Wednesday, April 3, 2024

स्वयंउद्योजक बना

भारतात शिक्षणाविषयी प्रचंड जागरुकता निर्माण झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. चांगले शिक्षण मिळावे यासाठी गरीब पालकदेखील आपल्या पोटाला चिमटा काढून, भरमसाठ देणग्या देऊन महागड्या शाळांत आपल्या मुलांना घालतात.

शिक्षणाची ही ओढ व गरज लक्षात घेऊन त्यापासून केवल आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने अनेक खासगी शिक्षणसंस्थांचा उदय झाला. शासकीय वा विद्यापिठाच्या नियमानुसार लागणारा शिक्षकवर्ग कागदोपत्री दाखवून वा तात्पुरता नेमून या शिक्षणसंस्थांनी मान्यता मिळवून घेतली. चांगल्या इमारती, आधुनिक सुखसोयी व जाहिरातबाजी यांच्या जोरावर अधिकाधिक विद्यार्थी व त्यांच्याकडून देणग्या घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. शिक्षण हा व्यवसाय मानल्याने व या व्यवसायाचे गिर्‍हाईक दिखाऊ गोष्टीवर भुलते हे माहीत असल्याने योग्य पगारावर चांगले शिक्षक नेमण्याकडेया शिक्षणसंस्थांनी दुर्लक्ष केले.

विद्यार्थ्यांचे लक्षही प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा नोकरीसाठी आवश्यक ती पात्रता मिळविणे याकडे असल्याने विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले आहेत. केवळ चांगल्या पगाराची वा सरकारी नोकरी हेच ध्येय असल्याने शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन पदवी शिक्षण, नंतर पदव्युत्तर शिक्षण व तेही अशा पायर्‍या पार करतात. मर्यादित नोकर्‍या व प्रशिक्षित विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या या मुळे स्पर्धापरिक्षा, मुलाखती, अनुभवाची आवश्यकता यासारख्या पात्रता कसोट्या पार कराव्या लागतात आणि तरीही शिक्षणासाठी द्याव्या लागणार्‍या देणग्यांप्रमाणे नोकरीसाठीही भ्रष्टाचाराला निमूटपणे मान्यता द्यावी लागते. मग यदा कदाचित नोकरी मिळाली तर असे भाग्यवान खर्च झालेले पैसे वसूल करण्यासाठी पुनः भ्रष्टाचार सुरू करतात.

मध्यंतरीच्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची जी भरभराट झाली त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या फार मोठ्या संधी निर्माण झाल्या. पदवी शिक्षण पूर्ण होण्याआधीच भरपूर पगाराचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीसाठी करारबद्ध करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे आल्या. त्यामुळे या क्षेत्रात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. गलेलठ्ठ पगार घेऊन चैनीत राहणार्‍यांची संख्या वाढली. त्याचा फायदा घेऊन इतर व्यवसायांनी व सेवा देणार्‍या संस्थांनी व बिल्डरनी आपले दर वाढवले. महागाई वाढली व कमकुवत पायावर उभी राहिलेल्या या प्रगतीने भुलभुलैयाचे स्वरूप धारण केले. अमेरिकेमध्ये इ. स्. २००० च्या सुमारास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास अशीच भरती आली होती. मात्र ३/४ वर्षातच केवळ भागभांडवलाच्या बाजारामुळे वर आलेले हे सारे उद्योग कोलमडले व बेरोजगारीचे संकट उभे राहिले.
सध्या जागतिक मंदीच्या लाटेमुळे तशीच परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे असे नव्हे तर नोकरीत असणार्‍यांनाही नोकरी गमावण्याची वा पगारकपात निमूटपणे स्वीकारण्याची वेळ आली आहे. व्यवसाय करण्याचे ज्ञान, धाडस नसल्याने व कर्जाचे डोंगर डोक्य़ावर असल्याने नोकरी गमावणार्‍यांची फारच दैना झाली आहे. समाज या विलक्षण परिस्थितीने हादरून गेला आहे. आर्थिक दृष्ट्याही याचे सर्व व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागले आहेत.
आता सर्वत्र अनिश्चितीचे वातावरण आहे. विद्यार्थी कोणते क्षेत्र निवडावे या संभ्रमात आहेत. आता खरी कसोटी शिक्षणसंस्थांची आहे. प्रचंड पैसा खर्च करून बांधलेल्या दिखाऊ इमारती व सुखसोयी विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकणार नाहीत. विद्यार्थी नसले की या इमारती म्हणजे आर्थिक बोजा ठरणार आहेत.

यावर उपाय काय? माझ्यामते शिक्षणाचे उद्दिष्ट परिक्षेपेक्षा व्यवसायाभिमुखता करण्याची वेळ आली आहे. स्वयंरोजगार निर्मिती हे शिक्षणसंस्थांनी आपले उद्दिष्ट ठरविले पाहिजे. सध्या प्रत्येक शाळाकॉलेजात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळे कार्यरत असतात. मात्र त्यांनी उद्योजक बनावे यासाठी मार्गदर्शन देण्यासाठी फारच थोडे प्रयत्न केले जातात. हॉर्वर्ड विद्यापिठाचा आदर्श आपल्या शिक्षणसंस्थांनी घेण्याची गरज आहे. हॉर्वर्ड विद्यापिठात केवळ उद्योगास मार्गदर्शनच दिले जात नाही तर विद्यार्थी असतानाच विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रवृत्त केले जाते. आज तेथे कॉर्पोरेट दर्जाचा उद्योग विद्यार्थी समर्थपणे चालवीत आहेत.

सातार्‍यात कै. भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या धनिणीच्या बागेत ‘कमवा व शिका’ योजना सुरू केली होती. कॉलेजची पहिली दोन वर्षे माझे शिक्षण सातारच्या शिवाजी कॉलेजमध्ये झाल्याने मला हे कार्य जवळून पहायला मिळाले. त्यावेळचे विद्यार्थी कोणतेही काम हलके न मानता आनंदाने व अभिमानाने अशी कामे करीत असत. अमेरिकेसारख्या प्रगत देशात विद्यार्थीच काय पण शिक्षकही कोणतेही काम करण्यात कमीपणा मानत नाहीत. श्रमाबद्दल कमीपणाची भावना आजकाल विद्यार्थ्यांमध्ये दिसते. याचे कारण दिखाऊ व्यक्तीमत्व जपण्याकडे प्रवृत्ती व टी. व्ही., सिनेमा यांचा प्रभाव असावा. श्रमाला पूर्ववत प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सध्याच्या शिक्षणसंस्थांनी हाती घ्यावयास हवे. व्यवसायातील संधी शोधणे, त्याची पूर्ण माहिती घेणे, तशा उद्योगात प्रत्यक्ष काम करणे याला शिक्षणक्रमात महत्वाचे स्थान दिले पाहिजे. जर शिक्षणसंस्था असे उद्योजक बनवू शकल्या तरच विद्यार्थी तेथे प्रवेश घेतील अन्यथा इमारती व सुखसोयी कितीही चांगल्या असल्या तरी विद्यार्थी त्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत.

सध्या नोकरीत असणार्‍यांनीही नोकरीची अशास्वतता लक्षात घेऊन स्वयंउद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे. चैन टाळून तसेच अनुत्पादक वा अनिश्चित लाभ पर्यायात पैसे न गुंतवता त्यांचा उपयोग स्वतःचा भावी उद्योग उभारण्याच्या दृष्टीने खर्च केला पाहिजे. नोकरी चालू असल्याने प्रत्यक्ष स्वतःला उद्योग करणे शक्य नसले तरी नोकरीच्या शोधात असणार्‍यांना वेतन देऊन त्यांचेकडून व्यवसाय करवून घेण्यासाठी पैसे खर्च केले तर फार फायदा झाला नाही तरी गरज पडली तर स्वतः त्यात सहभागी होण्यासाठी योग्य ती साधनसामुग्री, ग्राहकवर्ग व अनुभव यांची जुळणी होऊ शकेल. मग नोकरी जाण्याबद्दल भीती उरणार नाही.


सध्या परदेशात वास्तव्य करत असणार्‍यांनी तर या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे व भारतात असा उद्योग सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. कारण मंदीमुळे वाढलेल्या बेरोजगारीतून वंशविद्वेषाचा वणवा वाढू शकतो याचा प्रत्यय येऊ लागला आहे. भावी काळात अशा परदेशी राहणार्‍या भारतीयांना नोकरी व सुरक्षितता याविषयी चिंता वाढू शकते.यासाठी भविष्यात अशी वेळ आलीच तर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे हितकारक ठरेल. भारतातील नोकरी गेलेल्या लोकांना मदतीचा हात देऊन सावरण्याची व त्यातून स्वतःचा उद्योग स्वदेशात उभारण्याची सुसंधी परदेशस्थ नोकरदारांना प्राप्त झाली आहे. त्यांनी जर असे केले तर सध्याच्‍या बेरोजगारीच्या कठीण पेचप्रसंगातून मार्ग निघेलच, शिवाय परदेशस्थांना स्वदेशात हक्काचा स्वयंउद्योग उभारता येईल.

No comments:

Post a Comment