे विरोध करण्यास कचरणारे अनेक लोक आहेत हे मला माहीत आहे.
असामान्य हा शीर्षकात वापरलेला शब्द त्यांचे वेगळेपण दाखवतो. सर्व सामान्य माणूस प्रवाहपतित असतो. आजच्या सुशिक्षित समाजातील बहुसंख्य लोकांचा भूतभविष्य, जादुटोणा, भूतबाधा, चमत्कार यांच्यावर विश्वास नसतो. तरीही ते त्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत. अनेक अंधश्रद्धांचे केवळ जुन्या परंपरा जपण्याच्या भूमिकेवरून समर्थन करतात. धार्मिक वा अध्यात्मिक प्रवृत्तीच्या सत्शील वयोवृद्ध व्यक्तींच्या समाधानासाठी वा वादविवाद टाळण्यासाठी आपल्या विज्ञानवादी शंकांना वा आक्षेपांना मुरड घालतात. मात्र त्यांच्या मूक संमतीमुळे अनेक अंधश्रद्धांना लोकमान्यतेचा आभास निर्माण होतो. याचा उपयोग स्वार्थी व भोंदू व्यक्तीकडून अशिक्षित समाजाला फसविण्यासाठी केला जातो. अशावेळी विरोध व रोष पत्करून सत्य सांगण्याचे धादस करणार्या डॉ. दाभोळकरांसारख्या असामान्य व्यक्तीची समाजाला गरज असते. तीच समाजाला नवी दिशा देऊ शकते.
दाभोळकरांच्या बलिदानाने आजची शिक्षित युवापिढी नरेंद्र दाभोळकरांचे हे कार्य यशस्वी करण्यास धडाडीने पुढे सरसावेल व सर्व विरोध झुगारून अंधश्रद्धा निर्मूलना्ला कायद्याचा आधार मिळवून समाजाची श्रद्धेच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवेल असा मला विश्वास वाटतो.
आतापर्यंत नेमस्तपणाने याबाबतीत मत व्यक्त न करणार्या समाजधुरिणांनीदेखील याबाबतीत निसंधिग्द भूमिका घेऊन अंधश्रद्धा निर्मूलना्ला पाठिंबा व्यक्त करावा असे मला वाटते.
नरेंद्र दाभोळकरांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.