कवीवर्य भा. रा. तांबे यांनी आपल्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या कवितेत माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्र व त्याच्या सभोवतीचे सारे जग यांना अल्पावधीतच त्याचा कसा विसर पडतो व कोणतेही काम अडून न राहता पुन्हा पूर्वीप्रमाणे कसे चालू राहते याचे यथार्थ वर्णन केले आहे. आपल्याशिवाय जग चालू शकणार नाही हा माणसाचा भ्रम किती निराधार आहे हे दाखवून देऊन भावनांच्या गुंत्यात न गुरफटता माणसाने ईश्वराची आराधना करावी असे कवीने सुचविले आहे.
मृत्यूनंतर काय होईल याची थोडी कल्पना आपल्याला दूर ठिकाणी गेल्यानंतर थोड्याच काळात येऊ लागते. तसाच काहीसा अनुभव मला आमच्या अमेरिकेतील दोन महिन्यांच्या वास्तव्यात आला. जुलैमध्ये अचानक माझ्या अमेरिकेतील मुलीकडून तिकडे येण्याबद्दल आमंत्रण आले. तिच्या मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने आम्हीही त्याला होकार दिला. पासपोर्ट व व्हिसा तयार असल्याने आठ दहा दिवसांच्या अंतरावर विमानाची तिकिटेही काढली गेली. ज्ञानदीप इन्फोटेक कंपनीचे काम, ज्ञानदीप फौंडेशनचे नवे ऑफिस, कॉलेज व विद्यार्थ्यांशी चर्चा, सोव्हेनीरची छपाई, अकौंट्स पूर्तता अशा एक ना दोन अनेक कामात मी गुंतलो होतो. माझी पत्नी शुभांगी हीही मालतीबाई किर्लोस्करांच्या लेखसंग्रहाचे टायपिंग, वाचनालय सभा, संस्कृत संकेतस्थळाच्या कामात गर्क होती. शिवाय घरचे काम, पावसाळ्याची तयारी, बागकाम याही गोष्टी करायच्या होत्या. सगळी कामे अर्ध्यावर टाकून आम्ही अमेरिकेला जायच्या तयारीस लागलो. शुभांगीने लिहिलेल्या ‘आवरासावरी’ या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे आमची स्थिती झाली होती. जाताना तर इतकी गडबड झाली की गाडीचे तिकीटही आयत्या वेळी सापडेना. किल्या, कुलपे यांचा घोळ संपेना. दोन महिन्यात लागणार्या खर्चासाठी व वीज, फोन बिले भरण्यासाठी चेक व पैशांची व्यवस्था करणे य़ातही त्रुटी राहून गेल्या. शेवटी कशीबशी व्यवथा करून आम्ही मार्गस्थ झालो.
अमेरिकेत जाउन स्थिरस्थावर झाल्यावर मला इकडच्या कामाची काळजी वाटू लागली. इंटरनेटद्वारे यशस्वीरीत्या दूरस्थ व्यवस्थापन करता येईल असे मला वाटत होते. सुदैवाने माझ्याकडे छोटा लॅपटॉप होता. इंटरनेट कनेक्शनही सर्वांकडे होते. इ मेलद्वारे सर्वांना माहिती पाठविण्यास सांगितले. दररोज संध्याकाळी दिवसभरातील झालेल्या कामाचा वृत्तांत प्रत्येकाने मला मेलने कळवावा असे मी फर्मान काढले. स्काईपवर व्हीडिओ कॉन्फरन्स करणे शक्य असल्याने मला सर्व कामे माझ्या अनुपस्थितीतही करवून घेणे जमायला हवे होते. मात्र तसे झाले नाही.
माझ्याकडे येणार्या मेलमध्ये सुरुवातीचा उत्साह संपल्यानंतर कमालीचा उशीर होऊ लागला. ज्ञानदीपच्या दोनही ऑफिसमध्ये काय काम चालले आहे याची माहिती त्रोटकपणे कळू लागली. मी विलक्षण बेचैन झालो. इतक्या दुर असल्याने इंटरनेटशिवाय मला त्यांच्याशी सम्पर्क साधण्याचा मार्ग नव्हता.
कधीमधी व्हिडिओ चॅटींगची संधी मिळाली की मी माझ्या भावना तीव्रतेने त्यांच्याकडे व्यक्त करीत होतो. त्यांच्या कडून येणारी प्रतिक्रिया मात्र ‘आम्ही सर्व व्यवस्थित मॅनेज करीत आहोत. तुम्ही उगाच काळजी करू नका’ अशा थाटाची होती. म्हणजे त्यांनी माझी आवश्यकता पूर्ण पुसून टाकली होती. मीही मग आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करुन त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन ‘बर. मग काळजी नाही. तुम्हाला काही लागले तर कळवा असे सांगू लागलो’. असे दिवस जाऊ लागले. माझ्याशिवाय सर्व चालू आहे मग मी ते माझे आहे कसे म्हणावे असा मला प्रश्न पडला. मी परत गेल्यावर त्याना माझी अडचणच वाटू लागेल असेही मनात आले.
माझ्या इच्छा, माझ्या कल्पना, माझे विचार यांना त्यांच्या दृष्टीने काही किंमत नव्हती. उद्योग कसा चालवावा याचा उपदेश त्यांना नको होता. लाक्षणिक अर्थाने मी मालक होतॊ पण प्रत्यक्षात मी माझी मालकी पूर्णपणे गमावून बसलो होतो. दुसर्या भाषेत सांगायचे झाले तर मी त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नव्हतो.
मला जाणवले की मी जे माझे म्हणत होतो ते माझे राहिले नव्हतेच. त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. माझ्याविना जगण्याची त्यात पात्रता आली होती. स्वतंत्रपणे आकाशात उडायला शिकलेल्या पक्ष्याच्या पिलाला आता आईच्या घरट्याची ओढ नव्हती.
मुलगा मोठा झाला, मिळवता झाला की त्याला आईवडिलांचे छत्र लागत नाही. त्यांचा उपदेश रुचत नाही. तॊ स्वतः निर्णय घेण्यास तयार झालेला असतो. आईवडिलांना जेव्हा याची जाणीव होते तेव्हा प्रथम राग येतो. मग समज येते. त्यानंतर मुलास निर्णय घ्यायची मान्यता दिली जाते. हळुहळू आपली गरज संपल्याचे आई वडिलांच्या लक्षात येते. यात विशेष काही नाही. ही जग रहाटीच आहे. एक पिढी जाऊन दुसरी पिढी सत्तेवर येते.
जे जीवनाच्या बाबतीत घडते तेच आणि तसेच माणसाने उभारलेल्या उद्योग व व्यवसायातही घडत असते. आपला उद्योग वा व्यवसाय जेव्हा स्थिरावतो तेव्हा तो स्वयंपूर्ण बनतो. प्रत्यक्ष संस्थापकाची वा मालकाचीही त्याला गरज उरत नाही. तसेच कदाचित माझ्या उद्योगाचे झाले असेल. माझ्या आजपर्यंतच्या कार्यातून उद्योग उभा राहिला हे यश मला पुरेसे आहे. आता यातून अंग काढून घेऊन आपल्याला आवडीच्या क्षेत्रात आपले कार्य चालू ठेवावे अशी माझी धारणा झाली आहे.
Realy inspiring
ReplyDelete